मी ज्या गोष्टींना मानतो त्यातील अधिकांश ह्या ऐकीव, गावगप्पा किंवा तोडून मोडून सांगितलेल्या गोष्टींवर आधारित असतात.
वस्तुस्थिती समोर यायला वर्षे लागतात.
वास्तव हे सतत उधाणत असते, शांत जलाशयासारखी स्थिर नसते. क्षणा क्षणाला उसळणाऱ्या लाटांनी गोंधळून जाणाऱ्या सागराचा अशांत पृष्ठभाग कधीच पारदर्शी नसतो, वास्तवतेत दडलेले गूढ आशय आपण सूर मारून शोधून काढावे लागतात,काही काळ तिथे रमून.
अनुभवांच्या उडालेल्या धुराळ्यातून महत्वाचे आशय खाली बसायला वेळेला वेळ द्यावाच लागतो. आपल्या आयुष्याचा संपूर्ण अर्थ आपल्याला आपल्या जीवनात मिळणारच नसतो. तेंव्हा स्वत:वरच नसते कडक ताशेरे ओढायचे कारण नाही.
माझा भूतकाळ मला संपूर्णपणे कधीच कळणार नसतो, कारण आठवणी ह्या तशाही तुटक आणि त्रोटक असतात.
माझे बालपण, तिथे जाणवलेले नागवलेपण आणि निरागस आनंद , झालेल्या फसगती आणि वचनपूर्ती, हे सारे मी माझ्या गरजांच्या सदोष नजरेतून पाहिलेले असते.
मी जाणीवपूर्वक निवडलेल्या वेचक घटना आणि जाणीवपूर्वक दडवलेल्या गोष्टी ह्यांच्या सहाय्याने आज मी माझा इतिहास रचलेला आहे.
मला आठवत असलेली माहिती जरी धूसर असली तरी ती माझ्या अवशेष वृत्तीत किंवा दडून असलेल्या भयात सामावलेली असते. आणि मी अनुभवलेले सारे काही माझ्या वागण्या बोलण्यातून दिसून येते.
मी म्हणजे हे लहान मोठे अनुभव, जे माझ्या स्वभावात, व्यक्तीमत्वात आणि अस्तित्वात जपून ठेवलेले असतात.
माझ्या पूर्वायुष्यातला काही भाग माझ्यावर सतत आघात करतच राहतो.
निरागसपणाच्या स्वप्नातून बाहेर पडून माझा इतिहास मला आठवायलाच हवा. ह्या जगाला, जगण्याला मी कसे रंगवतो आहे हे मी ओळखायलाच हवे.
आपल्या भूतकाळाला खुल्या मनाने सामोरे जाणे म्हणजेच खरे स्वातंत्र्य !!
स्वतःचा शोध ,काही भूतकाळातून ,काही वास्तवातून तर काही स्वतःच्या विचारातून .. छान आहे सर
उत्तर द्याहटवा