गुरुवार, सप्टेंबर २६, २०१३


कुठलीशी तिडीकच उठली …

बेमुर्वत बोललो, वागलो,
पहिल्यांदाच 'घेतल्या' नंतर
वागलो होतो तसा,
तेंव्हाही  उठवले होते
प्रश्नचिन्ह माझ्या स्वतंत्र
अस्मितेवर, अस्तित्वावर, अभिव्यक्तीवर
अन आता पुन्हा तेच,
मधल्या काळात मिळवलेले
सारे पोतेऱ्याने पुसून काढून !
  
अन बसलो  मग
कसनुसा होऊन,
आपलीच नख कुरतडत
आपल्याच दातांनी …।

जे मला अभिप्रेत नसते
ते वर्तनात उमटते
तेव्हाच मी पडतो काळा ठिक्कर
माझ्याच दर्पणात,
खंडीत होते माझेच सौदर्य
माझ्याच हातांनी … !

शोधतोय ती गर्दी मघाची
टाळ्या वाजवून मला चिथावणारी,
निघून गेलेली आता
दुसऱ्या तमाशाला
.
.
माझा तमाशा बनवून !