रविवार, सप्टेंबर २२, २०१९

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले सहावे पान*


ह्या जीवनातील नेमकी सत्य गोष्ट कुठली? भूक !!

नाना प्रकारच्या , विविध तऱ्हेच्या ... प्रकर्षानं जाणवणाऱ्या , अजिबात न जाणवणाऱ्या .... जागवणाऱ्या , निजवणाऱ्या ! ... आणि साऱ्या आयुष्याचा आकांत तेवढ्याचसाठी , तृप्तीसाठी . ह्या सत्यापायी माणसं खोट्यातली खोटी गोष्ट करतात , फसवतात, रडवतात, नागवतात ... फक्त तृप्तीसाठी.  साऱ्या भुकांचं मूळ दीड वितीची खळगी, तिचं रितेपण जाणवलं कि शरीरभर आणि मनभर भुकांचं एकछत्री साम्राज्य सुरु होतं.  पोट भरायला अन्न लागतं म्हणून अन्नाची भूक, अन्नासाठी पैसा  लागतो म्हणून पैशाची भूक, पैसा  मिळाला कि प्रतिष्ठा लाभते, प्रतिष्ठेची भूक ... अधिकाराची भूक , लौकिकाची भूक, प्रसिद्धीची भूक, एखाद्या अवलियास जाणवणारी  ज्ञानाची भूक, अहंकार-तुष्टीची  भूक. रात्री शरीर जाळून काढणारी दुसऱ्या शरीराची भूक ! 

एकदा भुकेच्या जाणिवेची ठिणगी मस्तकात पडली कि वणवा पेटल्या शिवाय राहत नाही. एखाद्या भुकेची तृप्ती झाली तरी ती तात्कालिक, क्षणिक, नश्वर ठरते. क्वचित प्रसंगी अपूर्ण ठरते . आणि मग लागते फरफटत नेणारी पूर्णत्वाची भूक. क्षुधापूर्तीच्या साधनांचं अपूर्णत्व उगाचच जाणवतं. पैसा मिळवण्याच्या वाटांचं एकदम दर्शन घडतं. मग प्रत्येक वाटेचा प्रवास. रात्रीच्या सुखात झिंग नव्हती म्हणून झिंगेचा शोध. लाभलेला लौकिक व्यापक नव्हता म्हणून व्यापकतेचा पाठपुरावा. गवसलेल्या ज्ञानाने उमगलेली अज्ञानता , त्यासाठी पूर्ण ज्ञानाचा हव्यास ....    
एकच मस्ती ... तृप्ती! एकच हव्यास....  पूर्णत्व ! एकच उद्देश ... संतुष्टी!

प्रत्येकाचं आयुष्य ह्याच भुकांनी भारलेले  .. तृप्तीच्या प्रेरणेने भारलेले ... पूर्णत्वाच्या सुरांनी नादावलेले ... म्हणूनच जीवनात एकच सत्य ... भूक ! गंमत ही कि ह्या सत्याच्या शोधापायी किंवा बोधापायी माणसाचे सारे आयुष्य खोटे होऊन जाते. फसवे ठरते .. पाखंड होते .. कुणी जगूच शकत नाही स्वत:चे आयुष्य, एक सच्चे आयुष्य . मनातील विचारांना, आवेगांना दडपत जो तो जपत जपत  जगत असतो. 

नांव, लौकिक, पैसे, कीर्ती, अधिकार, सभ्यता, नागरिकता ! संस्कृती नामक शहरातील हे रहिवासी आपल्या शहराचं शुभ्र, स्वच्छ, शुचिता नांव सांगून लगाम घालत असतात नैसर्गिक आवेगांना, प्रक्षोभांना, सहज उमटणाऱ्या विचारांना       



शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१९


इंदौरच्या ज्या घरात संपूर्ण लहानपण गेलं, म्हणजे १९७५ पर्यंतचा काळ, ते विकलं गेलं आणि काही दिवसांपूर्वीच पाडलं गेलं. घराचं वय नक्कीच ८०-८५ असणार.  त्या घराला ताळा लावून आई दादा जवळच असलेल्या फ्लॅट मध्ये रहायला गेले त्या नंतर म्हणजे २००४ नंतर मी त्या घरात पाय ठेवला नव्हता.

घरात वास्तव्य केलेल्या माणसांच्या आठवणी घराच्या भिंतीत जिरलेल्या असतात का? पावसाळ्यात घरात ताडताड पर्जन्य स्तोत्र म्हणत अभिषेक करणारे घराचे पत्रे पडताना विषण्ण झाले असतील ? काही पायऱ्या निखळलेल्या लाकडी जिन्याने सुटकेचा उसासा टाकला असेल का? देवघर असलेल्या खोलीतल्या कोपऱ्याने दोन बोटं चोखणाऱ्या श्रीची आठवण काढली असेल का?  दादांच्या ऑफिसच्या लादीला कोर्ट कज्ज्यांचा फोलपणा उमगला होता का? दाराशीच असलेल्या स्वयंपाक खोलीला शेवटची  साबुदाण्याची खिचडी  खावीशी वाटले असेल का? डॉक्टरच्या भीतीने ज्या फळीवर भाऊ चढून बसला होता त्या फळीने "तब्येत संभाळून रहा" असा निरोप भाऊ साठी ठेवला असेल का? घरातल्या तीन बालकनींनी शुभदाच्या गावगप्पा तिच्या मैत्रिणींसाठी आठवण म्हणून वाऱ्यासोबत धाडून दिल्या असतील का? मुकुंदने काढलेल्या चित्रांनी अनेक वर्ष शोभिवंत झालेल्या खोली खोलीतल्या भिंतींना ओकंबोकं झालं असेल का?
  
माझ्या अभ्यासाच्या खोलीच्या बिजागर सुटलेल्या खिडक्यांनी मी तिथे उभा राहून कुणा कुणाची वाट पहायचो ह्याची कागाळी केली असेल का?  
हे मनात साचत असताना आठवतात त्या  ३०-३५ वर्ष कुठलाही मेकअप न करू शकलेल्या घराच्या भिंती... एखाद्या जोगिणी सारख्या...   
**
इंदौरच्या ज्या घरात संपूर्ण लहानपण गेलं, म्हणजे १९७५ पर्यंतचा काळ, ते विकलं गेलं आणि काही दिवसांपूर्वीच पाडलं गेलं. घराचं वय नक्कीच ८०-८५ वर्षांचं असणार.  त्या घराला ताळा लावून आई दादा जवळच असलेल्या फ्लॅट मध्ये रहायला गेले त्या नंतर म्हणजे २००४ नंतर मी त्या घरात पाय ठेवला नव्हता. 
आम्ही राहायचो त्या दुमजली वाड्यात राहणारे सारेच भाडेकरू. आमच्या सहा खोल्यांचे भाडे महिन्याला रुपये २०. तळमजल्यावर राहणारे एक कुटुंब आपणच वाड्याचे मालक असे वागत असे . त्यांच्या तशा वागण्याचा कधी कधी त्रास होई. खूप राग यायचा.  मला सारखे वाटायचे वडिलांनी हा वाडाच विकत घ्यावा, आणि त्यांची गुर्मी काढावी. पण वडिलांनी तसे काही केले नाही. ते अखेर पर्यंत भाडेकरू म्हणूनच राहिले. वडिलांचे चुकलेच आणि त्यांना व्यवहार समजला नाही असे सारखे वाटत राहिले. ते सुद्धा चांगले वकील असताना ! 

पाचवीत शिष्यवृत्तीची परीक्षा दिली आणि शिष्यवृत्ती मिळाली. पहिल्या वर्षी २ रुपये महिना आणि पुढील दोन वर्ष ३ रुपये महिना ! थोडा अभिमान वाटायचा. नववी पासून पुढे कॉलेज पर्यंत मेरिट - कम - मीन्स शिष्यवृत्ती घेतली. वडिलांच्या सांगण्यावरून. अर्ज भरून प्रिन्सिपॉल कडे दिला कि बहुदा ऐकावं लागे -  जहागीरदार, वडील वकील असताना तुला कशाला हवी शिष्यवृत्ती? 'जहागीरदार वकील'  ह्या दुहेरी भारदस्तपणामुळे शाळेतल्या माझ्या मित्रांना तो वाडा आमच्या मालकीचा असावा असे वाटत असे. ते तसे नाही असे मी ओशाळून सांगत असे.

स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी वडील सरकारी नोकरीत होते. District Supply and Enforcement Officer ह्या पदावर. २००५ साली ते गेल्यावर त्यांचे सरकारी ओळखपत्र सापडले १९५२ सालचे. माझा जन्म १९५१ चा. मला ते आठवतात ते वकील म्हणूनच ... म्हणजेच आम्ही चार मुलं झाल्यावर त्यांनी सरकारी नोकरी सोडून वकिलीचा व्यवसाय सुरु केला. तोही सचोटीने. त्या काळात तसाही समाजाचा बहुतांश हा वंचितांचाच होता. "पुरवून पुरवून खा" असा कानमंत्र बालपणासून मिळालेला. बऱ्याच कुटुंबांनी देशाला जीवन समर्पित केलेले. नोकरी व्यवसाय सोडून स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरलेले. बरेच जण तुरुंगवास भोगून आलेले. आमचे वडील देखील स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते. असं कानावर पडलेलं.
   
   आता जाणवतं, नवख्या वकिलाला मिळत काय असणार ...  त्या पैशात संसार, चार मुलांचं शिक्षण ... कुठे कुठे काटकसर केली असेल त्यांनी !!  कशा ठरवल्या असतील आयुष्यातल्या प्राथमिकता? अर्थातच मुलांचं भविष्य ही आई-वडिलांची प्राथमिकता असतेच. ते बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात, छंद, मौज मजा, रजा, प्रवास ....    

त्यांचं एक वाक्य सारखं आठवतं "वकिली म्हणजे प्रतिष्ठेने उपाशी जगायचा  व्यवसाय" . आणि मी त्यांना व्यवहार कळला नाही म्हणून माझं मत बनवून मोकळा !! 

वर्तमानाच्या भिंगातून भूतकाळ बघताना परिपक्वता लागते, हेच खरं.  नाही तर मनात अढी ठेऊन "आपण तेवढे शहाणे " ह्या गुर्मीत अनेक जण जगताना आढळतात.  

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले पाचवे पान*


*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले पाचवे पान*

संस्कृती ह्या राजमान्य अधिकाऱ्याच्या दराऱ्यात  माणूस दडपून टाकतो आपली सहज,  स्वाभाविक, नैसर्गिक भूक.

खर तर आदि कालात संस्कृती नामक  शब्द योजण्यात आला तो संतुष्टी, तृप्ती , सहज -साध्य, आकारबद्ध प्रवासाने मिळालेली व्हावी म्हणून. संस्कृतीपूर्व काळात, जाणवलेल्या भुका एकमेकांच्या मदतीने भागवल्या जाव्या, त्या पुर्तीला एक रूप असावे, एक गंध असावा, त्या तुष्टीला एक रंग असावा, म्हणून सभ्यता, संस्कृती, आचार, ह्या शब्दांची निर्मिती झाली. आपली प्रत्येक कृती, प्रवासातला हर एक टप्पा माणूस ह्या कसोट्यांवर घासून पाहू लागला. नव्या वाटा, नवे मार्ग आखले गेले. नव्या अनुभवांचा अनुनुभूत आनंद मिळाल्याने संस्कृतीचा सत्कार झाला, आचारांचा आदर झाला. सभ्यतेला मान मिळाला. त्या सर्व भुका, त्या सर्व ओढी ह्या वाटांनी परिपूर्ण झाल्याही असतील. परंतु आज?

जुन्या, बुरसट आणि गंजलेल्या मुल्यांभोवतीच आमचा पिंगा चालू असतो आणि जीवन हे अतर्क्य, निरर्थक आणि गोंधळलेले वाटू लागते. ज्या भूकांभोवती आयुष्याचा प्रवास चालू असतो त्या भूकांवर स्वार  होऊनच जगणं  येतं  आणि म्हणूनच आयुष्यात कांहीच साधू शकलो नाही ह्याची खंत उरते!

मेंदूवर सांचलेली वाळवंट
पसरताहेत हळूहळू मनापर्यंत ...

किती काळ जपशील चार थेंब
भावनांचे, ओसाड रेताडास फुटलाच, तर
फुटेल कोंब निवडुंगाचा अन
तुझ्या आत्म्याची लक्तरं
फडकावतील तुझ्या अपयशाची गाथा ...

पण ह्याची शक्यताही कमीच !
कारण कुठल्याही गाथेचा नायक
होण्याइतका मोठा नाहीस तू ...
ह्या वैराणात तुझी नियती शहामृगाची!

वादळाच्या वासाने खुपसून घे मान
तुलाच गिळणाऱ्या  वाळवंटात,
तुझ्या अस्थिंचेही होऊ देत वाळू कण
अन जा सामावून ह्या वाळवंटात
त्याचाच एक भाग होउन !

- श्रीधर जहागिरदार 

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले चौथे पान*



कधी कधी वाटतं मरून जावं ... अगदी सहजपणे हा विचार येतो . कां?
रात्रीच्या शांततेत छातीवर छत पेलत जेंव्हा विचारांचे घोडे उधळतात तेंव्हा ते आपलेल्या ट्रॅक पासून कितीही दूर गेले तरी रोख ह्या एकाच विचाराकडे जातो . कां? 
एखादं जालीम विष पाण्याबरोबर पोटात ढकलावं असं वाटतं. कां?
त्या महाशिवाचा अजिंक्य त्रिशूळ छातीवर पेलावा असंही वाटतं . कां?  . 
रात्रीचीच गोष्ट कां, भर दिवसा  समोरून धडधडत येणाऱ्या ट्रक समोर सायकल उभी करावी हाही विचार येतो. कां? 
मृत्यूकडे जाण्याची ओढ लागली म्हणून? जीवनापासून निराश झालो म्हणून? करण्यासारखं काहीच नाही ही जाणीव झाली म्हणून? कि सतत आपल्या भोवती आपला वास हुंगत "तो " वावरतोय , फक्त निर्धारित सामानाची वाट पहात, ही जाणीव आहे म्हणून? 
उभं राहण्याआधीच कोसळण्याची ही हौस कां? तुटत चाललोय मी! अवतीभवती गर्दी असूनही एकटा होत चाललोय मी. ... कां ? कसा? 
हंबरडा फोडावा म्हटलं तर श्वास गुदमरतो ... डोळा पाणी आणावं म्हटलं तर डोळे नुसतेच चुरचुरतात. ती नेमकी कुठली वाफ आंत दडून नुसती  होरपळून काढतेय? तो नेमका कशाचा शोध आहे ज्या साठी सारं चैतन्य , सारा उत्साह, सारी उमेद ताटकळतेय उंबरठ्यात?
किती दारं ठोठावली पण हवी असलेली हाक अजून कानी पडत नाहीये. किती वाद्यांच्या तारा छेडल्या पण हवा तो सूर जुळत नाही . कुठल्या दिशेतून येणार आहे  तो भारावून टाकणारा सुगंध? दिशा बदलली तरी आकाश तेच हा दारुण अनुभव नुसता भटक्या बनवून सोडणार ... शिवाय माथ्यावरलं वंचनेचं ओझं वाढतच जाणार ..... 

हुकल्या कितीक वाटा, चुकली जरी दिशाही,
आकाश तेच आहे, तोवर न खंत काही !
हातात कोरलेल्या, आहेत दग्ध ज्वाला,
मी सूर्य रे अनादी, कां बाळगू तमा ही?
घायाळ मोर नादी झाला जरी खुशाल
जो पेटला पिसारा, विझणार ना कधीही!
झोकात झोकले मी जहराळ प्राक्तनाला,
फुटणार कांच प्याला, समजून काय नाही?
चुकतील सूर थोड़े, गळतील पाकळ्याही,
गाण्यात या जिण्याचा शोधून गंध पाही!



बुधवार, सप्टेंबर १८, २०१९

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले तिसरे पान*

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले तिसरे पान*

माणसाच्या हातांत काय असतं ? जन्मतःच मूठ आवळून येणारा हा प्राणी स्वत:च भाग्य लपवत येत असेल असं वाटत नाही. निश्चितच तो झाकत असणार नियतीने हातावर कोरलेल्या जखमा ... आयुष्यपटलावर निरनिराळ्या समयी रंगणारे  रंग .... घटना घडतात त्या नियतीच्या नियमांनी, कुठे तरी दडून बसलेल्या 'सावल्या' अचानक गाफील क्षणी झडप घालतात आणि सारं आकाशच काळवंडून जातं ... दिवसांचे पंख कापले जातात ... भराऱ्या अर्ध्यावरच मोडून पडतात ... आयुष्यात कमावलेलं, जोपासलेल सारं पिंजून निघतं . एका नव्या आयुष्याची सुरुवात होते . पण अखेर पर्यंत 'तो' क्षण सिंदबादच्या पाठीवरील म्हाताऱ्यासारखा खदखदत नाचवत असतो.   

कुठे काय चुकले? काय कमी पडले? कुठल्या पापाची फळं  वेळ साधून जिंकून गेली  ? साऱ्या उभारीची दैना उडवून टाकण्याची बेसावधता कशी आली? प्रश्नांची वटवाघुळं साऱ्या आयुष्याची कातरवेळ करून टाकतात. पण चुकलेले कुठेच नसते. सारे तसेच घडायचे असते. नेमके, बिनचूक! नियतीचा तोलकाटा कधीच ढळत नाही. सावधानता कधी असूच शकत नाही ! बेसावधपणा जन्माबरोबरच पुजलेला असतो; सावली सारखा - प्रकाशात अस्तित्व जाणवून देणारा     

पदरात पडलेल्या कवड्याही प्रसाद म्हणून जतन  करणारेच जास्त. म्हणून त्यांच्या जखमाही खोल... सलही विलक्षण ... पात्रात पडलेले कवड्यांचे दान उधळून लावणारे नेटाने जगतात पण सतत दडपणाखाली.

 भिरकावून लावलेल्या कवड्या सतत खुळखुळत असतात सद्विवेकाच्या सारीपटाशेजारी ....   
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%
भिरकावून देण्यासाठीच असेल हे अस्तित्व वारंवार 
तर कशासाठी जपल्या श्वासांच्या खुणा 
मी एकटाच नव्हतो त्या वळणावर अनिवार 
तूही सामील त्या जल्लोषात पुन्हा पुन्हा ... 

बिन नाळेचाच जन्मलोय मी 
तुझ्यामागे नियमांचे धागे अनंत 
उजाड माळावर सावली हरवून 
भुताड  झालोय ह्याची तुला कशाला 
मलाच खंत ...

सावली सुद्धा निघून जाते संधी साधून
जेव्हा दाटून येते भयाण रात्र काळी,
भर दुपारी, तापत्या उन्हात सावली हरवून
भुताड व्हायच तेवढ मात्र माझ्या भाळी।

१९७२

SANY0105%5B1%5D.JPG (87×99)

मंगळवार, सप्टेंबर १७, २०१९

*पत्र्याच्या पेटीतील तळाशी सुकलेलं दुसरं पान*



धरलेली प्रत्येक वाट अनोळखीच असते. शोधून शोधूनहि ओळखीच्या खुणा कुठे सापडतच नाहीत. प्रत्येक झाड नवं, त्यावरच पान नवं, त्यावरल फूल नवं, त्या फुलाचा गंध  नवा. पण ह्या नवीनतेन भारावून जाण्यापेक्षा गोंधळून जायलाच कां व्हावं ? अज्ञानात अंदाजाने बांधलेले आकार कुठेच दिसू नयेत म्हणून झालेली ही निराशा असते कि अपेक्षाभंगाची वेदना? कि स्वत:च्या अपेक्षांवरच्या वाजवी विश्वासाची कणा ताठ असलेली जाणीव? त्यापोटी दूरात नजर रोवून असलेली आशा? उचललेल्या आपल्या पावलानाच अर्थ नाही कि पायाखालची वाटच आहे अर्थशून्य? वळणा मागून वळण जाताहेत पण अजून "पुढे आलो"   ह्याची जाणीव कां होऊ नये ? प्रत्येक  वळणावर एक नवा दिशा निर्देशक, प्रत्येक  निर्देशकावर एका नव्या गावाचं नाव … साराच प्रवास असा अज्ञाताच्या पाठी आणि अखेर जाणवणार असेल त्या अज्ञाताची अतर्क्यता , नेणिवेच्याही  पलीकडील … अनाकलनीय ….

उध्वस्त क्षितीज आणि सूर्य दिशाहीन!

हे काय घडतंय? किंबहुना काहीच का घडत नाहीये? उतारावर ढकलून दिलेलं पिंप अजून थांबत नाहीये … पसरलेल्या धुक्यात एखादा आकार लपलेला आहे कि नाही? स्वत:ची स्थिती इतकी हास्यास्पद कधीच झाली नव्हती.

नोकरीच्या, कामाच्या ढालीने किती काळ निभाव लागणार?

पहाट किती लांब आहे?
*************************
उध्वस्त क्षितीज आणि सूर्य दिशाहीन
आकाश स्वच्छ नाही पुरतेच ते मलीन

असतात भोवताली चालूच हालचाली
साऱ्यात मात्र आहे मी एकटाच दीन

साम्राज्य सावल्यांचे कळसूत्री बाहुल्यांचे
तुटतील दोर आणि होईल फक्त लीन

श्वासांची फक्त ग्वाही, जगलो कधीच नाही,
हाती कधी फुलेना, कांटेही  दंशहीन!

हातात फक्त लुळे , उरलेत शब्द खुळे,
त्यांना कुठे किनारा, झालेत अर्थहीन ! 

My Photo

रविवार, सप्टेंबर १५, २०१९

पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेलं पहिलं पान*


पहिल पान !
कुणासाठी ?
अजून ही प्रश्नांची सोबत संपत नाही. उत्तरं माहित नसलेले हे प्रश्न पावसाळी ढगांसारखे मनभर धावून येतात आणि तसेच लोंबकळत रहातात, बरसत नाहीत, जातही नाहीत. मळभाचे दाट थर मात्र वाढतच रहातात. पावसाळी ढगांसारखे धावून येणारे हे ढग जलद मात्र नसतात; असतात निर्जल, फिकट, पांढुरके ढग. स्वत:चा माझ्या अस्तित्वाशी संबंध दर्शवणारे, लोंबकळत राहणारे, वटवाघूळा सारखे अवस्थाहीन !
वटवाघुळ !!!! भाळावर बहुदा तोच गोन्दवलेला असणार. पण निव्वळ प्रतिक मात्र … कारण खऱ्या वटवाघुळाल उ:शाप असतो निशा - दृष्टीचा, रात्रीच्या अंधारात गवसते त्याला आकाश, जाणवतात भरारी घेऊ शकणारे पंख. मात्र भाळावरच्या माझ्या वटवाघुळांच्या स्वप्नाचे गरुड देखील उडत नाहीत. डोळाभर माखून असते नाकर्तेपणाची निर्लज्ज काळी वेदना …. वेदना, पण ती तरी सच्ची आहे का? भळभळत्या जखमेपोटी निपजणाऱ्या वेदनेला असते आकाश भेदून काढणारी भव्यता आणि इथे टचकन थेंबही येत नाही तेजोहीन नेत्रात … जखमांचा पत्ता नाही कि जखमाच वांझ आहेत म्हणून वेदनेची चव नाही ? ऐलथडी - पैलथडी पण ज्याला ऐल नाही आणि पैल हे नाही अशा प्रवाहात अडकलेला मी …
पण मग आकाश आकाश म्हणून काल ज्याचा जयजयकार झाला तो कोणाचा ? आकाश … एक निरस्तित्व ! पण आक्षितिजतेच्या पुण्याईन पण फसव्या पण देखण्या निळ्या झिलाईन भव्यतेच मानक झालेलं … आणि मी जर आकाश असलो तर चंद्र सूर्याचे डोळे चेहऱ्यावर मढवायला हवे. पण चंद्राची शीतल दाहकता आणि सूर्याची तेजाळ प्रसन्नता सहन होईल मला? नसेल तर हे उधारीच आकाशपण झुगारून द्यायला हवे पण कसे शक्य आहे ते? जे दिसत ते नाकारण्याची अपार्थिव ताकद आहे कुणात! दिशांतापर्यंत पसरलेली मुग्ध निळाई आकाशाची नाही तर कशाची प्रतिक?
प्रतिक ! प्रतिक ! प्रतिक !स्वत:च्या अस्तित्वाभोवती पसरलेलं एक मुखवटेदार धुकं. … धुकं ज्यात सामावलेली असते एक गूढ रम्य सृष्टी. प्रतिक म्हणजे स्वत:च्या माथ्यावर दुसऱ्याच्या गोष्टीच ओझ वाहणारा हमाल. म्हणजे पुन: 'मी' पण हरवलेलं … तेच तर शोधतोय सर्वदूर. गीतातून, सुरातून …. विज्ञानातून , गणितातून … पुस्तकातून, गुलमोहरातून … लिहिण्यातून, वाचण्यातून, बोलण्यातून, …. जखमेतून, वेदनेतून … परंतु सारा शोध असफल! प्रत्येकाच्या शेवटी आढळते ती मन व्यापून टाकणारी फ़ोलता …. पोकळी प्रसवणारी अपयशाची असहायता …. पण तरीही तरंगत असते कुठेशी, कुढणारी का होईना पण आशा … आकांक्षा …. स्वत्व गवसेल, स्वत्व गवसेल म्हणून कानाशी रुंजी घालणारी !
आशा - निराशा, जयपराजय, उमेद - हतबलता, भव्यता- खुजेपण, असहायता - भरारी … द्वंद्व ! द्वंद्व! कधीच जिंकणार नाही का मी या द्वंद्वात? दोनही तीरांवर पाय रोवलेले. निराशेने असहाय होऊन आत्मघाताकडे झुकू पाहणाऱ्या एका मनाला लगेच सुचतो, विवेक, विचार . पण काहीतरी गवसल्यावरही पुढे पसरलेला लांबच लांब रस्ता ' मुक्काम' न आल्याची खंत करायला लावतो. ( मैलांचे दगड जिंकल्याच्या का कधी जाहिराती होतात?) माणूस अल्पसंतुष्ट आणि समाधानी असला कि आकांक्षा विहीन ठरतो आणि क्षितिजाला भिडायच्या प्रयत्नांत अस्तंगत सूर्यासारखा रक्ताच्या थारोळ्यात पडला तर जिद्दी आणि झपाटलेला ठरतो.
समस्त आदर्शांना आणि स्वप्नांना बाटलीबंद करून ठेवून व्यवहाराच्या राज्यात शिरला तर भोगवादी आणि आदर्शांच्या कळाहीन रंगहीन निवडुंग बागेत फिरला तर येडा!
अखेर यशाचं गमक काय? पैसा, कीर्ती, नांवलौकिक, मोटर बंगला, सचोटी आणि नितीमत्तेची जोपासना कि मुत्सेद्दीगिरी?
विचार … विकारांना निमंत्रण देणारे आणि हाकलूनही देणारे मनाचे पहारेदार … मात्र हा भोवरा भयंकर आहे, वेड लावणारा आहे …. एक कधीच न 'जगू' देणारा शाप आहे ! गती आहे पण प्रगती नाही आणि अडकणाऱ्याची अधोगती !!!!!
परीटघडीच्या मनावरती
कातरवेळची काजळी
सांदी कोपरी दडून बसले
आठव जुने वटवाघुळी
हिंदकळणारी, फडफडणारी
अजस्त्रपंखी कर्कशा
लक्तर लक्तर पिंजून निघते
भावनांची दुर्दशा...
रंगीत क्षितिजा पलीकडे
अंधाराचा हाss घसा
इवला इवला होऊन जाई
भेदरलेला शुभ्र ससा ...
आकांताने रोज चुकावी
त्रिशंकूची कातर वाट
नवी क्षितिजे घेऊन येईल
कुणी सांगावे उद्या पहाट !!