शनिवार, नोव्हेंबर २४, २०१८

काबूल भेट - आगमन


Everything happens for a reason. हा एक विश्वास आहे, ही एक धारणा आहे. अडथळे पार करत आयुष्याला पुढे नेण्यासाठी तर कधी जीवनाचे नेमकेपणे समजून घेण्यासाठी ही एक प्रेरणा आहे. 
माझ्या आतील प्रेरक बलस्थानं आणि वैशिष्ट्य जाणून घ्यायला मी अनेक वर्षांपूर्वी CliftonStrengths assessment टेस्ट घेतली होती. त्यानुसार connectedness हे  माझं  सर्वात जोरकस बलस्थान आहे. ह्याचा अर्थ " घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक कारण असते कारण ह्या विश्वातल्या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्यात" हा मनातला दृढ विचार. त्यामुळे प्रत्येक स्थिती समजून घेताना नकळत ह्या भिंगाचा उपयोग माझ्याकडून केला जात असतो.


हे सारं मनात यायचं कारण काल अचानक काही फोटो हातात आले, अफगाणिस्तान भेटीचे.   लहानपणी "घर कोंबडा" असलेला मी नोकरी करायला घरच नाही तर गाव सोडले. ह्याचा अर्थ माझ्या मूळगावी इंदौरमध्ये मला नोकरी मिळत नव्हती असा नाही, आलेल्या नोकऱ्या मी काही ना काही कारणाने नाकारल्या होत्या. मात्र नोकरीला लागल्यावर अनेक गावं पालथी घातली आणि काही वेळा परदेशातसुद्धा जाऊन आलो. मी कधी परदेशी जाईन असे स्वप्न बघितले नव्हते. प्रवास घडलेल्या देशातील  एक देश अफ़गाणिस्तान. २००५ ते २००९ ह्या चार वर्षात मी तीन वेळा काबूलला गेलो. 

काय कारण असेल माझ्या ह्या तीन भेटींमागचे? नेमके कारण मला अद्याप उमगलेले नाही. अनेक दशकांपासून युद्धाच्या धगीत होरपळत असलेला हा देश. अनेक शासकांच्या हत्या किंवा त्यांचे देशातून पलायन ह्या देशाने म्हणजेच इथल्या प्रजेने पाहिलेले आहे. आधुनिक काळात जगातील महाशक्तींनी - रशिया आणि अमेरिका - आपल्या सत्ता खेळात वापरून घेतलेला हा देश. एकेकाळी बुद्धाच्या अहिंसा आणि शांतीचा प्रभाव अनुभवलेला हा देश आता तालिबानी दहशतवादाच्या छायेत आता जगतो आहे. रशियन राजवटीतून ह्या देशाला मुक्त करायला अमेरिकेनेच तालिबान्यांना छुपा पाठींबा दिला होता हे सुद्धा लक्षात ठेवायला हवे.        

अगदी लहान असताना बलराज सहानीच्या "काबुलीवाल्याने" ह्या देशाची तोंड ओळख करून दिलेली. मग महाभारतातील हाच तो गांधार देश हे समजले. मग शकुनी मामा आठवला, गांधारी आठवली.  

जगात युद्ध आणि शांती हे सतत आपला प्रभाव टाकत असतात मात्र कुणी एक कायम स्वरूपी नांदत नाही. शांतीच्या पोटात युद्धखोरी आणि युद्धाच्या मस्तकावर शांती असे जगाचे एक चित्र मला सतत दिसत असते. 

माझ्या पहिल्या भेटीच्या काळात (जुलै २००५) तालिबान्यांच्या पाशवी राजवटीतून मुक्त करायला अमेरिकी सेनेने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, तालिबानी काबूलमधून हुसकावले गेले होते. 

२० जुलैला सकाळी एअर इंडिया च्या विमानाने दिल्लीहून निघून काबुल विमानतळावर उतरलो. आता इथे एक आठवडा मुक्काम होता, कारण दिल्ली काबुल दिल्ली ही फ्लाईट आठवड्यातून एक दिवस होती.  विमानतळाच्या इमारतीत पायी पायी चालत पोहोचलो. सामानाची वाट पाहताना लक्षात आले इथे कन्व्हेयर बेल्ट नाही. इमारतीच्या भिंतीला एक मोठे भगदाड होते आणि त्यातून प्रवाशांच्या बॅगा शकुनी मामाने त्वेषाने फासे फेकावे तशा आत फेकल्या जात होत्या. मला न्यायला बँकेचा एक भारतीय अधिकारी, चार्ल्सटन, आलेला होता. तरुण माणूस, मुबंईत बोरिवलीत त्याचे घर. आम्ही बाहेर आलो तर एक उंचा पुरा दणकट पठाण पुढे आला, त्याने माझी बॅग हातात घेतली. चार्ल्सटन ने त्याच्याशी ओळख करून दिली. तो बँकेत ड्राइवर, मोठ्या साहेबांची सुरक्षा सावली वगैरे अनेक कामं करणारा एक विश्वासू कर्मचारी होता, याह्या खान.      तिथून आम्ही चालत पार्किंग पर्यंत आलो आणि मग कार मधून रहाण्याच्या ठिकाणी निघालो. मला वातावरणात एक प्रकारचे भकासपण जाणवत होते. रस्त्यांवर वर्दळ अशी नव्हतीच. धूळ मात्र भरपूर.  दुतर्फा विरळ वस्तीची घरे होती. काही इमारती स्पष्टपणे बॉम्ब हल्ला किंवा मिसाईल हल्ल्यात उध्वस्त झालेल्या होत्या. त्यातल्या बचावलेल्या भागात एखादे कुटुंब तग धरून रहात असावे. 
      
मुक्कामाची जागा म्हणजे एका अतिसुरक्षा भागात एक दुमजली बंगला. चौफेर उंच भिंत, एक सुरक्षा दार, नेहमी बंद असणारे. आत मशिनगन घेतलेले सुरक्षा कर्मी. ते दाराला असलेल्या छोट्या खिडकीतून पाहून मग दार उघडणार. आत आलो आणि बंगल्याचे प्रशस्तपण जाणवले. तळमजल्यावर एक मोठ्ठा दिवाणखाना आणि किचन. मागच्या अंगाला एक प्रशस्त बगीचा. तो मात्र ओकाबोका. कारण विचारता कळले, आता कुठे बर्फ पडायचे दिवस संपलेत आता बाग फुलेल. वरच्या मजल्यावर रहायच्या खोल्या. तिथे बँकेचा मुख्य अधिकारी - जोसेफ सिल्व्हेनस - तोही भारतीय, चार्ल्सटन आणि माझ्या सारखा अधून मधून येणारा पाहुणा अशा तीन माणसांच्या  सोयीसाठी तीन खोल्या. मला "फ्रेश व्हा, जेऊन आराम करा मग संध्याकाळी भेटू बोलू" असे सांगून तो बँकेत गेला. जाण्याआधी किचन सांभाळणाऱ्या अफ़गाणी बाईला जेवण्याच्या सूचना द्यायला आणि मला एकटे कुठे बाहेर जाऊ नका अशी सूचना द्यायला तो विसरला नाही. बाई मोडकं तोडकं इंग्रजी बोलून घेत होती. तालिबान्यांच्या प्रभावातून देश मोकळा होत असल्याचे लक्षात आले.                   

संध्याकाळी सहाच्या सुमाराला बँकेचा सुरक्षा सल्लागार आला. त्याने मला इथल्या मुक्कामात काय करायचे आणि काय नाही ह्याच्या सूचना दिल्या. एकटे फिरू नका, कार मधून फिरताना काचा बंद ठेवा वगैरे वगैरे. सर्व सूचना सांगून झाल्यावर त्याने मला सूचना असलेला कागद दिला आणि सर्व सूचना समजल्या अशा अर्थाच्या डिक्लेरेशन वर माझी सही घेतली.  बँकेच्या गाड्या बुलेट प्रूफ होत्या. जोसेफची  आणि माझी आधीपासून ओळख होती. खरे तर त्यानेच मला बँकेतल्या स्टाफला ट्रेनिंग देण्यासाठी बोलावून घेतले होते.  त्याने मला " श्रीधर, डोन्ट बी स्केअर्ड. धिस इस ए नाईस प्लेस अँड पिपल आर नाईस अल्सो " असा दिलासा दिला. त्याच्या बरोबर याह्या खान आणि एकजण आले होते. स्वयंपाक करणारी बाई चार वाजताच परतली होती.   खरे तर मी घाबरत आलो नव्हतोच. जिथे चार माणसे रहातात तिथे घाबरायला काय कारण? अर्थात सावधपणे राहणे हे तर जगात सर्व दूर करावेच लागते. जेवण झाल्यावर आम्ही मागच्या बागेत खुर्च्या टाकून सिगरेट ओढत बसलो. मिट्ट अंधार होता, आणि निरव शांतता. व्हरांड्यातला एक  बारका दिवा तेवढा लागलेला होता.  अचानक वर आकाशातून जोरात घरघर ऐकू आली. जोसेफने सांगितले ही अमेरिकन लष्कराची हेलिकॉप्टर्स, गस्तीवर आहेत. दुसऱ्या दिवसापासून मला कामाला लागायचे होते. गुरुवारी अर्धा दिवस आणि शुक्रवारी सुटी असल्याने पूर्ण दिवस ट्रेनिंग होते. मी म्हटले " जोसेफ मी तुझ्याबरोबर सकाळीच येईन. स्टाफ शी ओळख होईल आणि इथल्या कामाचे स्वरूप समजेल.  

घर सफाई, कपडे धुणे ही कामे सुद्धा ती अफगाणी स्त्रीच करायची. ती आठ वाजता आली.  नाश्ता तिनेच बनवला होता - आम्लेट सँडविच.सकाळी लौकर तयार होऊन, नाश्ता करून आम्ही निघालो. गाडीतून  बँक साधारण   २ किलोमीटर अंतरावर होती , अति सुरक्षा भागात. त्या भागात परदेशी वकिलाती होत्या. बँकेसमोर बंकर होते. गेटपाशी मशिनगन धरून सुरक्षाकर्मी. आत जाणाऱ्या प्रत्येकाची आणि त्यांच्या बॅगेची तपासणी होई, ह्यातून जोसेफची सुद्धा सुटका नव्हती! 

(क्रमश:)
             

           

२ टिप्पण्या: