शनिवार, फेब्रुवारी २९, २०२०

आळशीपणा : एक चिंतन

प्रत्येकाला आपण आळशी आहोत असे मनातल्या मनात वाटत असावे, सर्वसाधारण "तुमच्यातले एक वैगुण्य सांगा " असे विचारले तर कुणी " मी स्वार्थी आहे", "मी मत्सरी आहे" "मी धर्मांध  आहे" असे काही न  सांगता " मी आळशी आहे " असे सांगून गर्दीतला एक होऊन मोकळा होतो.
आळस हा तसा निरुपद्रवी अवगुण, तो शांत असतो मात्र अनेक वेळा दुसर्याला अशांत करतो कारण आपल्या आळसापायी दुसऱ्याचे काम अनेकवेळा अडून जाते.

मनात एक विचार आला, आपण आळशी आहोत असे जवळपास सर्वांनाच जाहीर करावेसे कां वाटत असावे? त्याने ते काय साध्य करतात? एक शक्य आहे अशी स्वीकृती दिली कि आपल्या अनेक वैगुण्यांना  समजून घ्यायला  समोरचा मोकळा असे मनात येत असेल. 

तसेही आपण आळशी आहोत असा आपला एक गैरसमज असतो, कारण लहानपणी  हे एक विशेषण आपल्याला त्या दोन ठिकाणी सतत लावले जाते, जिथे आपला दिवसाचा अधिक वेळ जातो - घरात आणि  शाळेत. उशिरा उठलात तर आळशी, हळू काम केलेत तर आळशी, विसावा घेतलात तर आळशी, बसून चिंतन करत असला तर आळशी. आंघोळ नाही केली तर आळशी आणि मग    " मी आळशी आहे" अशी  एक घट्ट स्व-प्रतिमा तयार  होते.

खरे तर कुणीही आळशी नसते. एखादे काम दुसर्या एका कामापेक्षा अधिक महत्वाचे वाटून ते मागे पडले तर त्या मागे पडलेल्या कामापुरते आणि वेळेपुरते आपण 'आळशी' असतो. हे नेमके असेच मांडले तर आपली प्रतिमा आपल्याच नजरेत थोडी उजळून निघते, कसनुसेपण कमी होते, आणि ओशाळलेपण कमी टोचते.

आळसाचे मूळ कारण दिशाहीन किंवा ध्येयहीनता असावे असेही वाटते. अशा स्थितीत उगाच आपण धावपळ करत असल्यासारखे दाखवतो, पण कां ह्याचे नेमके उत्तर आपल्याजवळ नसते. ही अशी दिशाहीन धावपळ मनात अर्थहीनता भरून ठेवेते, मरगळ आणते. कधी कधी ध्येयामध्ये सुस्पष्टता नसते. म्हणजे " मला काही तरी भरीव काम करायचे आहे" असे स्वप्न किंवा महत्वाकांक्षा असते पण भरीव म्हणजे नेमके काय हे सांगता येत नाही. 
  काही वेळा आपण आळस प्लॅन करतो. उद्या करावी लागणारी कामे आजच उरकून टाकतो. सकाळी मंडईत जाऊन आणावी लागणारी भाजी, आजच आणून ठेवतो. पहाटे फिरायला जात असू तर आज संध्याकाळीच फिरून येतो. हा प्लॅन्ड आळस एक वेगळा आनंद देतो. तो छान एन्जॉय करता येतो. 

"अहो, भाजी आणायला जातायना ना?" ह्या प्रश्नाला "कालच आणली" म्हणत फेसबुक मध्ये डोकं घालताना एक वेगळाच आनंद मिळतो. किंवा बिछान्यात अर्धा तास अधिक लोळताना मस्त गर्दभानंद घेता येतो.           

काही वेळा "मी आळशी नाही" असे सिद्ध करायला " मी कामात आहे" अशी जाहिरात करू लागतो. ह्यात उगाच संगणकावर सर्फिंग करणे आले, शिळे वर्तमानपत्र पुन्हा पुन्हा वाचणे आले, कुठलीही दिशा नसलेले "लिखाण" आले, काही तरी नवीन रचना करू असे म्हणत घरातली एक वस्तू दहा वेगवेगळ्या ठिकाणी लावून पाहत पुन्हा मूळ ठिकाणी ठेवणे आले,

पण आपण हे असे करत आहोत याची जाणीव होताक्षणीच ते काम सोडून थोडे चिंतन आवश्यक असते. मी नेमके काय टाळतोय याचा शोध घ्यावा लागतो. आणि तो लागतोच पट्कन. मग त्या टाळण्याचे कारण शोधून ते निवारण करावे लागते. म्हणजे जीवनाला थोडे अधिक सहज करता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा