शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१९


इंदौरच्या ज्या घरात संपूर्ण लहानपण गेलं, म्हणजे १९७५ पर्यंतचा काळ, ते विकलं गेलं आणि काही दिवसांपूर्वीच पाडलं गेलं. घराचं वय नक्कीच ८०-८५ असणार.  त्या घराला ताळा लावून आई दादा जवळच असलेल्या फ्लॅट मध्ये रहायला गेले त्या नंतर म्हणजे २००४ नंतर मी त्या घरात पाय ठेवला नव्हता.

घरात वास्तव्य केलेल्या माणसांच्या आठवणी घराच्या भिंतीत जिरलेल्या असतात का? पावसाळ्यात घरात ताडताड पर्जन्य स्तोत्र म्हणत अभिषेक करणारे घराचे पत्रे पडताना विषण्ण झाले असतील ? काही पायऱ्या निखळलेल्या लाकडी जिन्याने सुटकेचा उसासा टाकला असेल का? देवघर असलेल्या खोलीतल्या कोपऱ्याने दोन बोटं चोखणाऱ्या श्रीची आठवण काढली असेल का?  दादांच्या ऑफिसच्या लादीला कोर्ट कज्ज्यांचा फोलपणा उमगला होता का? दाराशीच असलेल्या स्वयंपाक खोलीला शेवटची  साबुदाण्याची खिचडी  खावीशी वाटले असेल का? डॉक्टरच्या भीतीने ज्या फळीवर भाऊ चढून बसला होता त्या फळीने "तब्येत संभाळून रहा" असा निरोप भाऊ साठी ठेवला असेल का? घरातल्या तीन बालकनींनी शुभदाच्या गावगप्पा तिच्या मैत्रिणींसाठी आठवण म्हणून वाऱ्यासोबत धाडून दिल्या असतील का? मुकुंदने काढलेल्या चित्रांनी अनेक वर्ष शोभिवंत झालेल्या खोली खोलीतल्या भिंतींना ओकंबोकं झालं असेल का?
  
माझ्या अभ्यासाच्या खोलीच्या बिजागर सुटलेल्या खिडक्यांनी मी तिथे उभा राहून कुणा कुणाची वाट पहायचो ह्याची कागाळी केली असेल का?  
हे मनात साचत असताना आठवतात त्या  ३०-३५ वर्ष कुठलाही मेकअप न करू शकलेल्या घराच्या भिंती... एखाद्या जोगिणी सारख्या...   
**
इंदौरच्या ज्या घरात संपूर्ण लहानपण गेलं, म्हणजे १९७५ पर्यंतचा काळ, ते विकलं गेलं आणि काही दिवसांपूर्वीच पाडलं गेलं. घराचं वय नक्कीच ८०-८५ वर्षांचं असणार.  त्या घराला ताळा लावून आई दादा जवळच असलेल्या फ्लॅट मध्ये रहायला गेले त्या नंतर म्हणजे २००४ नंतर मी त्या घरात पाय ठेवला नव्हता. 
आम्ही राहायचो त्या दुमजली वाड्यात राहणारे सारेच भाडेकरू. आमच्या सहा खोल्यांचे भाडे महिन्याला रुपये २०. तळमजल्यावर राहणारे एक कुटुंब आपणच वाड्याचे मालक असे वागत असे . त्यांच्या तशा वागण्याचा कधी कधी त्रास होई. खूप राग यायचा.  मला सारखे वाटायचे वडिलांनी हा वाडाच विकत घ्यावा, आणि त्यांची गुर्मी काढावी. पण वडिलांनी तसे काही केले नाही. ते अखेर पर्यंत भाडेकरू म्हणूनच राहिले. वडिलांचे चुकलेच आणि त्यांना व्यवहार समजला नाही असे सारखे वाटत राहिले. ते सुद्धा चांगले वकील असताना ! 

पाचवीत शिष्यवृत्तीची परीक्षा दिली आणि शिष्यवृत्ती मिळाली. पहिल्या वर्षी २ रुपये महिना आणि पुढील दोन वर्ष ३ रुपये महिना ! थोडा अभिमान वाटायचा. नववी पासून पुढे कॉलेज पर्यंत मेरिट - कम - मीन्स शिष्यवृत्ती घेतली. वडिलांच्या सांगण्यावरून. अर्ज भरून प्रिन्सिपॉल कडे दिला कि बहुदा ऐकावं लागे -  जहागीरदार, वडील वकील असताना तुला कशाला हवी शिष्यवृत्ती? 'जहागीरदार वकील'  ह्या दुहेरी भारदस्तपणामुळे शाळेतल्या माझ्या मित्रांना तो वाडा आमच्या मालकीचा असावा असे वाटत असे. ते तसे नाही असे मी ओशाळून सांगत असे.

स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी वडील सरकारी नोकरीत होते. District Supply and Enforcement Officer ह्या पदावर. २००५ साली ते गेल्यावर त्यांचे सरकारी ओळखपत्र सापडले १९५२ सालचे. माझा जन्म १९५१ चा. मला ते आठवतात ते वकील म्हणूनच ... म्हणजेच आम्ही चार मुलं झाल्यावर त्यांनी सरकारी नोकरी सोडून वकिलीचा व्यवसाय सुरु केला. तोही सचोटीने. त्या काळात तसाही समाजाचा बहुतांश हा वंचितांचाच होता. "पुरवून पुरवून खा" असा कानमंत्र बालपणासून मिळालेला. बऱ्याच कुटुंबांनी देशाला जीवन समर्पित केलेले. नोकरी व्यवसाय सोडून स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरलेले. बरेच जण तुरुंगवास भोगून आलेले. आमचे वडील देखील स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते. असं कानावर पडलेलं.
   
   आता जाणवतं, नवख्या वकिलाला मिळत काय असणार ...  त्या पैशात संसार, चार मुलांचं शिक्षण ... कुठे कुठे काटकसर केली असेल त्यांनी !!  कशा ठरवल्या असतील आयुष्यातल्या प्राथमिकता? अर्थातच मुलांचं भविष्य ही आई-वडिलांची प्राथमिकता असतेच. ते बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात, छंद, मौज मजा, रजा, प्रवास ....    

त्यांचं एक वाक्य सारखं आठवतं "वकिली म्हणजे प्रतिष्ठेने उपाशी जगायचा  व्यवसाय" . आणि मी त्यांना व्यवहार कळला नाही म्हणून माझं मत बनवून मोकळा !! 

वर्तमानाच्या भिंगातून भूतकाळ बघताना परिपक्वता लागते, हेच खरं.  नाही तर मनात अढी ठेऊन "आपण तेवढे शहाणे " ह्या गुर्मीत अनेक जण जगताना आढळतात.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा