सोमवार, ऑक्टोबर २२, २०१८

गाठोडे - पुरचुंडी सणवारांची


गाठोडे - पुरचुंडी सणवारांची

आज शरद पौर्णिमा. लक्ष्मी पूजनाचा दिवस. मी असे म्हटले तर काही लोक "मसाला दूधात काय भांग वगैरे टाकली का?" असा प्रश्न विचारू शकतात. एकूणच माणूस आपला तोच अनुभव खरा, आपला तोच विश्वास सत्य, आपण तेव्हढे महाज्ञानी ह्या भूमिकेतून फटकन निर्णय देऊन मोकळे होतात. काही वेगळ्या शक्यता असू शकतात ही लवचिकता क्वचितच बघायला मिळते. आज देशातला एक मोठा भूभाग कोजागिरी पौर्णिमा वर्षा ऋतूची समाप्ती आणि शरद ऋतूचे आगमन म्हणून चांदणीय रात्री मसाला दूधाचा आनंद घेतो. तर बंगाल, ओरिसा आसाम ह्या पूर्व भागात आजच्या रात्री लक्ष्मी पूजन होते. ज्या कार्तिकी अमावस्येला - दिवाळीला आपण लक्ष्मी पूजन करतो त्या दिवशी पूर्व भारतातले निवासी काली पूजन करतात.

अमावस्या हा दिवस बहुतेक लोक अशुभ मानतात, दिवाळी हा अपवाद ! अमावास्येला कुठलंही नवे  काम करू नये  असा एक संकेत पाळला जातो. १९९० साली चंद्रशेखर अचानक भारताचे पंतप्रधान होऊ घातले. मी त्यावेळी चेन्नईला रहात होतो. ते पदाची शपथ कधी घेतील याचा कयास बांधताना नागराजन हा सहकारी म्हणाला  " ऑफकोर्स ऑन न्यू मून डे." चंद्रशेखर हे बिहारी आहेत आणि त्यांच्या दृष्टीने अमावस्या  शुभ असू शकत नाही अशी शंका देखील त्याला आली नाही.              

दिवाळी सणाच्या अनेक कथा प्रचलित आहेत आणि त्यानुसार सण साजरा करायची पद्धत वेगवेगळी असेल वेगवेगळ्या भागात, मात्र तो साजरा संपूर्ण देशात होतो. असे सर्वच सणांचे नाही. राखी आणि होळी हे सण दक्षिणेत साजरे होताना मी बघितले नाहीत. चेन्नईतल्या सावकारपेठेत मात्र हे सण साजरे होत, कारण तिथली मारवाडी वस्ती. ज्या उत्साही वातावरणात महाराष्ट्र, गुजराथ येथे गणेशोत्सव साजरा होतो तसा  इतरत्र होत नाही. उत्तर भारतात तर गणेश चतुर्थीची सुट्टी देखील नसते. कुठल्या प्रदेशात कुठल्या सणाचे महत्व ह्या साठी त्या त्या प्रदेशातील बँक हॉलीडेस ची लिस्ट पहावी.

इंदूर मधील सणांची मजा आणखीन निराळी. होळकरांमुळे ह्या शहरावर महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रभाव बरीच वर्षे टिकला. त्यामुळे गुडीपाडव्याला घराघरांवर  उभारलेल्या गुढ्या मोजायला आम्ही निघत असू. स्नेहलतागंज, रामबाग, नारायणबाग, इमलीबाजार, नंदलालपूरा ह्या मराठी वस्तीतून फिरलो कि २००-३०० गुढ्या सहज मोजता येत. श्रावण मासी हर्ष मानसी येत असे तो सणांची रेलचेल असते म्हणूनच. मला आठवतंय, शाळांमध्ये श्रावणी सोमवार आणि शनिवार अर्धा दिवस सुटी असे , संध्याकाळी उपवास सोडायचा म्हणून. जन्माष्टमी देखील घरोघरी साजरी होई . फुलांची झकास आरास वगैरे करून लंगडा बाळकृष्ण आरामात लाड पुरवून घ्यायचा . आरास करायला फुले, पाने आमच्या मामाच्या "गुलशन नर्सरी'तून  आणायची. तळमजल्यावर राहणारे दद्दाजी (ठाकूर) हा सण जोरात साजरा करत. त्यांचा मोठा मुलगा - लल्लू भैया बाळाच्या रडण्याचा ट्या हा आवाज झकास काढे.                      
श्रावण सुरु होता होता गणेशोत्सवाची तयारी सुरु होई ती म्हणजे उत्सवाचे मंडळ निवडून  नाटक कुठले बसवायचे हे ठरवण्यापासून ...

               

रविवार, ऑक्टोबर १४, २०१८

गाठोडे - पुरचुंडी पहिली

गाठोडे - पुरचुंडी पहिली

एकेकाळी माझे बऱ्यापैकी वाचन होते. आसपासची प्रेमळ मंडळी त्याचे "आवड" म्हणून कौतुक करायची. त्या काळात टी व्ही नव्हता, घरातला एकमेव रेडिओ आमच्यापासून चार हात उंचीवर ठेवलेला असायचा. त्यातून तो देवकीनंदन पांडे हिंदी बातम्या आणि सुरजित सेन इंग्रजी बातम्या द्यायचे. मर्दानी खेळात होऊ शकणाऱ्या दुखापतींना मी घाबरायचो. आजच्या सारखे अभ्यासाला जुंपायचे अत्याचार पालक मंडळी मुलांवर करत नसत. ओळखीचे शिक्षक असलेल्या शाळेत एकदा दाखला झाला की पालकांची जबाबदारी संपायची. "जहागिरदार वकिलांचा मुलगा ना तू ?" हे वाक्य महिन्यात एकदा ऐकवून शिक्षक माझ्यावर धाक ठेऊन असायचे. अशा एकंदर वातावरणांत कसे कुणास ठाऊक छापील अक्षरे मला आकर्षित करायची. अक्षर ओळख घरातच झालेली. माझ्याहून सुमारे दोन वर्ष मोठ्या असणाऱ्या भावाची शाळेची पुस्तके मी वाचत असे. माझ्या वाचनात आलेली पहिली कविता "यु यु यु यु पपी पपी, खेळू आपण लपाछीपी"
महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर येथील कार्यकारिणीत वडील सक्रिय होते. ते तिथल्या पुस्तकालयातून आम्हा भावंडांसाठी गोष्टीची पुस्तके वाचायला आणत. सिंदबाद, गलीवर, तीन शिलेदार, गोट्या, हेमा आणि सात बुटके असेच भेटलेले.
मी पाच सहा वर्षांचा असताना वडिलांनी सरकारी नोकरी सोडली आणि वकिली सुरु केली. दोन तीन वर्षातच त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरु केली आणि ऑफिस घरातच ठेवलं. त्यामुळे आपसुकच आम्ही कुठल्याही अधोगतीपासून वाचलो हे नक्की. वय वाढत गेलं आणि मग किशोर, इंद्रजाल कॉमिक्स हे घरी रतीब टाकू लागले. वाचन संस्कृती वाढीला लागली. वय वाढलं आणि मग ना. सी. फडके, भाऊ पाध्ये, दळवी, यांना घरात यायची परवानगी मिळाली. वाचता वाचता वाचा फुटली मग वेगवेगळ्या विषयांवरच गंभीर वाचन सुरु झालं. सत्यकथेत गटांगळ्या खाल्ल्या. पिपांत उंदीर नेमके कशाने मेले ह्याचा सौंदर्यशास्त्रीय शोध घेऊन पाहिला. ओशोंचे 'संभोग से समाधी की ओर ' घरी आणून वाचले आणि वडिलांना वाचायला दिले ! थोडक्यात इतर गोष्टींप्रमाणे वाचनात सुद्धा माझ्यावर वडिलांनी कुठलेही सोवळे ओवळे थोपले नाही.
अशातच इंग्रजी पुस्तके वाचावी असे वाटून गेले. अर्थात माझे इंग्रजी विज्ञानलेले. त्यामुळे ते Thou, Thee, Thy, Thine and Ye मला न पेलवणारे. इंग्रजी अभिनव साहित्य हा विषय मी आजपर्यंत गुगलून देखील काढलेला नाही ! इंग्रजी चित्रपटांमुळे काही पुस्तके वाचाविशी वाटली त्यातले माझी वाचन प्रतिष्ठा वाढवणारे Gone With The Wind हे एकमेव पुस्तक.
अशातच मला पुस्तकांची एक भली मोठी लॉटरी लागली. माझा चित्रकार, मूर्तिकार आणि आर्किटेक्ट भाऊ मुंबईला शिकायला आला. पार्ल्यात कुणीतरी रूमपार्टनर शोधून तो रहात असे. एका पार्टनर जवळ पुस्तकांचं कलेक्शन होतं. तो काही कारणाने ते काढून टाकणार होता.
बंधूंनी ते सुमारे ५० पुस्तकांचं कलेक्शन १०० रुपयात विकत घेऊन पुढील सुट्टीत इंदूरला येताना मला भेट दिलं. त्यातून बाहेर पडले अॅलिस्टर मॅकलीन, इर्विन स्टोन, गुरुनाथ धुरी चे ग्लोरिया , पुशिंची सावित्री, हेरॉल्ड रॉबिन्स, इरविंग वॉल्लेस, इयान फ्लेमिंग, स्पर्शाची पालवी ..... ह्या पुस्तकांनी माझ्यासोबत सुमारे वीस वर्ष उत्तर दक्षिण प्रवास केला. त्यांत भर पडत गेली. बरीचशी पुस्तके खिळखिळी होऊन निसटून गेली, काही वाटून झाली. काही येणार असे सांगून गेली पण वाट चुकली. मला त्याची खंत नाही. ती त्यांचं देणं देऊन गेली.
आज हे सारं आठवायचं कारण १२ ऑक्टोबर. मला वाचायला मदत करणाऱ्या ह्या दोन्ही व्यक्तींच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस. आज बंधूंचा जन्म दिवस आणि आमच्या वडिलांचा स्मृती दिवस.

गाठोडे

 

आयुष्याची ६ दशके पूर्ण झाली कि खुंटीवर टांगून ठेवलेले गाठोडे खाली घ्यायला हरकत नसते कारण आता त्यात भरण्यासारखे काही नसते. साधारण २१,६०० वेगवेगळ्या रंगीबेरंगी पुरचुंड्या त्यात कोंबलेल्या असतात. त्या पुरचुंड्या आता पुन्हा नजरेखालून घालायला जीव कासावीस होतो. हातात येईल ती पुडी उघडायची. आणि जमेल तितके त्रयस्थ होऊन त्यात जपून ठेवलेल्या भावनेला सामोरे जायचे. कधी कासावीस व्हायचे, कधी हसून मान झटकायची, कधी आत असलेली जळमटे झटकून टाकायची. बघू या किती पुरचुंड्या उघडल्या जातात  ...


पाण्यात वाहत्या, पाय आता 
सावरायचे सांग काय आता 
गाठोडे झाले रिते, तर बरेच आहे 
वाहील वस्त्र मलीन, बरेच आहे ....