दादा,
दहा वर्षे झाली, तुमचे पत्र
नाही. तसेही तुम्ही पत्र फार लिहीतच नव्हता. फार पूर्वी सणासुदीला, नवीन
वर्षाला शुभेच्छा यायच्या, शेवटच्या काही वर्षात तर फक्त माझ्या वाढदिवसाला
"शुभेच्छा" यायच्या, आडव्या पोस्टकार्डवर टपोऱ्या सुंदर अक्षरात
लिहिलेल्या शुभेच्छा. शेवटच्या शुभेच्छा आल्या त्यालाही आता दहा वर्षे झाली

तुमच्या सुंदर अक्षराचे मला लहानपणापासून आकर्षण,
तुम्ही कधी टंकलेखन केले नाहीत, अशिलांच्या सर्व कामकाजाचे ड्राफ्ट
स्वत:च्या अक्षरात लिहून मग ते टायपिंगला जात. तुम्ही ऑफिस मध्ये नसलात कि
तुमची ती अक्षरे पाहायला मला खूप आवडायचे. अक्षर चांगले व्हावे म्हणून
तुम्ही लहानपणी जे काही केले ते करायचा मी प्रयत्न केला.
खांडेकरांच्या दुकानातून बोरू आणले, टाक आणला आणि शाईच्या दौतीत बुडवून
कागदावर लिहायचा प्रयत्न केला. शब्द उतरायच्या आधीच कागदावर शाईचे थेंब
पडायचे !!
वाचनाचे आणि लिहिण्याचे वेड लागले ते
तुमच्यामुळे. लहानपणी रात्री तुमच्या येण्याची वाट पाहत जागा राहायचो ते
साहित्य सभेतून तुम्ही गोष्टींची पुस्तके आणायचा म्हणून. केवढ्या गोष्टी
वाचल्या त्या वयात - गलीवरची यात्रा, तीन शिलेदार, रॉबिन हूड … शाळेत टिळक
जयंती, १५ आगस्ट साठी भाषणाची तयारी तुम्ही करून घ्यायचात. भिंतीला टेकून
उभा राहून ती पाठ भाषणे मी तुम्हाला म्हणून दाखवत असे. त्या वयात ते भाषण
लिहिणे मला जमायचे नाही, पण तुम्ही लिहून दिलेल्या भाषणांमुळे पुढे
हायस्कूल आणि कॉलेजात वादविवाद - परिसंवादाची तयारी करायचे वळण मिळाले.
नुसत्या
अभ्यासावर तुम्ही भर दिला नाहीत म्हणून मनाला आणि बुद्धीला एक सांस्कृतिक
वळण मिळाले. नाटकाकडे वळलो आणि त्यासाठी मग रात्री उशिरा परतू लागलो, अगदी
परीक्षेच्या दिवसात सुद्धा! पण तुम्ही कधी त्यावर बंदी घातली नाहीत. एकदा
बोलून दाखवलेत " ह्या वर्षी परीक्षेचा निकाल निकालात निघाला असता तर ही
नाटके बंद म्हणून सांगणार होतो ". इतका विश्वास ठेवलात कि त्याला मोडायचे
मन कधी झालेच नाही . मुलींना मोठे करताना हा "विश्वास ठेवण्याचा" विचार
खूप कामाला आला.