शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१९

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले पाचवे पान*


*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले पाचवे पान*

संस्कृती ह्या राजमान्य अधिकाऱ्याच्या दराऱ्यात  माणूस दडपून टाकतो आपली सहज,  स्वाभाविक, नैसर्गिक भूक.

खर तर आदि कालात संस्कृती नामक  शब्द योजण्यात आला तो संतुष्टी, तृप्ती , सहज -साध्य, आकारबद्ध प्रवासाने मिळालेली व्हावी म्हणून. संस्कृतीपूर्व काळात, जाणवलेल्या भुका एकमेकांच्या मदतीने भागवल्या जाव्या, त्या पुर्तीला एक रूप असावे, एक गंध असावा, त्या तुष्टीला एक रंग असावा, म्हणून सभ्यता, संस्कृती, आचार, ह्या शब्दांची निर्मिती झाली. आपली प्रत्येक कृती, प्रवासातला हर एक टप्पा माणूस ह्या कसोट्यांवर घासून पाहू लागला. नव्या वाटा, नवे मार्ग आखले गेले. नव्या अनुभवांचा अनुनुभूत आनंद मिळाल्याने संस्कृतीचा सत्कार झाला, आचारांचा आदर झाला. सभ्यतेला मान मिळाला. त्या सर्व भुका, त्या सर्व ओढी ह्या वाटांनी परिपूर्ण झाल्याही असतील. परंतु आज?

जुन्या, बुरसट आणि गंजलेल्या मुल्यांभोवतीच आमचा पिंगा चालू असतो आणि जीवन हे अतर्क्य, निरर्थक आणि गोंधळलेले वाटू लागते. ज्या भूकांभोवती आयुष्याचा प्रवास चालू असतो त्या भूकांवर स्वार  होऊनच जगणं  येतं  आणि म्हणूनच आयुष्यात कांहीच साधू शकलो नाही ह्याची खंत उरते!

मेंदूवर सांचलेली वाळवंट
पसरताहेत हळूहळू मनापर्यंत ...

किती काळ जपशील चार थेंब
भावनांचे, ओसाड रेताडास फुटलाच, तर
फुटेल कोंब निवडुंगाचा अन
तुझ्या आत्म्याची लक्तरं
फडकावतील तुझ्या अपयशाची गाथा ...

पण ह्याची शक्यताही कमीच !
कारण कुठल्याही गाथेचा नायक
होण्याइतका मोठा नाहीस तू ...
ह्या वैराणात तुझी नियती शहामृगाची!

वादळाच्या वासाने खुपसून घे मान
तुलाच गिळणाऱ्या  वाळवंटात,
तुझ्या अस्थिंचेही होऊ देत वाळू कण
अन जा सामावून ह्या वाळवंटात
त्याचाच एक भाग होउन !

- श्रीधर जहागिरदार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा