बुधवार, ऑक्टोबर ०५, २०१६

आठवणी
दादा,
दहा वर्षे झाली, तुमचे पत्र नाही. तसेही तुम्ही पत्र फार लिहीतच नव्हता. फार पूर्वी सणासुदीला, नवीन वर्षाला शुभेच्छा यायच्या, शेवटच्या काही वर्षात तर फक्त माझ्या वाढदिवसाला "शुभेच्छा" यायच्या, आडव्या पोस्टकार्डवर टपोऱ्या सुंदर अक्षरात लिहिलेल्या शुभेच्छा. शेवटच्या शुभेच्छा आल्या त्यालाही आता दहा वर्षे झाली   
तुमच्या सुंदर अक्षराचे मला लहानपणापासून आकर्षण, तुम्ही कधी टंकलेखन केले नाहीत, अशिलांच्या सर्व कामकाजाचे  ड्राफ्ट स्वत:च्या अक्षरात लिहून मग ते टायपिंगला जात. तुम्ही ऑफिस मध्ये नसलात कि तुमची ती अक्षरे पाहायला मला खूप आवडायचे. अक्षर चांगले व्हावे म्हणून तुम्ही लहानपणी जे काही केले ते करायचा मी प्रयत्न केला. खांडेकरांच्या दुकानातून बोरू आणले, टाक आणला आणि शाईच्या दौतीत बुडवून कागदावर लिहायचा प्रयत्न केला. शब्द उतरायच्या आधीच कागदावर शाईचे थेंब पडायचे !!

वाचनाचे आणि लिहिण्याचे वेड लागले ते तुमच्यामुळे. लहानपणी रात्री तुमच्या येण्याची वाट पाहत जागा राहायचो ते साहित्य सभेतून तुम्ही गोष्टींची पुस्तके आणायचा म्हणून. केवढ्या गोष्टी वाचल्या त्या वयात - गलीवरची यात्रा, तीन शिलेदार, रॉबिन हूड … शाळेत टिळक जयंती, १५ आगस्ट साठी भाषणाची तयारी तुम्ही करून घ्यायचात. भिंतीला टेकून उभा राहून ती पाठ भाषणे मी तुम्हाला म्हणून दाखवत असे. त्या वयात ते भाषण लिहिणे मला जमायचे नाही, पण तुम्ही लिहून दिलेल्या भाषणांमुळे पुढे हायस्कूल आणि कॉलेजात वादविवाद - परिसंवादाची तयारी करायचे वळण मिळाले.

नुसत्या अभ्यासावर तुम्ही भर दिला नाहीत म्हणून मनाला आणि बुद्धीला एक सांस्कृतिक वळण मिळाले. नाटकाकडे वळलो आणि त्यासाठी मग रात्री उशिरा परतू लागलो, अगदी परीक्षेच्या दिवसात सुद्धा! पण तुम्ही कधी त्यावर बंदी घातली नाहीत. एकदा बोलून दाखवलेत " ह्या वर्षी परीक्षेचा निकाल निकालात निघाला असता तर ही नाटके बंद म्हणून सांगणार होतो ". इतका विश्वास ठेवलात कि त्याला मोडायचे मन  कधी झालेच नाही . मुलींना मोठे करताना हा "विश्वास ठेवण्याचा" विचार खूप कामाला आला.
एम एस्सी करताना पहिल्या पेपरच्या गोंधळामुळे आपला फर्स्ट क्लास जाणार हा हिशेब लावला आणि मी शेवटच्या पेपरच्या दिवशी ड्रॉप घ्यायचा असे ठरवले, तसे तुम्हाला, तुम्ही कोर्टात जायच्या आधी, सांगितले आणि लगेच मेटिनी शोला निघून गेलो - तुम्हाला टाळायचे म्हणून !
तुम्ही एका चकार शब्दाने मला माझ्या निर्णयाबद्दल विचारले नाही. एका वयानंतर मुलांना निर्णय स्वातंत्र्य हवे हा विचार तुम्ही असा मनावर बिंबवलात!
आपल्यात मनमोकळे संवाद असे कधी झालेच नाहीत … मात्र अशा अनेक प्रसंगात तुम्ही मौनाने नेमका संवाद साधलात. पुढे चांगल्या नोकरीच्या शोधात मी हातात आलेल्या किमान तीन नोकऱ्या सोडल्या, दोन  वर्षे 'बेरोजगार ' म्हणून अस्वस्थ जगलो मात्र तुम्ही कधी आधार काढून घेतला नाहीत. ह्या साऱ्या काळात तुमचे माझ्यावर बारीक लक्ष मात्र असे. माझ्या वाचनात रसेल, कृष्णमूर्ती, राधाकृष्णन येऊ लागल्यावर तुम्ही विचारलेत " काय विचार आहे, हिमालय गाठायचाय का?"  मी काहीच बोललो नाही …  

मी काहीच बोललो नाही … हे असेच होत राहिले, तुम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांच्या बाबतीत. हा ही बहुतेक तुमचाच वारसा !!

१२ ऑक्टोबर २०१५
 

प्रामाणिकपणाची किंमत


चाललेल्या संभाषणाने ते अस्वस्थ होऊ लागले  आणि अचानक गरजले , " हे पहा, आता पुरे, तुला वाटत असेल तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस"

त्याच्या ह्या गर्जनेने ती क्षणभर गांगरली मात्र लगेच स्वत:ला सावरून नम्रतेने म्हणाली, " काय झाले, नेमका कशाचा त्रास झाला तुम्हाला?"  

" कसलाही नाही" ते धुसफुसले.

" मला ठाऊक आहे, माझ्या बोलण्यात नक्कीच असे  काही आले  ज्याचा तुम्हाला त्रास झालाय. सांगाना, तुमच्या शिकवणीविरुद्ध काही मी वागले बोलले  का? "  

"…… "

" मला सांगा न प्लीज. तुम्ही नेहमीच मला मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे मनातले सांगावे असे सांगत आला आहात. आणि आता तुम्हीच तसे करत नाही आहात"

" ओ..के "

" सांगा ना, सांगाना प्लीज." डोळ्यात साचू लागलेले पाणी ती थोपवू पाहत होती. आपल्यामुळे ते दुखावालेत ह्या बद्दल आता  तिची खात्री झाली होती. " माझ्यावर प्रेम आहे ना तुमचे ? मग सांगा, माझे काय चुकले ज्यामुळे तुम्ही दुखावलात ? मी पुन्हयांदा तसे खचितच वागणार नाही" 

एव्हाना तेही सावरले होते. " अग, मला अचानक जाणवले, आपल्यावर अवलंबून असणारयांना प्रामाणिकपणे मोकळे बोला असे सांगणे खूप सोपे असते. मात्र ते तसे वागले तर … ते सहन करणे … कठीण जाते , खूप कठीण"

ती त्यांना बिलगली, हुंदके देत म्हणाली " माझे तुमच्यावर नितांत प्रेम आहे.  मी तुम्हाला पुन्हा असे कधीच दुखावणार नाही. वचन देते"

" नको, धैर्याने वाग. आपल्या भावनांशी प्रामाणिक रहा" ते तिच्या मस्तकावर थोपटत म्हणाले, "  मला शूर होण्यात मदत कर, आपल्या भावनांना मोकळे करत रहा!!"

तिने मान ताठ उंचावून त्यांच्या कडे पाहिले. तिचा आपल्यावर विश्वास बसलाय असे त्यांना वाटेना … आणि तिलाही …

दोघांना एक मात्र कळून चुकले, प्रामाणिक राहण्याची एक किंमत मोजावी लागतेच !

- श्रीधर जहागिरदार