त्याच्यातला अभिनेता मला १९९० साली अहमदाबादला भेटला. आणि त्याच्यातला चित्रकार दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या जहांगीर आर्ट ग्यालेरीत. त्याच्या पेपर कोलाजच्या सुमारे १२५ कलाकृतींचे प्रदर्शन सुरु आहे. "संग, संवाद, संवेदना" अशी थीम असलेले हे प्रदर्शन. पेपर कोलाज हा प्रकार कलाक्षेत्रात तसा उच्च वर्णीय मनाला जात नाही असे त्याच्याच बोलण्यात आले. मला मात्र कागदावर उमटलेली कुठलीही कला आवडते, आकर्षक वाटते. अज्ञानी माणसाचे हे चांगले असते. ते कुठल्याही वादात न पडता कलेचा आस्वाद घेऊ शकतात. श्रीरामच्या ह्या सर्व कलाकृतीतून माणसातील संवाद आणि संवेदना व्यक्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. घडवलेली सर्व माणसे सुस्पष्ट आहेत आणि ती शोधावी लागत नाहीत. (हल्ली जिवंत माणसातला माणूस सुद्धा शोधावा लागतो !) त्यांच्यातील परस्पर संबंध देखील सहज प्रगटतात. मग ते एखादा राष्टीय दिवस साजरा करायला स्कूटर वर निघालेले कुटुंब असो, एखादे प्रेमी युगल असो कि दोन सख्या असोत. ही सारी चित्रे मासिकातली रंगीत पाने हाताने फाडून मग चिटकवून तयार केलेली आहेत. मनात असलेला रंग तयार करणे सोपे असावे मात्र हवा तश्या रंगाचा कागद मिळणे कठीण! त्यातून जर एखाद्या रमणीची साडी विशिष्ट रंगातली दाखवायची असेल तर? श्रीरामची चिकाटी म्हणून मला कौतुकास्पद वाटते. चित्रातली माणस एकमेकाशी संवाद साधताना दिसतात, त्यांचे कोम्पोजिशन बघताना श्रीरंग मधला नाट्य दिग्दर्शक जाणवत राहतो. कागदाच्या तुकड्यातून हवी असलेली देह बोली प्रगट करणे सोपे नाही कारण हे कागद कुठल्याही रेखाकृतीवर चीटकावलेले नाहीत!
परवा
भेटल्यावर श्रीरामने आधी दिलेली बातमी : " मी बँकेच्या नोकरीतून स्वेच्छा
निवृत्ती घेतली " तो घेत असलेला मोकळा श्वास त्याच्या बोलण्यातून जाणवत
होता. बँक आणि कला ह्यांचा खरे तर अर्थाअर्थी संबंध नाही मात्र बर्याच
जणांना बँकेत नोकरी करत असताना त्यांच्या जीवनातला खरा अर्थ उमगला हे
मानायला हवेच ! बँकेचे हे ऋण श्रीराम देखील मान्य करेल …
निवृत्ती
नंतर श्रीराम पूर्णपणे रंगभूमी आणि चित्रकलेत स्वत:ला झोकून देईल आणि आपली
कला साधना अधिक मोकळेपणाने सुरु ठेवेल ह्यात शंका नाही
मित्रा, पुढील 'अर्थ'पूर्ण जीवनासाठी अनेक शुभेच्छा !!