प्रिय भाऊ
सा..न,वि.वि.
वाढ दिवसाच्या खूप शुभेच्छा. तुला उत्तम स्वास्थ्य लाभ व्हावा ही प्रार्थना.
पत्र लेखन हे मला एकेकाळी खूप आवडायचं. मन मोकळं करायला एक चांगला मार्ग होता तो. तो एक काळ बघता बघता काळाच्याच गुहेत गुडूप झाला. नोकरी आणि संसार ह्या व्यस्ततेत लेखणी खणात जाऊन बसली हे जाणवलं नाही. आणि टंक लेखन सुरु झालं आणि आता .... आता तर आपसातील संवाद प्राचीन माणसासारखा संकेत स्वरूपात होई लागला. 'छान लिहिले' हे दोन शब्द १० वेळा टंकित करण्यापेक्षा एकदा टंकून हसरी बाहुली, किंवा वर केलेला अंगठा आपण दाखवू लागलो. आणि आतातर तर कृत्रिम बुद्धीला, अलेक्साला आज्ञा करून आपण ओतप्रोत पत्र देखील पाठवू शकतो.
ही लेखणीने पत्र लेखनाची भूक मी काही महिन्यांपूर्वी भागवली. एका मराठी शायर मित्राला पत्र लिहून त्या पत्राचा फोटो काढून त्याला व्हाट्सऍप केला. पुढल्याच आठवड्यात तो घरी येऊन धडकला. (तू असे काही करावे अशी अपेक्षा नाही, बरं) मनोहर सप्रे या माणसाची दोन पुस्तके वाचनात आली यात त्यांनी अनेकांना लिहिलेल्या पत्रांचा संग्रहित केले आहेत. त्यामळे समजले कि आपण पत्र नलिहील्याने "उत्कटता" ह्या भावनेला पारखे झालो आहोत.
अलीकडेच प्राजक्ताच्या दोन फेऱ्या झाल्या . तिच्याशी बोलायला दोघांमध्ये बोलायला कॉमन विषय सापडत नव्हते. पण तिनेच ही समस्या सोडवली. " आजोबा, आपके बचपण के किस्से सुनाओ ना " असे तिने म्हणताच मी सुटलो, अगदी सुंसाट !!
आठवणीचं रिळंच सुटलं .....
तुझ्यामुळे मला माझ्यातील गुण उधळायला कसे प्रोत्साहन मिळाले... " दया करा महाराज दया करा .. " असे म्हणत मी नाटकात एन्ट्री घेतली हे सांगितलं. २० स्नेहलता गंज, गडकरी काकांच्या घरासमोर बांधलेले स्टेज . आठवतं का?
मी सातवीत असताना "तात्कालिक भाषणात" भंबेरी उडून देखील मी एमएसएचएस मध्ये तू तयारी करून घेतल्याने कसा शाळेच्या वादविवाद संघात माझी निवड झाली...
तुझा एमए चा रिझल्ट मी माझ्या पहिल्या मुंबई भेटीला आलेलो असताना लागला होता. नई दुनियातली बातमी घाटकोपरला पोहोचली होती. त्या वर्षी मी दहावीत होतो. १९६६. ३० एप्रिल तू गेला होतास माझा रिझल्ट आणायला. तो किस्सा ..
कॉलेज मध्ये मी शिकत असताना तू कसा IAS साठी माझ्या मागे लागला होतास आणि मी कसे तुला I AM (AS ) S असे कळवले होते वगैरे ....
प्राजक्ताने तिने कसे आभाला दोन दिवस एका हॉटेल मध्ये दोन दिवस राहायला नेले होते , हे कौतुकाने सांगितले होते. मोठं भावंडं कसं लहान भावंडाचं कौतुक करतं ना.... आणि धाकट ते करवून घेत राहतात, अगदी आपलं वाढलेलं वय विसरून. त्यामुळे कधी कधी औचित्यभंग होतो हे लक्षातच येत नाही.
असो ... बऱ्याच आठवणी असतात. सत्तरी झाली कि त्या वर वर येत राहतात. तू तर ऐंशीचे दार ठोठावत आहेस.
पुन्हा एकदा शुभेच्छा आणि माझ्याकडून तुला आणि सौ वहिनींकडे क्षमा प्रार्थना कधी काही माझे चुकलंच असेल आणि ते आठवत असेल तर त्या साठी.
श्रीधर
ता क : सोबतचा फोटो आज प्रयत्नपूर्वक गुगलून काढला . घातलेले शर्ट तू एका इंदौर भेटीत मला घेऊन दिले होतेस.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा