रविवार, सप्टेंबर १५, २०१९

पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेलं पहिलं पान*


पहिल पान !
कुणासाठी ?
अजून ही प्रश्नांची सोबत संपत नाही. उत्तरं माहित नसलेले हे प्रश्न पावसाळी ढगांसारखे मनभर धावून येतात आणि तसेच लोंबकळत रहातात, बरसत नाहीत, जातही नाहीत. मळभाचे दाट थर मात्र वाढतच रहातात. पावसाळी ढगांसारखे धावून येणारे हे ढग जलद मात्र नसतात; असतात निर्जल, फिकट, पांढुरके ढग. स्वत:चा माझ्या अस्तित्वाशी संबंध दर्शवणारे, लोंबकळत राहणारे, वटवाघूळा सारखे अवस्थाहीन !
वटवाघुळ !!!! भाळावर बहुदा तोच गोन्दवलेला असणार. पण निव्वळ प्रतिक मात्र … कारण खऱ्या वटवाघुळाल उ:शाप असतो निशा - दृष्टीचा, रात्रीच्या अंधारात गवसते त्याला आकाश, जाणवतात भरारी घेऊ शकणारे पंख. मात्र भाळावरच्या माझ्या वटवाघुळांच्या स्वप्नाचे गरुड देखील उडत नाहीत. डोळाभर माखून असते नाकर्तेपणाची निर्लज्ज काळी वेदना …. वेदना, पण ती तरी सच्ची आहे का? भळभळत्या जखमेपोटी निपजणाऱ्या वेदनेला असते आकाश भेदून काढणारी भव्यता आणि इथे टचकन थेंबही येत नाही तेजोहीन नेत्रात … जखमांचा पत्ता नाही कि जखमाच वांझ आहेत म्हणून वेदनेची चव नाही ? ऐलथडी - पैलथडी पण ज्याला ऐल नाही आणि पैल हे नाही अशा प्रवाहात अडकलेला मी …
पण मग आकाश आकाश म्हणून काल ज्याचा जयजयकार झाला तो कोणाचा ? आकाश … एक निरस्तित्व ! पण आक्षितिजतेच्या पुण्याईन पण फसव्या पण देखण्या निळ्या झिलाईन भव्यतेच मानक झालेलं … आणि मी जर आकाश असलो तर चंद्र सूर्याचे डोळे चेहऱ्यावर मढवायला हवे. पण चंद्राची शीतल दाहकता आणि सूर्याची तेजाळ प्रसन्नता सहन होईल मला? नसेल तर हे उधारीच आकाशपण झुगारून द्यायला हवे पण कसे शक्य आहे ते? जे दिसत ते नाकारण्याची अपार्थिव ताकद आहे कुणात! दिशांतापर्यंत पसरलेली मुग्ध निळाई आकाशाची नाही तर कशाची प्रतिक?
प्रतिक ! प्रतिक ! प्रतिक !स्वत:च्या अस्तित्वाभोवती पसरलेलं एक मुखवटेदार धुकं. … धुकं ज्यात सामावलेली असते एक गूढ रम्य सृष्टी. प्रतिक म्हणजे स्वत:च्या माथ्यावर दुसऱ्याच्या गोष्टीच ओझ वाहणारा हमाल. म्हणजे पुन: 'मी' पण हरवलेलं … तेच तर शोधतोय सर्वदूर. गीतातून, सुरातून …. विज्ञानातून , गणितातून … पुस्तकातून, गुलमोहरातून … लिहिण्यातून, वाचण्यातून, बोलण्यातून, …. जखमेतून, वेदनेतून … परंतु सारा शोध असफल! प्रत्येकाच्या शेवटी आढळते ती मन व्यापून टाकणारी फ़ोलता …. पोकळी प्रसवणारी अपयशाची असहायता …. पण तरीही तरंगत असते कुठेशी, कुढणारी का होईना पण आशा … आकांक्षा …. स्वत्व गवसेल, स्वत्व गवसेल म्हणून कानाशी रुंजी घालणारी !
आशा - निराशा, जयपराजय, उमेद - हतबलता, भव्यता- खुजेपण, असहायता - भरारी … द्वंद्व ! द्वंद्व! कधीच जिंकणार नाही का मी या द्वंद्वात? दोनही तीरांवर पाय रोवलेले. निराशेने असहाय होऊन आत्मघाताकडे झुकू पाहणाऱ्या एका मनाला लगेच सुचतो, विवेक, विचार . पण काहीतरी गवसल्यावरही पुढे पसरलेला लांबच लांब रस्ता ' मुक्काम' न आल्याची खंत करायला लावतो. ( मैलांचे दगड जिंकल्याच्या का कधी जाहिराती होतात?) माणूस अल्पसंतुष्ट आणि समाधानी असला कि आकांक्षा विहीन ठरतो आणि क्षितिजाला भिडायच्या प्रयत्नांत अस्तंगत सूर्यासारखा रक्ताच्या थारोळ्यात पडला तर जिद्दी आणि झपाटलेला ठरतो.
समस्त आदर्शांना आणि स्वप्नांना बाटलीबंद करून ठेवून व्यवहाराच्या राज्यात शिरला तर भोगवादी आणि आदर्शांच्या कळाहीन रंगहीन निवडुंग बागेत फिरला तर येडा!
अखेर यशाचं गमक काय? पैसा, कीर्ती, नांवलौकिक, मोटर बंगला, सचोटी आणि नितीमत्तेची जोपासना कि मुत्सेद्दीगिरी?
विचार … विकारांना निमंत्रण देणारे आणि हाकलूनही देणारे मनाचे पहारेदार … मात्र हा भोवरा भयंकर आहे, वेड लावणारा आहे …. एक कधीच न 'जगू' देणारा शाप आहे ! गती आहे पण प्रगती नाही आणि अडकणाऱ्याची अधोगती !!!!!
परीटघडीच्या मनावरती
कातरवेळची काजळी
सांदी कोपरी दडून बसले
आठव जुने वटवाघुळी
हिंदकळणारी, फडफडणारी
अजस्त्रपंखी कर्कशा
लक्तर लक्तर पिंजून निघते
भावनांची दुर्दशा...
रंगीत क्षितिजा पलीकडे
अंधाराचा हाss घसा
इवला इवला होऊन जाई
भेदरलेला शुभ्र ससा ...
आकांताने रोज चुकावी
त्रिशंकूची कातर वाट
नवी क्षितिजे घेऊन येईल
कुणी सांगावे उद्या पहाट !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा