ह्या जीवनातील नेमकी सत्य गोष्ट कुठली? भूक !!
नाना प्रकारच्या , विविध तऱ्हेच्या ... प्रकर्षानं जाणवणाऱ्या , अजिबात न जाणवणाऱ्या .... जागवणाऱ्या , निजवणाऱ्या ! ... आणि साऱ्या आयुष्याचा आकांत तेवढ्याचसाठी , तृप्तीसाठी . ह्या सत्यापायी माणसं खोट्यातली खोटी गोष्ट करतात , फसवतात, रडवतात, नागवतात ... फक्त तृप्तीसाठी. साऱ्या भुकांचं मूळ दीड वितीची खळगी, तिचं रितेपण जाणवलं कि शरीरभर आणि मनभर भुकांचं एकछत्री साम्राज्य सुरु होतं. पोट भरायला अन्न लागतं म्हणून अन्नाची भूक, अन्नासाठी पैसा लागतो म्हणून पैशाची भूक, पैसा मिळाला कि प्रतिष्ठा लाभते, प्रतिष्ठेची भूक ... अधिकाराची भूक , लौकिकाची भूक, प्रसिद्धीची भूक, एखाद्या अवलियास जाणवणारी ज्ञानाची भूक, अहंकार-तुष्टीची भूक. रात्री शरीर जाळून काढणारी दुसऱ्या शरीराची भूक !
एकदा भुकेच्या जाणिवेची ठिणगी मस्तकात पडली कि वणवा पेटल्या शिवाय राहत नाही. एखाद्या भुकेची तृप्ती झाली तरी ती तात्कालिक, क्षणिक, नश्वर ठरते. क्वचित प्रसंगी अपूर्ण ठरते . आणि मग लागते फरफटत नेणारी पूर्णत्वाची भूक. क्षुधापूर्तीच्या साधनांचं अपूर्णत्व उगाचच जाणवतं. पैसा मिळवण्याच्या वाटांचं एकदम दर्शन घडतं. मग प्रत्येक वाटेचा प्रवास. रात्रीच्या सुखात झिंग नव्हती म्हणून झिंगेचा शोध. लाभलेला लौकिक व्यापक नव्हता म्हणून व्यापकतेचा पाठपुरावा. गवसलेल्या ज्ञानाने उमगलेली अज्ञानता , त्यासाठी पूर्ण ज्ञानाचा हव्यास ....
एकच मस्ती ... तृप्ती! एकच हव्यास.... पूर्णत्व ! एकच उद्देश ... संतुष्टी!
प्रत्येकाचं आयुष्य ह्याच भुकांनी भारलेले .. तृप्तीच्या प्रेरणेने भारलेले ... पूर्णत्वाच्या सुरांनी नादावलेले ... म्हणूनच जीवनात एकच सत्य ... भूक ! गंमत ही कि ह्या सत्याच्या शोधापायी किंवा बोधापायी माणसाचे सारे आयुष्य खोटे होऊन जाते. फसवे ठरते .. पाखंड होते .. कुणी जगूच शकत नाही स्वत:चे आयुष्य, एक सच्चे आयुष्य . मनातील विचारांना, आवेगांना दडपत जो तो जपत जपत जगत असतो.
नांव, लौकिक, पैसे, कीर्ती, अधिकार, सभ्यता, नागरिकता ! संस्कृती नामक शहरातील हे रहिवासी आपल्या शहराचं शुभ्र, स्वच्छ, शुचिता नांव सांगून लगाम घालत असतात नैसर्गिक आवेगांना, प्रक्षोभांना, सहज उमटणाऱ्या विचारांना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा