सोमवार, जून २२, २०१५

सहज आठवले म्हणून … कप्पा -१


कप्पा -१ 
वाचनाची सवय लहानपणीच लागली. अगदी सकाळी सकाळी येणारे वर्तमानपत्र वाचायला मला चौथ्या पाचव्या यत्तेपासून आवडे. आणि हे घरात सगळ्यांच्या बाबतीत होते. बातम्या हा दादांचा (आमच्या वडिलांचा) जोपासलेला छंद. सकाळच्या ६ वाजेपासून रात्रीच्या ११ वाजेपर्यंतच्या बातम्या ते कान देऊन ऐकत आणि त्यावेळी कुणी दंगा केलेला त्यांना खपत नसे. त्यामुळे अशोक बाजपाई आणि देवकीनंदन पांडे हे आमच्या घरातलेच होऊन गेले होते.
पाचवीत  असतानाची एक आठवण मनात कायम राहिली आहे. सकाळचा पेपर कुणी आधी वाचायचा ह्यावरून माझ्यात आणि मोठ्या बहिणीत थोडे भांडण झाले आणि पेपर खेचाखेचीत फाटला. हा फाटलेला पेपर पाहून दादांचा संताप होणार हे कळल आणि माझी घाबरगुंडी उडाली. आता आपले कान तरी लांब होणार नाहीतर गाल लाल होणार हे लक्षात येउन त्या दिवशी मी शाळा १० वाजतानाची असताना ९ वाजताच धूम पळालो. न जेवण, न डब्बा !
कधी नव्हे ते शाळेत सगळ्यात आधी पोहोचणारा मीच. टंगळ मंगळ करून वेळ काढला. एकतर मी शामळू मुलगा. दांडगाई. दंगा, खेळ ह्या पासून थोडा दूर राहणारा. प्रार्थना झाली, वर्ग सुरु झाला आणि थोड्याच वेळात पाहिले  तर वर्गाच्या दारात काळ्या कोटातले दादा !!!!
दादांचा कोर्टात जाण्याचा रस्ता आमच्या नाईक मास्तरांच्या शाळेवरून जात असे. ते दादांच्या ओळखीचे. त्यांच्या ऑफिस शेजारी आमचा वर्ग. आमचे शिक्षक मुंगी मास्तर. ते सुद्धा दादांच्या ओळखीचे. दादांना पाहून माझी ताराम्बळ उडाली. आता सर्वांसमोर आपली निघणार हे नक्की वाटले. दादांनी सरांना सांगून मला बाहेर बोलावले. काही खाल्लस का विचारले. खाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण शाळेतून निघताना चार आणे सुद्धा खिशात नसायचे, ती पद्धतच नव्हती. ते मला घेऊन शाळेच्या बाहेर आले. समोरच्या ठेल्यावर नेउन चार केळी घेतली आणि मला खायला लावली. काही झाल तरी घरातून उपाशी निघायचं नाही ह्यापुढे अस बजावून सांगितलं, मला वर्गा  पर्यंत सोडलं आणि कोर्टाला गेले.
आमच्या वाढत्या वयात त्या त्या स्टेजला येऊ शकणारे अनुभव आधीच अंदाज बांधून त्या विषयी मोकळेपणाने बोलणारे दादा 'बाप' कसा असावा ह्याचे देखील संस्कार मनावर घडवत होते.
सहज आठवले म्हणून …