शनिवार, एप्रिल ११, २०१५

शांत आकाश आणि निवांत हिरवळ


आज सकाळी फोन आला तेंव्हा तो मोनलने  घेतला, मी कुठेसा होतो. तिने निरोप दिला. आणि माझ्या तोंडून "ओह नो " ज्या पद्धतीने निघाले त्यावरून तिच्या लक्षात आले कि मला खूप खोलवर दु:ख झाले आहे. तिने थोडा वेळ जाऊ दिला, मला सावरू दिले आणि विचारले "  कोण होत्या त्या?"
खरच … कोण होत्या त्या (माझ्या) ? आम्हा साऱ्या, सांस्कृतिक कार्यक्रमातून उत्साहाने वावरणाऱ्या, (त्या काळच्या) तरुण मंडळींच्या ढवळीकर काकू. मात्र माझ्यासाठी त्या ह्या संबोधनाच्याही वरच्या होत्या. म्हणून माझ्या तोंडून निघाले. " माझी सांस्कृतिक आई" !  हे मात्र मुलीच्या डोक्यावरून गेले. माझी मुलगी त्यांना कधी भेटलेली नाही, त्यामुळे तिचे हे प्रश्न साहजिक होते. माझे नाटक, कविता, वाचन, भाषण ह्यातील रस घेणे तिला माहित असल्याने तिला विस्तारून सांगितले.
इंदौर मध्ये  त्या काळी मोहल्ल्या मोहल्ल्यातून गणेशोत्सवासाठी नाटके बसवली जात. गणेश कॉलनी साठी १९७०  साली "प्रेमा तुझा रंग कसा" हे नाटक इंजिनिअरिंग कॉलेज च्या प्रोफेसर फडक्यांनी बसवले.मी त्यात "बच्चा" ची भूमिका केली होती. रंगीत तालीम बघायला त्यांनी काकूंना बोलावले. काका फडक्यांचे सहकारी. काका आणि काकू दोघांचा सांस्कृतिक  पिंड पुणेरी हवामानात पोसलेला. त्यांचा दबदबा इंदौरच्या सांस्कृतिक वर्तुळात मान्य झालेला. त्यामुळे मनावर दडपण होते. त्या आल्या, त्यांनी तालीम बघितली, हव्या तिथे सूचना दिल्या. अतिशय सौम्य आणि प्रसन्न चेहरा, मन मोकळे हसणे, विनोदी किस्स्यांची रेलचेल.  त्या तीन तासात त्यांनी आम्हा होतकरू नटांवर कुठलेही दडपण येऊ दिले नाही. त्यांची माझी ती पहिली प्रत्यक्ष  भेट. पुढील पाच वर्षात अशा अनेक भेटी घडणार होत्या आणि माझी सांस्कृतिक जाण थोडी प्रगल्भ होणार होती. 

काकांच्या पुढाकाराने आणि काकूंच्या सांस्कृतिक संरक्षणाखाली इंजिनिअरिंग कॉलेजमधील मराठी मुलांनी "महाराष्ट्र इंजिनियर्स" ही संस्था सुरु केलेली होती. संस्थेच्या दोन दिवसीय वार्षिकोत्सवाशिवाय ह्या संस्थेतून विविध स्पर्धांसाठी - एकांकिका,भावगीत, नाट्यवाचन, वादविवाद- कॉलेजसाठी काकू स्पर्धक तयार करत. त्या काळात इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मुली ही एक दुर्मिळ कमोडीटी असे. एकांकिकांसाठी मुली मात्र कॉलेज बाहेरच्या घ्याव्या लागत . काकुंमुळे हा प्रश्ण सहज सुटे. त्यांच्या ' भजनी मंडळ' ' सुगम संगीत मंडळ' ह्या संस्था मदतीला धावून येत. एका वर्षी तर " महिला मंडळात भाऊगर्दी" ही एकांकिका त्यांनी बसवली आणि त्यासाठी अनेक तरुण मुलींचे महिला मंडळ उभे केले ! "महाराष्ट्र इंजिनियर्स" च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी होऊ घातलेल्या इंजिनियर्स मध्ये ह्यामुळे चुरस असे. तालमीची जागा म्हणजे काकूंचे "हिरवळ" हे दुमजली घर. घरात "सरांचा" (काकांचा) वावर. ह्या 'सुरक्षित' वातावरणात आपल्या बी ए / बी एस्सी शिकणाऱ्या मुलीना पाठवण्यास पालकांना संकोच वाटत नसे.

"महाराष्ट्र इंजिनियर्स" मध्ये माझा  शिरकाव झाला तो "पाहुणा कलाकार" म्हणून कारण मी सायन्स कॉलेज चा विद्यार्थी. महाराष्ट्र साहित्य सभेच्या शारदोत्सवात एकांकिका स्पर्धेत त्यांनी "नाटक बसत आहे" ही एकांकिका बसवली. त्यातील लेखक हे पात्र करणारा कुणी बहुदा प्रयोगाच्या २ दिवस आधी गहाळ झाला. भूमिका इनमिन साडेतीन मिनिटाची. माझा "बच्चा" पाहून काकूंनी मला बोलावणे धाडले. मी 'हिरवळी'वर पोहोचलो. थोडी धाकधूक होती कारण सरांचा दरारा ऐकून ठाऊक होता त्यांच्या घरी जाणे म्हणजे …   त्या नंतर मात्र त्या "हिरवळी"वर माझ्या बेकारीच्या वर्षात मला अनेक विसाव्याचे क्षण मिळाले.

काकूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक एकांकिका केल्या त्यातील कायम स्मरणात राहतील अशा "खलीत्यांची लढाई" आणि "सदू आणि दादू" !
कुठल्याही परिसंवादात किंवा वादविवाद स्पर्धेत द्यायचे भाषण मी आधी काकूंना दाखवत असे. त्या अधिक संदर्भ देत असत. काही मुद्द्यांवर त्यांचे आणि माझे मत एक नसे. कारण मी तसा त्या काळातला 'विद्रोही' ! पण त्या माझी मते शांतपणे ऐकून घेत. मला अधिक वाचायला लावत. "बघ तुला पटतंय का " असे म्हणत. १९७३-७५ ह्या काळात मी बेकार तर होतोच पण हळू हळू system विरोधी होऊ लागलो होतो. माझ्या त्या भावनेला भलते वळण न मिळता एक सृजनात्मक वळण मिळाले त्याचे बरेच श्रेय काकूंना … लिहित रहा … कविता लिही, लेख लिही असे त्या सारखे बजावत. काय लिहिलेस असे आवर्जून विचारत, सुधारणा करत, प्रोत्साहन देत. माझ्या हातून ज्या काही दहा पाच कविता त्या काळात लिहिल्या गेल्या त्या त्यांनी आवर्जून वाचल्या, आपली स्पष्ट मते दिली, पण नामोहरम मात्र केले नाही.

१९७५ साली (एकदाची) नोकरी लागली आणि मी त्यांचा निरोप घ्यायाल गेलो. त्यावेळी "चल, सुटलास एकदाचा, पण त्या  कवितेला सुटू देऊ नकोस आपल्या कचाट्यातून" अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. ज्यांनी ज्यांनी माझ्या घडण्याला हातभार लावला, बिघडण्यातून वाचवले आणि अवघडण्यातून मोकळे केले त्यांच्या अपेक्षांना मी उतरू शकलो नाही ही एक खंत उरी उरलेली. कारण पुढे निवृत्त होईपर्यंत आकडे जुळवण्यात कविता कुठे अडकली समजलेच नाही.
इंदौर सोडल्यावर इंदौरला  जाउन देखील काकूंची भेट घेणे दर वेळी जमत नव्हते. तरी जमेल तेंव्हा  त्यांना भेटत असे. ५ वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यावर त्यांना भेटलो. "आता तर तुला वेळच वेळ आहे. मग कर पुन्हा सुरुवात लिहायला " असे त्या म्हणाल्या आणि मलाच माझी लाज वाटली. त्यांनी वयाची ८० वर्षे ओलांडली होती मात्र चिंतन, मनन आणि अनेक कार्यक्रमांची  आखणी त्या करतच होत्या. "श्री सर्वोत्तम" ह्या इंदौरहून प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकाच्या यशात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

दोन वर्षांपूर्वी इंदौरला त्यांना भेटलो ती आमची शेवटची भेट. त्याच उत्साहात भेटल्या. काही जुनी नांवे, आठवणी निघाल्या. " आता वय झाले रे. सगळेच आठवत नाही". मी कसा काय आठवतो असे विचारले तर हसल्या आणि म्हणाल्या " सारीच भुते विसरता येत नाहीत". त्यावेळी मी माझी वही घेऊन गेलो होतो. जवळ जवळ तासभर मी त्यांना कविता वाचून दाखवल्या. त्यांनी न कंटाळता ऐकल्या, आणि तसेच कौतुक केले. "पुढच्या वेळी येण्या आधी कळव, काही लोकांना बोलावून घेऊ आणि  छोटा कार्यक्रम करू इथेच, मी हल्ली कुठेच जात नाही". पण काही वेळा यायच्याच नसतात. उरलेली खंत हेच त्या न आलेल्या क्षणांचे देणे असते.

काकू, तुम्ही अजून आहात माझ्या साठी एक आकाश, सतत आधार वाटणाऱ्या, एक हिरवळ निवांत आसरा देणारी !!

४-४-२०१५