आज सकाळी फोन आला
तेंव्हा तो मोनलने घेतला, मी कुठेसा होतो. तिने निरोप दिला. आणि माझ्या
तोंडून "ओह नो " ज्या पद्धतीने निघाले त्यावरून तिच्या लक्षात आले कि मला
खूप खोलवर दु:ख झाले आहे. तिने थोडा वेळ जाऊ दिला, मला सावरू दिले आणि
विचारले " कोण होत्या त्या?"
खरच … कोण होत्या त्या
(माझ्या) ? आम्हा साऱ्या, सांस्कृतिक कार्यक्रमातून उत्साहाने वावरणाऱ्या,
(त्या काळच्या) तरुण मंडळींच्या ढवळीकर काकू. मात्र माझ्यासाठी त्या ह्या
संबोधनाच्याही वरच्या होत्या. म्हणून माझ्या तोंडून निघाले. " माझी
सांस्कृतिक आई" ! हे मात्र मुलीच्या डोक्यावरून गेले. माझी मुलगी
त्यांना कधी भेटलेली नाही, त्यामुळे तिचे हे प्रश्न साहजिक होते. माझे
नाटक, कविता, वाचन, भाषण ह्यातील रस घेणे तिला माहित असल्याने तिला
विस्तारून सांगितले.
इंदौर मध्ये त्या काळी मोहल्ल्या
मोहल्ल्यातून गणेशोत्सवासाठी नाटके बसवली जात. गणेश कॉलनी साठी १९७० साली
"प्रेमा तुझा रंग कसा" हे नाटक इंजिनिअरिंग कॉलेज च्या प्रोफेसर फडक्यांनी
बसवले.मी त्यात "बच्चा" ची भूमिका केली होती. रंगीत तालीम बघायला त्यांनी
काकूंना बोलावले. काका फडक्यांचे सहकारी. काका आणि काकू दोघांचा
सांस्कृतिक पिंड पुणेरी हवामानात पोसलेला. त्यांचा दबदबा इंदौरच्या
सांस्कृतिक वर्तुळात मान्य झालेला. त्यामुळे मनावर दडपण होते. त्या आल्या,
त्यांनी तालीम बघितली, हव्या तिथे सूचना दिल्या. अतिशय सौम्य आणि प्रसन्न
चेहरा, मन मोकळे हसणे, विनोदी किस्स्यांची रेलचेल. त्या तीन तासात त्यांनी
आम्हा होतकरू नटांवर कुठलेही दडपण येऊ दिले नाही. त्यांची माझी ती पहिली
प्रत्यक्ष भेट. पुढील पाच वर्षात अशा अनेक भेटी घडणार होत्या आणि माझी
सांस्कृतिक जाण थोडी प्रगल्भ होणार होती.
काकांच्या
पुढाकाराने आणि काकूंच्या सांस्कृतिक संरक्षणाखाली इंजिनिअरिंग कॉलेजमधील
मराठी मुलांनी "महाराष्ट्र इंजिनियर्स" ही संस्था सुरु केलेली होती.
संस्थेच्या दोन दिवसीय वार्षिकोत्सवाशिवाय ह्या संस्थेतून विविध
स्पर्धांसाठी - एकांकिका,भावगीत, नाट्यवाचन, वादविवाद- कॉलेजसाठी काकू
स्पर्धक तयार करत. त्या काळात इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मुली ही एक
दुर्मिळ कमोडीटी असे. एकांकिकांसाठी मुली मात्र कॉलेज बाहेरच्या घ्याव्या
लागत . काकुंमुळे हा प्रश्ण सहज सुटे. त्यांच्या ' भजनी मंडळ' ' सुगम संगीत
मंडळ' ह्या संस्था मदतीला धावून येत. एका वर्षी तर " महिला मंडळात
भाऊगर्दी" ही एकांकिका त्यांनी बसवली आणि त्यासाठी अनेक तरुण मुलींचे महिला
मंडळ उभे केले ! "महाराष्ट्र इंजिनियर्स" च्या कार्यक्रमात सहभागी
होण्यासाठी होऊ घातलेल्या इंजिनियर्स मध्ये ह्यामुळे चुरस असे. तालमीची
जागा म्हणजे काकूंचे "हिरवळ" हे दुमजली घर. घरात "सरांचा" (काकांचा) वावर.
ह्या 'सुरक्षित' वातावरणात आपल्या बी ए / बी एस्सी शिकणाऱ्या मुलीना
पाठवण्यास पालकांना संकोच वाटत नसे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा