सोमवार, डिसेंबर १५, २०१४

श्वास


" तुम्ही काय शिकला आहात?" हा सवाल आला कि मी शरमतो. जे शिकलो ते कधी  कामास आले नाही आणि ते आता विसरूनही गेलो.
"तुमचा कविता संग्रह असेल ना ?"
हा प्रश्ण मला नेहमीच कसनुसा करून जातो. कारण अजूनही मला कविता जमतात असे वाटत नाही. कारण मला कवितेचे शास्त्र समजत नाही. 
" तुम्ही बँकेत काम करत होता ना " असे कुणी विचारले कि मला धडकी भरते, कारण आता ही व्यक्ती मला अर्थकारणावर किंवा वित्त संबधी प्रश्न करणार अशी भीती वाटते. ह्या पैकी कुठलाही विषय मी कधी शिकलो नाही, त्यामुळे आपले पितळ उघडे पडेल असे वाटू लागते. 
" प्रशिक्षण क्षेत्रात तुम्ही जवळ जवळ २५ वर्षे काम केलेत, ह्याचे शिक्षण कुठे मिळते?" अशी पृच्छा झाली कि मी नजर चुकवतो कारण मी असले कुठलेही शिक्षण घेतले नाही"
   
पण ही भीती, लाज, शरम, सर्व त्या दिवशी दूर झाले ज्या दिवशी योग शिकायला आलो. आणि समजले कि साठ वर्ष जगलो पण मी योग्य प्रकारे श्वास घेत नाही !!!   आणि माझ्या सारखे असे योग्य प्रकारे श्वास न घेता बरेच जगलेले बरेच आहेत.
काय म्हणता?

रविवार, नोव्हेंबर २३, २०१४

"संग, संवाद, संवेदना" - पेपर कोलाज मधून प्रगटलेला एक मानवीय संबंधांचा शोध

आपल्या परिचयाच्या माणसाचा आपल्याला अनेक वेळा नव्याने शोध लागत असतो. श्रीराम जोग हा आमच्या इंदोरच्या सांस्कृतिक जगातला एक सळसळता झरा. रंगभूमीवर निस्सीम प्रेम असलेला आणि सातत्याने नाटकातून अभिनय, दिग्दर्शन करत त्याने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा आणि इतर स्पर्दातून अनेक पारितोषिके  मिळवली आहेत.  ह्या वर्षी त्याने दिग्दर्शित केलेले "हे घ्या एक फूल " हे नाटक नागपूर केंद्रातून प्रथम आले. दिग्दर्शन आणि अभिनय अशी व्यक्तिगत पारितोषिकेही त्याने पटकावली.  इंदोरला अधून मधून गेलो कि श्रीराम भेटतो, बहुतेक करून कुठल्या तरी लग्नाच्या रिसेप्शन मध्ये. मात्र श्रीराम मधला कलाकार मला बहुतेक इंदोर बाहेर भेटण्याचा योग असावा.

त्याच्यातला अभिनेता मला १९९० साली अहमदाबादला भेटला.  आणि त्याच्यातला चित्रकार दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या जहांगीर आर्ट ग्यालेरीत. त्याच्या पेपर कोलाजच्या सुमारे १२५ कलाकृतींचे प्रदर्शन सुरु आहे. "संग, संवाद, संवेदना" अशी थीम असलेले हे प्रदर्शन. पेपर कोलाज हा प्रकार कलाक्षेत्रात तसा उच्च वर्णीय मनाला जात नाही असे त्याच्याच बोलण्यात आले. मला मात्र कागदावर उमटलेली कुठलीही कला आवडते, आकर्षक वाटते. अज्ञानी माणसाचे हे चांगले असते. ते कुठल्याही वादात न पडता कलेचा आस्वाद घेऊ शकतात. श्रीरामच्या ह्या सर्व कलाकृतीतून माणसातील संवाद आणि संवेदना व्यक्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. घडवलेली सर्व माणसे  सुस्पष्ट आहेत आणि ती शोधावी लागत नाहीत. (हल्ली जिवंत माणसातला माणूस सुद्धा शोधावा लागतो !) त्यांच्यातील परस्पर संबंध देखील सहज प्रगटतात. मग ते एखादा राष्टीय दिवस साजरा करायला स्कूटर वर  निघालेले कुटुंब असो, एखादे प्रेमी युगल असो कि दोन सख्या असोत. ही सारी चित्रे मासिकातली रंगीत पाने हाताने फाडून मग चिटकवून तयार केलेली आहेत. मनात असलेला रंग तयार करणे सोपे असावे मात्र हवा तश्या रंगाचा कागद मिळणे कठीण! त्यातून जर एखाद्या रमणीची साडी विशिष्ट रंगातली दाखवायची असेल तर? श्रीरामची चिकाटी म्हणून मला कौतुकास्पद वाटते.  चित्रातली माणस एकमेकाशी संवाद साधताना दिसतात, त्यांचे कोम्पोजिशन बघताना  श्रीरंग मधला नाट्य दिग्दर्शक जाणवत राहतो. कागदाच्या तुकड्यातून हवी असलेली देह बोली प्रगट  करणे सोपे नाही कारण हे कागद कुठल्याही रेखाकृतीवर चीटकावलेले नाहीत! 

परवा भेटल्यावर श्रीरामने आधी दिलेली बातमी : " मी बँकेच्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली " तो घेत असलेला मोकळा श्वास त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. बँक आणि कला ह्यांचा खरे तर अर्थाअर्थी संबंध नाही मात्र बर्याच जणांना बँकेत नोकरी करत असताना त्यांच्या जीवनातला खरा अर्थ उमगला हे मानायला हवेच ! बँकेचे हे ऋण श्रीराम देखील मान्य करेल …
निवृत्ती नंतर श्रीराम पूर्णपणे रंगभूमी आणि चित्रकलेत स्वत:ला झोकून देईल आणि आपली कला साधना अधिक मोकळेपणाने सुरु ठेवेल ह्यात शंका नाही
मित्रा, पुढील 'अर्थ'पूर्ण जीवनासाठी अनेक शुभेच्छा !! 


गुरुवार, जून १२, २०१४

स्थानापन्न


मी 'नुसता' असण
सहन होत नाही त्यांना
कारण त्यांना घेता येत नाही
निर्णय … माझ्या स्थानापन्नतेचा (म्हणे !)
खर तर  माझ्या विपन्नतेचा …
प्रथम दर्शनी न्याहाळतात
माझ्या 'नुसते'पणा भोवतीचे
पोषाखी आवरण, आणि मांडतात
आडाखे माझ्या सभ्यता / संस्कृती चे
निमुळत्या लेंग्याचे आखूडपण,
धोतराच्या सोग्याची लांबी, 
विजारीच्या कापडाचा पोत,
कपाळावरील टिळ्याचा रंग, आकार, ठिकाण , 
आणि परस्पर ठरवतात कळप माझा!
कळपाविना 'नुसतं' असण
मान्य कां नसाव यांना ?
कळप निरपेक्ष स्वागताचे वाण
बसत नाही त्यांच्या स्वागत यंत्रणेत ….
 
हळूच विचारतात नांव,
आडा सकट !
नुसत्या पोहरयावरून
समजत नाही माझ नेमकं पाणी….
आणि मग ते निश्चित करतात
मनातल्या मनात माझ्या विचारांचा घाट,
मी काही बोलण्याआधीच !
खड्ग परजायचं कि फूल सजवायचं
हे ठरवायचं असत ना,
काही ऐकण्या आधीच !!

काही भौगोलिक संदर्भ
शोधत रहातात माझ्या
घामाच्या दर्पातून, वस्त्र मालीन्यातुन,
दगडा काट्यांनी सोलपटलेल्या
अनवाणी पायातून ठिबकणाऱ्या रक्त थेंबातून,
'नुसत्या' जखमांनी मन द्रवत नाही त्यांच, 
जिवंत ठेवलेले असतात त्यांनी मनांत
बरबटलेले शिलालेख संस्कृतीच्या नांवाखाली,
उपचारासाठी संदर्भ वापरतात त्यांचे … 
आणि चिरंजीव होते माझी जखम
शतकांच्या विषाणूंनी ग्रस्त !!

काहीही मान्य करण्याआधी
ते असावच लागतं त्यांच्या सारख
त्यांच्या तोलाचं, त्यांच्या मोलाचं
म्हणून त्यांच्या घराच्या ओसरीवर
निवांत पहुडलेला विपन्न फकीर
हाकलून लावतात ते …
आणि तो दिसेनासा झाला
कि करतात स्थानापन्न
आलिशान महालात सिंहासनावर
स्वर्णाभूषणांनी मढवून 
आरत्या ओवाळायला
प्रतिमा त्याची !!!

- श्रीधर जहागिरदार
१२-०६-२०१४

सोमवार, मे १२, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी ….....६


अध:पतनाला फ़्रिक्शनलेस चाकं असली पाहिजेत. म्हणून त्याला टाळणच योग्य . एकदा का त्यावर पाऊल पडलं कि तोंडघशी पडण अटळ. 
स्वत: बद्दलचा आदर, आत्मविश्वास, मनाची दृढता ह्या साऱ्याची  परीक्षा त्या एका पावलावर अवलंबून असते. आदर्शवादाच्या चौकटीत सजून दिसणारे विचार विकारांच्या वावटळीत उध्वस्त होतात. उरते ती तूफान येउन गेल्यानंतरची भीषण विराणता … सार संपल्याची जाणीव …
विकारांच्या प्रवाहात वाहून जाणारे विचार पुन्हा किनार्याला लागू शकण अशक्य, लागले तरी त्यांना मोडकळलेल्या होडीचच रूप उरत. 
माणसाच्या मनात खोल दडून बसलेलं नेमक असत तरी काय? देवपण, माणूसपण कि हैवानपण ? मानव्याची जोपासलेली सारी फुलं विकाराच्या नुसत्या धगीन सुद्धा कोमेजून जातात. कमावलेली शक्ती, वाढवलेली बुद्धि, समजून घेतलेला विवेक, जोपासलेली मूल्य, सारं सारं  नाहीस होत एका क्षणात ….
मग चिरंतन ते काय? जनावारपण ? खरा कोण? सैतान? ….वाचनातून, चिंतनातून, मननातून, 'तयार ' झालेलं मन खरच 'तयार' झालेलं असत? कि निव्वळ वरवरचा मुलामा म्हणूनच एका जनावरावर सभ्यतेचा माणसाचा दर्प येणारा मुखवटा चढवलेला असतो?
विकारापासून दूर पळण  हे विकाराच्या आकर्षणाच्या भीतीपायीच स्वीकारलेल असत ना ? कारण मुळातच जर अनाकर्षण असेल तर कुठलाही प्रयत्न न करता माणूस 'कोरडा' राहू शकतो.  उलट पळण  हे आकर्षणाची सुप्तावस्थेत वाढच करत असत आणि म्हणूनच पहिल्या पावलासरशीच जमीनदोस्त व्हायची वेळ येते.
आणि शुद्ध आल्यावर, आपल पळण ही सुटका नव्हती हे उमगल्यावर, आपल्या भोवतीचा पिंजरा हा बिनगजाचा होता हे दिसल्यावर जाणवतो तो पराभव ! पराभव स्वत:चा स्वत:कडून … ह्या प्रत दुसरे मरण नाही,  स्वत:च्या उध्वस्तपणास स्वत:च कारणीभूत होण ह्या सारखी दारूणता नाही !!!
आणि इतकं सार होऊनही, आतून तुटून, मोडून, कोलमडून, उध्वस्त होऊनही इतरेजन जेंव्हा तुमच्या तेजोवलयित व्यक्तिमत्वाचा उदोउदो करतात तेंव्हा कोण कुणाची वंचना करत, कोण फसवत आणि कोण फसत  हा गोंधळच सुटत नाही.
ज्या वलयात, ज्या प्रभेत खोटेपणाला खरेपणा येतो, मृगजळातून तहान शमते, आकाश स्पर्श होते; त्या प्रभेसारखा, त्या तेजासारखा दुसरा अंधार नाही आणि त्या  खोटेपणाने,त्या मृगजळाने, त्या आकाशाने अनुभवलेल्या जिवंत मरणासारखे दुसरे मरण नाही !

शनिवार, एप्रिल २६, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी ४

पहिल पान ! 
कुणासाठी ? 
अजून ही प्रश्नांची सोबत संपत नाही. उत्तरं माहित नसलेले हे प्रश्न पावसाळी ढगांसारखे मनभर धून येतात आणि तसेच लोंबकळत रहातात, बरसत नाहीत, जातही नाहीत. मळभाचे दाट थर मात्र वाढतच रहातात. पावसाळी ढगांसारखे धावून येणारे हे ढग जलद मात्र नसतात; असतात निर्जल, फिकट, पांढुरके ढग. स्वत:चा माझ्या अस्तित्वाशी संबंध दर्शवणारे, लोंबकळत राहणारे, वटवाघूळा  सारखे अवस्थाहीन !

वटवाघुळ  !!!! भाळावर बहुदा तोच गोन्दवलेला असणार.  पण निव्वळ प्रतिक मात्र … कारण खऱ्या वटवाघुळा उ:शाप असतो निशा - दृष्टीचा, रात्रीच्या अंधारात गवसते त्याला आकाश, जाणवतात भरारी घेऊ शकणारे पंख. मात्र भाळावरच्या माझ्या वटवाघूलांच्या स्वप्नाचे गरुड देखील देखील उडत नाहीत. डोळाभर माखून असते नाकर्तेपणाची निर्लज्ज काळी वेदना …. वेदना, पण ती तरी सच्ची आहे का? भळभळत्या जखमेपोटी निपजणाऱ्या वेदनेला असते आकाश भेदून काढणारी भव्यता आणि इथे टचकन थेंबही येत नाही तेजोहीन नेत्रात … जखमांचा पत्ता नाही कि जखमाच वांझ आहेत म्हणून वेदनेची चव नाही ?  ऐलथडी - पैलथडी पण ज्याला ऐल नाही आणि पैल हे नाही अशा प्रवाहात अडकलेला मी …

पण मग आकाश आकाश म्हणून काल ज्याचा जयजयकार झाला तो कोणाचा ? आकाश … एक निरस्तित्व ! पण आक्षितिजतेच्या पुण्याईन पण फसव्या पण देखण्या निळ्या झिलाईन भव्यतेच मानक झालेलं … आणि मी जर आकाश असलो तर चंद्र सूर्याचे डोळे चेहऱ्यावर मढवायला  हवे. पण चंद्राची शीतल दाहकता आणि सूर्याची तेजाळ प्रसन्नता सहन होईल मला? नसेल तर हे उधारीच आकाशपण झुगारून द्यायला हवे पण कसे शक्य आहे ते? जे दिसत ते नाकारण्याची अपार्थिव ताकद आहे कुणात! दिशांतापर्यंत पसरलेली मुग्ध निळाई आकाशाची नाही तर कशाची प्रतिक?

प्रतिक ! प्रतिक ! प्रतिक !स्वत:च्या अस्तित्वाभोवती पसरलेलं एक मुखवटेदार धुकं. … धुकं ज्यात सामावलेली असते एक गूढ रम्य सृष्टी. प्रतिक म्हणजे स्वत:च्या माथ्यावर दुसर्याच्या गोष्टीच ओझ वाहणारा हमाल. म्हणजे पुन: 'मी' पण हरवलेलं … तेच तर शोधतोय सर्वदूर.  गीतातून, सुरातून ….  विज्ञानातून , गणितातून … पुस्तकातून, गुलमोहरातून … लिहिण्यातून, वाचाण्यातून, बोलण्यातून, …. जखमेतून, वेदनेतून … परंतु सारा शोध असफल! प्रत्येकाच्या शेवटी आढळते ती मन व्यापून टाकणारी फ़ोलता …. पोकळी प्रसवणारी अपयशाची असहायता …. पण तरीही तरंगत असते कुठेशी, कुढणारी का होईना पण आशा … आकांक्षा …. स्वत्व गवसेल, स्वत्व गवसेल म्हणून कानाशी रुंजी घालणारी !

आशा - निराशा, जयपराजय, उमेद - हतबलता, भव्यता- खुजेपण, असहायता - भरारी … द्वंद्व ! द्वंद्व! कधीच जिंकणार नाही का मी या द्वंद्वात? दोन ही तीरांवर पाय रोवलेले. निराशेने असहाय होऊन आत्मघाताकडे झुकू पाहणाऱ्या एका मनाला लगेच सुचतो, विवेक, विचार . पण काहीतरी गवसल्यावरही पुढे पसरलेला लांबच लांब रस्ता ' मुक्काम' न आल्याची खंत करायला लावतो. ( मैलांचे दगड जिंकल्याच्या का कधी जाहिराती होतात?) माणूस अल्पसंतुष्ट आणि समाधानी असला कि आकांक्षा विहीन ठरतो आणि क्षितिजाला भिडायच्या प्रयत्नांत अस्तंगत सूर्यासारखा रक्ताच्या थारोळ्यात पडला तर जिद्दी आणि झपाटलेला ठरतो.

समस्त आदर्शांना आणि स्वप्नांना बाटलीबंद करून ठेवून व्यवहाराच्या राज्यात शिरला तर भोगवादी आणि आदर्शांच्या कळाहीन रंगहीन निवडुंग बागेत फिरला तर येडा!

अखेर यशाचं गमक काय? पैसा, कीर्ती, नांवलौकिक, मोटर बंगला, सचोटी आणि नितीमत्तेची जोपासना कि मुत्सेद्दीगिरी?

 विचार …  विकारांना निमंत्रण देणारे आणि हाकलूनही देणारे मनाचे पहारेदार … मात्र हा भोवरा भयंकर आहे, वेड  लावणारा आहे …. एक कधीच न 'जगू' देणारा शाप  आहे ! गती आहे पण प्रगती नाही आणि अडकणाऱ्याची अधोगती !!!!!

रविवार, एप्रिल २०, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी …५


संस्कृती ह्या राजमान्य अधिकाऱ्याच्या  माणूस दडपून टाकतो आपली सहज,  स्वाभाविक , नैसर्गिक भूक।खर तर आदि कालात संस्कृती   नामक  शब्द योजण्यात आला तो संतुष्टी, तृप्ती , सहज -साध्य, आकारबद्ध प्रवासाने मिळालेली व्हावी म्हणून. संस्कृतीपूर्व काळात, जाणवलेल्या भुका एकमेकांच्या मदतीने भागवल्या जाव्या, त्या पुर्तिला एक रूप असावे, एक गंध असावा, त्या तुष्टीला एक रंग असावा, म्हणून सभ्यता, संस्कृती, आचार, ह्या शब्दांची व्याख्या झाली. आपली प्रत्येक कृती, प्रवासातला हर एक टप्पा माणूस ह्या कसोट्यांवर घासून पाहू लागला. नव्या वाटा, नवे मार्ग आखले गेले. नव्या अनुभवांचा अनुनुभूत आनंद मिळाल्याने संस्कृतीचा सत्कार झाला, आचारांचा आदर झाला. सभ्यतेला मान मिळाला. त्या सर्व भुका, त्या सर्व ओढी ह्या वाटांनी परिपूर्ण झाल्याही असतील. परंतु आज?
आचार हे  सामयिक आणि स्थानिक असतात. मूळ उद्देश जरी सार्वकालिक आणि व्यापक असले तरी उत्क्रांतीमुळे निश्चितच त्यांना पैलू पडत जातात. परंतु ह्याचे भान न ठेवता त्याच जुन्या, बुरसट   आणि गंजलेल्या मुल्यांभोवतीच आमचा पिंगा चालू असतो आणि जीवन हे अतर्क्य, निरर्थक आणि गोंधळलेले वाटू लागते. ज्या भूकांभोवती आयुष्याचा प्रवास चालू असतो त्या भूकांवर स्वार होऊनच जगण येत आणि म्हणूनच आयुष्यात कांहीच साधू शकलो नाही ह्याची खंत उरते!

मंगळवार, एप्रिल ०८, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी … 2


धरलेली प्रत्येक वाट अनोळखीच असते. शोधून शोधूनहि ओळखीच्या खुणा कुठे सापडताच नाहीत. प्रत्येक झाड नवं, त्यावरच पान  नवं, त्यावरल फूल नवं, त्या फुलाचा गंध  नवा. पण ह्या नवीनतेन भारावून जाण्यापेक्षा गोंधळून जायलाच कां व्हावं ? अज्ञानात अंदाजाने बांधलेले आकार कुठेच दिसू नयेत म्हणून झालेली ही निराशा असते कि अपेक्षाभंगाची वेदना? कि स्वत:च्या अपेक्षांवाराच्या वाजवी विश्वासाची कणा ताठ असलेली जाणीव? त्यापोटी दूरात नजर रोवून असलेली आशा? उचललेल्या आपल्या पावलानाच अर्थ नाही कि पायाखालची वाटच अर्थशून्य आहे ? वळणा मागून वळण जाताहेत पण अजून "पुढे आलो"   ह्याची जाणीव कां होऊ नये ?प्रत्येक  वळणावर एक नवा दिशा निर्देशक, प्रत्येक  निर्देशकावर एका नव्या गावाचं नाव … साराच प्रवास असा अज्ञाताच्या पाठी आणि अखेर जाणवणार असेल त्या अज्ञाताची अतर्क्यता , नेणिवेच्याही  पलीकडील … अनाकलनीय ….
उध्वस्त क्षितीज आणि सूर्य दिशाहीन!

हे काय घडतंय? किंबहुना काहीच का घडत नाहीये? उतारावर ढकलून दिलेलं पिंप अजून थांबत नाहीये … पसरलेल्या धुक्यात एखादा आकार लपलेला आहे कि नाही? स्वत:ची स्थिती इतकी हास्यास्पद कधीच झाली नव्हती.
नोकरीच्या, कामाच्या ढालीने किती काळ निभाव लागणार?
पहाट किती लांब आहे? 

शनिवार, एप्रिल ०५, २०१४

अस्वस्थ मनातील नोंदी … १मी अद्याप जिवंत कसा? कि नाहीच? ज्या तऱ्हेने दिवस जाताहेत त्या वरून काही अंदाज बांधताच येत  नाहीत. रस्त्यावर उभा असलेल्या रहदारी नियंत्रक शिपाया सारखा झालोय मी ! निर्देशित वाटेवरून सुसाट धावताहेत मोटार, स्कूटर, टांगे …. अन तो त्याच चौरस्त्यावर, त्याच  स्थितीत …. हात वेडे वाकडे करत , हे असं कां होतंय? ह्याच्या मागील संकेत काय?

ह्या बेकारीच्या आयुष्यात मनात सतत प्रश्नांच्या माशा घोंघावत असतात … हो, प्रश्न हे माश्यांसारखेच, सुखाला चिटकून बसतात, दु:खावर घोंघावतात …

प्रश्न उभा राहतो साऱ्या अस्तित्वाबद्दल , कुठल्या आशेवर माणूस जगात असतो? कुठल्या विचाराच्या बळावर अस्तित्व टिकून असते? अखेर अस्तित्वाची ओळख कुठली? जिवंतपणाची खूण  कुठली? …. अर्थशून्य श्वासांचा व्यापार? हृदयाचे निर्वात स्पंदन कि नदीचा बेताल ठेका? दर क्षणी सामोरी येणारी व्यक्ती मूकपणे डोळ्यातून प्रश्न विचारते, "तू जिवंत कां ?"  उत्तर - खुदा जाने ! त्या व्यक्तीला मीही विचारू लागतो "तू जिवंत कां ?" उत्तर - खुदा जाने!
खर तर जगात जगत कोण नाही? सारेच !! रोगी, जोगी, योगी, भोगी … ताठ, तुटलेले, उन्मळलेले….  सुखी, दु:खी, समाधानी … मोडलेले,जोडलेले, कोलमडलेले …. झाडून गेलेल्या बोटांचे महारोगीही जगात असतात एक स्पर्श- शून्य आयुष्य! गटारगंगेच्या काठी गलिच्छ झोपडीत जगत असतात भिकारी एक चेतनाशून्य आयुष्य ! सुखाची  सूज चढलेले श्रीमंत जगत असतात एक बुभुक्षित आयुष्य ! एक दोन सूर निखळूनही सारे गातच असतात एक बेसूर गीत जीवनाचे … ! कां ? काहीतरी मिटून गेलय, निसटून गेलंय,  मिटून गेलंय, संपून गेलंय ह्याची जाणीव असूनही, ठेवूनही प्रत्येकजण जगतच असतो एक प्रश्न खोल तळाशी दडवून …
प्रश्न :  मी जगतोय, मी जिवंत आहे, पण कां ???????
ह्या कां ला उत्तर नाही ……