गाठोडे - पुरचुंडी दुसरी
२०१० साली नोकरीच्या चाकोरीतून सुटका झाली, ३५ वर्षांचा पसारा बाहेर निघाला. अनेक गोष्टी. त्या आवरता आवरता कागदाच्या सहाणेवर शब्द उगाळायला पुन्हा सुरुवात झाली.
"प्रत्येक वस्तूभोवती गुंता पागल भावनांचा, आणि
इतिहास घडल्या, बिघडल्या आणि अवघडल्या क्षणांचा
झरझर सरकतो डोळ्यांपुढून"
हा जो आपला इतिहास असतो तो दोन प्रकारचा, एक इतरांना दिसणारा घटनात्मक आणि एक आपल्याला आणि फक्त आपल्याला ठाऊक असलेला भावनात्मक. हा इतिहास घडण्यात आपली खाजगी वाचन संस्कृती एक भूमिका बजावते तसाच आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांचा, मित्रांचाही एक सहभाग असतो.
माझे पहिले मित्र अर्थातच इंदूरच्या ज्या वाड्यात मी माझ्या आठवणीतली पहिली २४ वर्ष काढली त्या वाड्यातले. हा दुमजली बंगलीवजा वाडा, मागे औटहाऊस, पुढे खेळायला आंगण, समोर एक मोकळी जागा आणि लाकडं कोळशाची टाळ (वखार), डावी उजवीकडे असे आणखी दोन बंगले. गल्लीच्या कोपऱ्यावर घडीवाली मशीद - हा आमचा लँड मार्क ! डावी उजवीकडचे बंगले स्वतंत्र मालकीचे. आमच्या वाड्यात वरती तीन, खालती तीन आणि औटहाऊस मध्ये चार अशी भाड्याने राहणारी १० कुटुंब. आम्ही वरच्या अर्ध्या मजल्याचे जहागिरदार. उरलेल्या अर्ध्या भागात दोन बंगाली कुटुंब. तळमजल्यावर आमच्या खालच्या अर्ध्या भागाचे ठाकूर एक हिंदी भाषी कुटुंब आणि अर्ध्या भागात दोन मराठी कुटुंब. औटहाऊस मध्ये तीन मराठी आणि एक माळवी कुटुंब. आमच्या बाजुच्या स्वतंत्र बंगल्यात एक सिंधी कुटुंब. एकुणात बहुभाषी परिसर. दुसऱ्या भाषा शिकायचं आणि त्या समजून घ्यायचं बाळकडू इथेच मिळालं. "आयकोम बायकोम तडातोडी, जोदूर मास्टर शोसूर बाडी" हे बंगाली बडबडगीत मी सुबु - देबू बरोबर शिकलो. ह्या तोडक्या मोडक्या बंगालीमुळे मला पुढे कलकत्त्यात ट्रैनिंग वर्कशॉप करायला गेलो कि रॅपो बिल्ड करायला सोपे जात असे. "आमी बांगला बुझते पारी, बोलते पारी ना" असं सुरुवातीलाच सांगायचं आणि सुटायचं.
मात्र एका बाबतीत आमचं घर एकदम अल्पसंख्य. आम्हाला सोडून इतर सारे रविवारी " आज काय स्पेशल" चा शो चालवणारे. त्यामुळे बहुरंगी बहुढंगी वास घ्यायला नाक लौकर शिकले,जीभ मात्र ह्या बाबतीत एकदम ढ ! तिला वळणावर आणायला मला लखनऊ, लुधियाना ह्या शहरांचा काही काळ पाहुणचार घ्यावा लागला. अर्थात ह्या मांसाहारी आहाराने अंगावर काही विशेष मांस चढलं नाही त्यामुळे ते त्यागलं.
वाड्यातल्या मित्रांशी खेळताना भांडण झालं की माझा किंवा भावाचा उद्धार "कढी भाऊ" असा होई. 'कढी भाऊ' हे इंदूरातील मराठी माणसांना खाली दाखवण्याचे उदबोधन, जसे मुबंईत "भैया" हे उत्तर भारतीयाना कमी लेखायचे ! काही दिवस मी खेळातून वगळला जाई. मी त्यामुळे कसनुसा होई. घराच्या गॅलरीतून किंवा खिडकीतून त्यांचा खेळ पहात राही. पुस्तक वाचत बसे. मी लहानपणी तसा अशक्तच होतो. त्याचं कारण मला आईचे दूध मिळू शकले नाही. अर्थात ही सगळी ऐकीव माहिती. त्यामुळे शाळेत सुद्धा उशिराच जाऊ लागलो. डॉक्टरांनी दुधातून अंड खाऊ घाला असा सल्ला दिला. आई वडिलांसाठी हे कठीण काम. मुळात आपल्या ब्राह्मण्याचा त्यांना - विशेषतः वडिलांना अभिमान. तो ते इतरांना बोलून सुद्धा दाखवत, अगदी इतरांच्या अभक्ष्य (?) खाण्याला कमी लेखत. आता आपल्या शेंडेफळाला सशक्त करायचं तर हे अंडी आणण्यापासून ते फोडून दुधात घोळवून देण्यापर्यंत काम वडिलांना करावं लागणार होतं. त्यांनी ते केलं. आम्हाला एक सांगितलं "कुणाला सांगू नका हे खाता म्हणून, औषध आहे हे !" तेच एक अंड घेऊन यायचे, आईने ठरवून दिलेल्या एका ठरलेल्या ग्लासात फोडायचे, दूध टाकून फेटायचे आणि मला नाक बंद करून पी असं सांगायचे. एक समजलं, खाण्यापिण्यात पाप - पुण्य असं काही नसतं. मात्र आता माझ्या जवळ "कढी भाऊ" चा डाग धुऊन काढायचा साबण हाती लागला. आमच्या वाड्यात एक ब्रेड विकणारा येत असे. ठाकूर साहेब त्याचे नियमित गिऱ्हाईक. इतर मंडळी देखील घेत. मला दूध ब्रेड आवडत असे. मग कधी तरी छोटी ब्रेड विकत घ्यायला २५ पैसे मिळत. एकदा खिडकीतून खाली आलेला ब्रेड वाला पाहिला आणि आईकडून २५ पैसे घेण्यात यशस्वी झालो. लाकडी जिना धावत उतरून पुढील अंगणात आलो. ठाकूर साहेबांच्या मोठ्या ब्रेडचे सुरीने स्लाईस कापण्यात येत होते. मी वाट पाहत उभा राहिलो. ठाकूर साहेब माझ्याशी गप्पा मारत, माझी गंमत सुद्धा करत. त्यांना पत्ते - ब्रिज - खेळायला आवडे. ते पुढच्या अंगणात खुर्च्या टेबल मांडून आपल्या पार्टनर्स ची वाट पहात बसत. त्यांनीच मला सात हात हा खेळ खेळायला शिकवले. मला त्यांनी विचारले , " अरे श्री, तुम इस ब्रेड का क्या करोगे? आम्लेट तो तुम खाते नही. तुम तो कढी भाऊ हो". पायरीवर बसलेला त्यांचा धाकटा मुलगा कुत्सितपणे हसला. मी बोलून गेलो " मैं रोज दूध के साथ अंडा खाता हूं, आज ब्रेड खाऊंगा !!!" मी खसा खसा साबण घासून "कढी भाऊ" हा डाग धुऊन काढला. संध्याकाळी कोर्टातून वडील परतले , गेटपाशी सायकल वरून उतरले आणि वाड्यात शिरले. ठाकूर साहेबांनी लगेच "जागीरदार साहब आज तो आपकी पोल खुल गई !!" असं म्हणत त्यांना श्रीचा अंडे का फंडा सांगून टाकला ! पुढे काय झालं ते सांगण्यात काही अर्थ नाही. वडील मला मारत नसत पण .... पुढे कुणी माझ्या शेजारी बसून आम्लेट खाल्लं तरी मला उलटीची भावना होत असे. ह्या भावनेवर मी विजय मिळवलाच. ते पुन्हा कधी, ओघाओघाने.
विचारी मनाला जगण्यासाठी सूत्र सापडली . एक, कुणाच्या वेगळेपणाला उपहासाचा विषय बनवू नाही. वेगळेपण हे वगळण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी असतं. पुढे वेगवेगळ्या प्रदेशात रहाताना हे सूत्र फार कामी आलं. आपल्या देशाचा विस्तार आणि वैविध्य पहाता देशातील छोट्या शहरात राहणाऱ्या सामान्य माणसांना ह्याची जाणीवच नाही. उ.प्र. मधील नेपाळ लगत असलेल्या लखीमपूर (खिरी) गांवात दोन वर्ष रहात असताना शेजारी राहणाऱ्या बायका स्वातीला "मतलब आप मद्रासी है " असे म्हणत. त्यांना हिंदी पंजाबी सोडून दुसऱ्या भाषांची फार थोडी माहिती होती.
दुसरं अधिक महत्वाचं सूत्र आयुष्यात लपवण्या सारखं काही करू नाही आणि जे करता ते लपवू नाही. लाज आणि अपराध-भाव सांभाळण्यात फार ऊर्जा वाया जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा