प्रशिक्षकाच्या रोजनिशीतुन
जीवन विकास कार्यशाळेत काही वेळा एक सेशन असते "माझा जीवन प्रवास" . ह्यात सहभागी आपल्या आजवरच्या जीवन प्रवासाचा आढावा घेतात. अनुभवलेले यश-अपयश, उतार -चढाव, ह्यांचे भाव विश्वावर झालेले परिणाम आणि त्या त्या वेळी घेतलेले पुढील प्रवासासाठीचे निर्णय इत्यादी .
हे एका चार्ट पेपरवर एक्स ऍक्सिस वर त्या घटनेवेळचे वय आणि वाय एक्सिस वर त्या यश-अपयशाची तिव्रता नोंदवायला सांगितले जाते. कधी कधी हा प्रवास चित्ररूपात व्यक्त करायला सांगितलं जातं. आणि हे चित्र आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याबरोबर शेअर करून त्या प्रवासाबद्दल त्याला / तिला सांगायचं असतं. अतिशय सेन्सिटिव्ह आणि इंटेन्स असं सेशन असतं हे. आपल्याच भूतकाळात सहकाऱ्याच्या मदतीने डोकावून पहात, भावनेचा पहिला भर ओसरल्यावर बऱ्याचशा त्रयस्थपणे पहाता येतं, मनात कुजत पडलेल्या भावनांचा निचरा होतो आणि पुढील प्रवास थोड्या नितळ मनाने करायची मानसिक तयारी होते. ह्या भाव खेळात प्रशिक्षक देखील सहभागी होतात.
अशाच एका कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून सहभागी होताना मी माझ्या जीवन प्रवासाची चित्रे रेखाटली होती. काही दिवसांपूर्वी तो चार्ट पेपर हाती लागला, आणि जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिले.
जीवन हे चार खंडात असते असे वाटले. हे खंड प्रत्येकासाठी त्याच क्रमात येतील किंवा त्यांचा अवधी सारखाच असेल असे नाही. प्रत्येक खंडात ह्या चारही खंडाचे कमी अधिक कालाचे उपखंड असतात. (ज्योतिष शास्त्रात असणाऱ्या दशा आणि अंतर्दशांसारखे ).
पहिला खंड मनात स्वप्न आणि आशा रुजवणारा आणि वाढीस लावणारा "हिरवळ" खंड. अध्ययनाचा, त्यातून जमल्यास जीवन प्रयोजन शोधून काढण्याचा. त्या दृष्टीने स्वतंत्र होण्याचा.
दुसरा खंड जीवन प्रयोजनाच्या दिशेने सुरु होणारा "प्रवाही" खंड. ह्या प्रवाहाची दिशा बदलत राहू शकते, मुळात प्रवाह देखील बदलू शकतो. प्रवाहाचा वेग आवेग वाढू शकतो, तो संथ होऊ शकतो. शांत होऊ शकतो.
तिसरा खंड जीवन प्रयोजनाची यशस्वी शिखरे गवसण्याचा "डोंगरी" खंड. काही छोटी, काही मोठी शिखरें. कधी सहज,कधी दुर्गम.
चौथा आणि अंतिम (?) खंड अमर्यादित ... अमर्यादित कारण इथे प्रयोजनाची जाणीव- नेणीव नुरते. आपलं स्वत:च आयुष्य आणि अस्तित्व अतिशय पारदर्शक होऊन आपल्या समोर उभं राहतं. इतकं पारदर्शक कि त्याला परिचित विशिष्ट आकार नसतो. भासतो तो ते जीवन प्रयोजन पूर्ण झाल्यावर उरलेला आपल्या भावविश्वाचा एक अंधुक आकार. आपल्यालाच फक्त ठाऊक असलेला आणि तो कशासारखाही असू शकतो ... साधू, संन्यासी, चांडाळ, विणकर, शिकार, शिकारी, काहीही अगदी विदूषक सुद्धा ..... !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा