मंगळवार, ऑक्टोबर २७, २००९

अभिवादन एका नटश्रेष्ठाला


चित्तरंजन कोल्हटकर कालवश झाले। रंगमंचीय शक्ति ज्याला वश झालेली होती असा अभिनेता कालवश कसा होईल? कालवश झाले ते त्यांचे पार्थिव। शम्भू महादेव, बापू आणि चाणक्य ह्या त्यांच्या भुमिकांतुन मी सशक्त अभिनयाचा थरार प्रत्यक्ष पाहिलेला आहे। त्या आधी त्यानी साकारलेल्या भूमिका मला बघायला मिळाल्या नाहीत। गारंबीच्या बापूचा इन्दौरला प्रयोग झाला त्यावेळी त्याना भेटण्याचा योग निस्सीम त्यांच्यातील निस्सीम माणसाचे ही दर्शन झाले। गारंबीच्या बापूची पूर्ण टीम चहापानासाठी आम्हा हौशी रंगभूमि कलाकारांसोबत एका संध्याकाळी महाबळ्यांच्या घरी एकत्र झाली, गप्पांमधे शामिल झाली। त्या गप्पाना आठवत त्या महान कलाकाराला विनम्र अभिवादन!

सोमवार, ऑक्टोबर १९, २००९

सहज विचार

सणांचा आणि हवामानाचा जवळचा सम्बन्ध। म्हणुन लहानपणी आम्ही आरोळ्या ठोकायचो - "होळी जळाली, थंडी पळाली।" आणि ह्या थंडीची चाहुल लागायची दिवाळीला। दसर्याला रावण जळाला की दिवाळीचे वेध. तयारिची सुरुवात किल्ले बांधण्यापासून। कुठून कुठून गोळा केलेली माती, दगड, विटा, त्यांचा रचलेला डोंगर, त्यावर पेरायचे गहू; बांधायचे बुरुज; तयार करायच्या डोंगर वाटा। हवा कोरडी होत चाललेली, २-२ तास मातीत खेळ मग हात पाय फुटायला लागायचे. पण किल्ला तयार झाल्याशिवाय हे जाणवत नसे। हवेतला गारवा जाणवायचा तो अभ्यंगस्नान ह्या दुष्ट प्रकारासाठी पहाटे उठावे लागायचे त्या वेळी। उबदार पांघरुणातून बाहेर निघायला त्या नरकासुराची भीती घातली जायची। पण तेल मालिश, सुगंधी उटने आणि "पहिल्यांदा मी मोती साबण लावणार" ह्या अभिमानापोटी उठण्यासाठी स्पर्धा लागायची। गरम पाण्याचे पाहिले ताम्बे अंगावर पडले की कृतकृत्य जह्लायासराखे वाटे। ह्या सार्याची आठवण व्हायचे कारण यंदा अभ्यंगस्नान झाले ते थंड पाण्याने अन पहिला फराळ झाला पंखा लावून। घाम पुसत शुभेच्छा दिल्या, घेतल्या। पुन: पुन: deoderent चे फव्वारे मारत राहिलो। ग्लोबल वार्मिंग तुझे सलाम। ह्या नव्या नरकासुराने पाय रोवयाला सुरुवात केलेली आहे। त्याचा संहार करायला आपण मनापासून तयार झालो आहोतका? राजकारण, अर्थकारण ह्यांना स्वार्थकारणातुन बाहेर काढून समाजकारणासाठी लावणारे नेते आता तांतडीने पुढे आणायला हवेत। अन्यथा आमची पोरेबाळे आम्हाला माफ करणार नाहीत आणि माफीचे साक्षीदार व्हायला आम्ही जिवंतही असणार नाही. हे आव्हान स्विकारायला ज्याने त्याने स्वत:लाच आवाहन करायला हवे।

सोमवार, ऑक्टोबर ०५, २००९

भरकटलेला पाउस

यंदा पाउस वाट चुकला। ठरलेल्या दिवसाच्या आसपास हमखास कोसळणारा हा पर्जन्य कुठल्या अन्य ठिकाणी भटकायला गेला त्यालाच ठाउक। यंदा जुलाइ अगस्त कोरडा। अगदी आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा सुधा नाकासमोर वाहत राहिली। गणपति जाताजाता हे राव नाचाला हजर - ढींकढीकिर ढींकढीकिर करत! कोप्र्यात तिष्ठत उभी असलेल्या छत्रीला पुन: प्रतिष्ठा लाभली। पण आता मात्र कहर झाला। दसर्याचे सोने लुटून झाले तरी हा आपला पाय पसरून बसलेलाच। आता काय दिवाळीचा फराळ करुन जाणार? म्हणजे फटाक्यांचा बोजवारा! मुल्लाजीकी दारू फुस्स । कुणी याला आवरेल का?