रविवार, जुलै २६, २०१५

शक्यता


अधून मधून
मी माणूस असल्याची शक्यता
मलाच माझी जाणवत असते
म्हणून / म्हणजे  मी अजून
जिवंत आहे …
भक्ष्य झालेलो नाही
माझ्यातील
हिंस्त्र श्वापदाचा … 


(ही केवळ एक शक्यता !
कळवावे मला, जर
तुम्हाला जाणवले अन्यथा !)

शुक्रवार, जुलै १७, २०१५

दोन काठ


नाकारताना ठाऊक असतं
असलेली पोकळी रितीच असणार
पुढेही;
पण "असेल अजून चांगले"
ह्या आशेचे स्पंदन चालू ठेवतात शोध …
एका क्षणी स्वीकारतोच आपण
मिळते ते,वाटते
भरली आता पोकळी … पण
पुढच्याच क्षणी ग्रासते भीती
'अजून चांगल्याची' वाट बंद झाल्याने
थांबलेल्या प्रवासाची !!
.
.
आशा आणि भीती
दोन काठाच्या मधला
हा खळखळाट …।

गुरुवार, जुलै १६, २०१५

दोष, टीका आणि मी


स्वत:तच आत बघत असताना काही जागा पाहण्यात मी अपेशी ठरतो. त्या शोधून काढण्याचे दोनच प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे दुसऱ्यांच्या त्या गुणाची पावती देण आणि कौतुक करण जे माझ्यात नसल्याने मला छळत असतात. दुसरा, मी वापरलेले ते वाग्बाण ओळखण जे मी स्वत:चा बचाव करताना वापरतो.
इतर लोकांच्या वागण्यातील नेमके काय मला आंदोलित करते हे जाणून घेण्यासाठी मला माझ्या अलीकडच्या "सामन्या"चे पुनरावलोकन करायला हवे, पण माझ्या बचावात्मक पवित्र्यामुळे हे ओळखून काढणे त्रासाचे जाते. माझ्या वागण्यातील काही लक्षणांवरून मला ह्यांची चांगली ओळख पटू शकते. जसे
  • टीकेला मी पटकन उत्तर देतो, बऱ्याच वेळ आणि सविस्तर बोलण्याची मला गरज वाटू लागते आणि मधेच कुणी अडवल्यास मी अस्वस्थ होऊ लागतो
  • मी खुलासा देऊ लागतो, मी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो पण मी जिंकतोय अस वाटत असतानाही मला कुंठीत होत असल्यासारख वाटू लागत, जणू काही गमवायच ते मी गमावूनच बसलोय
  • मी भरभर विचार करू लागतो आणि थबकण्यास आतूनच प्रचंड विरोध जाणवू लागतो, जणू काय आता थांबलो तर फार मोठे नुकसान होईल
  •  माझा चेहरा जड, तणावपूर्ण आणि गंभीर भासू लागतो
  • समोरच्याची टिप्पणी ऐकल्याबरोबर मी नजर टाळतो
ती टिप्पणी मला गंभीरपणे घेण्याशिवाय अन्य प्रकारे घेताच येत नाही, शब्द मला कधीच हसण्यावारी नेण्यासारखे किंवा फालतू वाटत नाहीत. जेंव्हा उपस्थितांना माझी प्रतिक्रिया दिसून येते तेंव्हा बहुतेक वेळा ते परिस्थितीस हसण्यावारी नेतात. मला मात्र मी गैर रीतीने समजला गेलेलो किंवा वापरला गेल्यासारखा वाटू लागतो
*******
आता हे जाणवतंय कि दुसऱ्यांवर टीका करत असताना मी माझेच दोष पाहत असतो. मला माझी टीका अधिक प्रामाणिक, नेमकी आणि विशिष्ट करायला हवी. म्हणजे मला नेमके काय आवडत नाही, पटत नाही, हे सांगायला हवे. दुसऱ्यांमध्ये एखादा दोष कसा कार्यरत असतो हे व्यवस्थित कळल्यावर मी माझ्या स्वत:च्या वागण्याकडे नव्या आणि नवलाईच्या स्पष्टतेने पाहू शकतो. (टीकेची ही तऱ्हा मी मूकपणे टीका करत असताना उत्तमरीतीने काम करते)

******
स्वत:चा बचाव करायला तेंव्हा मला फारच आवडत जेंव्हा मला माझ्या बचावात्मक पवित्र्याची आणि वागण्याची जाणीव असते आणि तरीही मी जेव्हढा हवा तेव्हढा बचाव करण सुरूच ठेवतो.

*******
कुणीही चूक नसतो. असलाच तर कुणी अजाण असू शकतो. जर मला वाटत कि एखादी व्यक्ती चूक आहे तर एक मला तरी कशाची तरी जाणीव नसावी किंवा त्या व्यक्तीला तरी. तेंव्हा, जर मला प्रभुत्व स्थापन करण्याचा खेळ खेळायचा नसेल तर हे शोधण उत्तम कि ती व्यक्ती काय बघतेय आणि हे तेंव्हाच समजेल जेंव्हा मी ते विचारेन !

******
" तू चूक आहेस " चा अर्थ " मला तुझ समजत नाहीये " ____ "तू जे पाहतो आहेस ते मी पाहत नाहीये; पण तुझ्यात काही चूक नाहीये, तू काही मी नाहीस आणि तसे असण्यात जराही चूक नाही"

******
मला मी प्रत्येकापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, उत्कृष्ट किंव निकृष्ट, वरचढ किंवा कमी, बरा किंवा खराब वाटत असतो. श्रेष्ठत्वाचे क्षण फुशारण्याचे असतात पण फार थोडे समाधानचे क्षण असतात जेंव्हा मी इतरांच्या बरोबरीचा वाटतो.

********
व्यक्तींच्या जगतात 'श्रेष्ठ' नांवाची चीजच नाही !!

*********
ही अशी विभागणी करून, वर्गीकरण करून नव्याने झालेल्या ओळखींना व्यवस्थित बासनात बांधण्याची गरज कां असावी? जिवंत मानवी व्यक्तीसारख्या गुंतागुंतीच्या गोष्टीला वर्गीकृत करण्याचा माझा प्रयत्न माझा उथळपणाच दाखवतो. दुसऱ्या व्यक्तीबद्दलचा निर्णय म्हणजे असे चित्र ज्यात असंबद्ध गुण जोडलेले असतात,मात्र त्या व्यक्तीचा वेगळेपणा निसटून गेलेला असतो. असे कुणा माणसाला वर्गीकृत करणे म्हणजे त्याचे वस्तूकरण करणे !! दुसऱ्या माणसाशी कनेक्ट व्हायला मला त्या माणसाचा अनुभवच घ्यायला हवा, निव्वळ विचार करून चालणार नसत !!
(अनुवादित)