बुधवार, ऑक्टोबर ०२, २०१९

*पत्र्याच्या तळाशी सुकलेले सातवे पान *



अध:पतनाला फ़्रिक्शनलेस चाकं असली पाहिजेत. म्हणून त्याला टाळणंच  योग्य . एकदा का त्यावर पाऊल पडलं कि तोंडघशी पडणं  अटळ. 

स्वत: बद्दलचा आदर, आत्मविश्वास, मनाची दृढता ह्या साऱ्याची  परीक्षा त्या एका पावलावर अवलंबून असते. आदर्शवादाच्या चौकटीत सजून दिसणारे विचार विकारांच्या वावटळीत उध्वस्त होतात. उरते ती तूफान येउन गेल्यानंतरची भीषण विराणता … सारं  संपल्याची जाणीव …

विकारांच्या प्रवाहात वाहून जाणारे विचार पुन्हा किनाऱ्याला लागू शकणं  अशक्य, लागले तरी त्यांना मोडकळलेल्या होडीचच रूप उरतं . 

माणसाच्या मनात खोल दडून बसलेलं नेमकं असतं तरी काय? देवपण, माणूसपण कि हैवानपण ? मानव्याची जोपासलेली सारी फुलं विकाराच्या नुसत्या धगीन सुद्धा कोमेजून जातात. कमावलेली शक्ती, वाढवलेली बुद्धि, समजून घेतलेला विवेक, जोपासलेली मूल्य, सारं सारं नाहीस होत एका क्षणात ….

मग चिरंतन ते काय? जनावारपण ? खरा कोण? सैतान? ….वाचनातून, चिंतनातून, मननातून, 'तयार ' झालेलं मन खरच 'तयार' झालेलं असतं ? कि निव्वळ वरवरचा मुलामा म्हणूनच एका जनावरावर सभ्यतेचा माणसाचा दर्प येणारा मुखवटा चढवलेला असतो?

विकारापासून दूर पळणं  हे विकाराच्या आकर्षणाच्या भीतीपायीच स्विकारलेलं  असतं  ना ? कारण मुळातच जर अनाकर्षण असेल तर कुठलाही प्रयत्न न करता माणूस 'कोरडा' राहू शकतो.  उलट पळण  हे आकर्षणाची सुप्तावस्थेत वाढच करत असतं  आणि म्हणूनच पहिल्या पावलासरशीच जमीनदोस्त व्हायची वेळ येते.
आणि शुद्ध आल्यावर, आपल पळणं  ही सुटका नव्हती हे उमगल्यावर, आपल्या भोवतीचा पिंजरा हा बिनगजाचा होता हे दिसल्यावर जाणवतो तो पराभव ! पराभव स्वत:चा स्वत:कडून … ह्या प्रत दुसरे मरण नाही,  स्वत:च्या उध्वस्तपणास स्वत:च कारणीभूत होणं ह्या सारखी दारूणता नाही !!!

आणि इतकं सारं  होऊनही, आतून तुटून, मोडून, कोलमडून, उध्वस्त होऊनही इतरेजन जेंव्हा तुमच्या तेजोवलयित व्यक्तिमत्वाचा उदोउदो करतात तेंव्हा कोण कुणाची वंचना करतं, कोण फसवतं  आणि कोण फसतं   हा गोंधळच सुटत नाही.

ज्या वलयात, ज्या प्रभेत खोटेपणाला खरेपणा येतो, मृगजळातून तहान शमते, आकाश स्पर्श होते; त्या प्रभेसारखा, त्या तेजासारखा दुसरा अंधार नाही आणि त्या  खोटेपणाने,त्या मृगजळाने, त्या आकाशाने अनुभवलेल्या जिवंत मरणासारखे दुसरे मरण नाही !


माझ्या पराभवाचा सत्कार आज आहे,
येणार वेदनेला आकार आज आहे...    

आकाश जिंकल्याचा केला किती बहाणा,
कळले परि मनाला तो व्यर्थ माज आहे...

मृगजळात जल्लोषाच्या वाहून दूर गेलो,
पण मोल आसवांचे कळणार आज आहे...

त्यांना हवे म्हणुनी फाटून ओठ हासे,
ह्या बेगडी जिण्याचा फुटणार ताज आहे... 

मी जाहलो जगाचा, न राहिलो स्वत:चा, 
माझा फिरून मजला कळणार बाज आहे ... 

- श्रीधर जहागिरदार
१९७४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा