बुधवार, नोव्हेंबर २८, २०१८

काबुल भेट - दुसरा दिवस


कुठल्याही नवीन घटनेला सामोरे जाताना मनाने त्या बद्दल आपसूकच एक चित्र तयार केलेले असते. ते अर्थातच त्या सारखाच एखादा पूर्वानुभव, किंवा तो नसल्यास ऐकलेल्या, वाचलेल्या माहितीवरून तयार झालेले असते. ही एक पूर्वतयारी असते, नव्या अनुभवाला सामोरे जायची.  ते चित्र कधी वास्तवाशी बरचसं जुळतं, कधी वास्तव एखादा सुखद धक्का देतं तर कधी निराशा. मात्र हा नवा अनुभव घेताना आणि घेतल्यावर चिंतन केलं तर मन अधिक संवेदनशील व्हायला मदत होते.              

अफगाण म्हणजे पठाण आणि पठाण म्हणजे उंचेपुरे, दणकट, देखणे. डोक्यावर अफगाणी फेटा बांधलेले असे इथल्या पुरुषांबद्दल तर स्त्रिया म्हणजे बुरखा घातलेल्या, क्वचितच दृष्टीस पडणारे त्यांचे चेहरे म्हणजे मस्तानीच्या रूपाशी स्पर्धा करणारे असे मला वाटत होते. बँकेत काम करणाऱ्या अशाच पठाणांना प्रशिक्षित करायचे आहे म्हणजे एका वेगळ्याच आव्हानाला सामोरे जायचे आहे असे मुंबईपासून मला वाटत होते. बँकेत शिरल्यावर मात्र वेगळीच माणसं भेटली. होते सारेच अफगाणी, मात्र याह्याच्या उंचीशी स्पर्धा करणारं कुणीच नव्हतं. सारेच साधारण भारतीय उंचीचे. एक दोघे तर माझ्या सारखे शिडशिडीत. एकेकाशी ओळख होत गेली. वागण्यात अतिशय सुसंस्कृत, चांगले इंग्रजी बोलणारे आणि फॉर्मल ड्रेस मध्ये. अर्थात बहुराष्ट्रीय बँकेतल्या स्टाफ कडून ग्रूमिंग ची जी अपेक्षा असते ती  पूर्ण करणारे. सारे २५-३० वर्षाच्या आसपासचे. अपवाद एका जुनिअर ऑफिसरचा. तो गृहस्थ ४०-४५ वर्षांचा असावा.  एक स्थानिक महिला अधिकारी देखील होती. बुरख्यात नसली तरी अंगावरच्या शालीने डोके झाकलेली. शाखेत सारेच 'अधिकारी' वर्गात मोडणारे. क्लार्क कुणीच नाही. एकूण १२ स्टाफ होता. दुसऱ्यांदा २००७ साली गेलो तेंव्हा हे मनुष्य बळ जवळ जवळ दुप्पट झालेलं  होते. त्यात पाच महिला होत्या.    


स्टाफ मधील बहुतेक सारेच घरून आपल्या कारने बँकेत येणारे. आणि त्या गाड्या मोठ्या, SUV सारख्या. म्हणजे तसे सधन.अशीच एक गाडी घेऊन येणाऱ्या एका स्टाफ ची उंची जेमतेम ५ फूट!  काही लोकांचे शिक्षण दुबईत, काहींचे पाकिस्तानात तर एक दोघे थेट इंग्लंड मध्ये शिकलेले. रशिया आणि तालिबान राजवटीत ज्यांना शक्य होते असे काही नागरिक परदेशी पलायन करून गेलेले. तिथे त्यांनी नोकऱ्या मिळवल्या आणि इथे आपल्या घरी पैसे पाठवू शकण्या इतके पैसे कमवू लागले.

३५% बेरोजगारी असलेला हा देश आहे. ज्या मध्यम वयीन ऑफिसर चा मी वर उल्लेख केला, तो आधी अफगाणिस्थानच्या मध्यवर्ती बँकेत जनरल मॅनेजर पदावर होता, हा सात मुलांचा बाप ती नोकरी सोडून  बहुराष्ट्रीय बँकेत ज्युनिअर ऑफिसर म्हणून रुजू झालेला.  सरकारी नोकऱ्यांमध्ये पगार किती कमी असावा ह्याचा अंदाज आला. वर्षानुवर्षे युद्धाच्या खाईत लोटला गेलेल्या देशाची आर्थिक कोंडी कशी होते ह्याच हे दारुण वास्तव. ह्या देशाचं लाईफ एक्सपेक्टन्सी २००५ साली अवघ ४२ वर्षे  होतं. त्याचं कारण देखील युद्धस्थिती आणि दहशतवाद !

तरुण स्टाफ एकमेकांशी अफगाणी भाषेत बोलत, ते कळत नसे. मात्र हे बोलणं खेळीमेळीचं असणार हे जाणवलं. ओमर नांवाचा एक शांत ऑफिसर फॉरेन एक्सचेंज सांभाळायचा. स्वभावानं गंभीर, शिकण्याचा खूप उत्साह असलेला, हुशार माणूस. पुढे तो वर्षभर भारतातल्या शाखेत काम करायला आला, शिकण्याचा एक भाग म्हणून. ह्या साऱ्या स्टाफचा एक म्होरक्या होता, झिया. तो माझ्या दिमतीला दिल्यासारखा वागत होता. मला काय हवं काय नको हे अधून मधून विचारत होता.  कुठल्याही गटाच्या चाणाक्ष म्होरक्याचं वागणं असावं तसच. महिला अधिकाऱ्याच्या वागण्यात संकोच नव्हता. सर्वांच्याच वागण्यात एक प्रामाणिक आदबशीरपणा होता. ह्या सगळ्यांकडून मी त्यांच्या कामाचं स्वरूप समजून घेत होतो. नॉलेज गॅप काय आहे ह्याचा अंदाज घेत होतो.

बँकेचे रोकड व्यवहार 'अफगाणी' आणि अमेरिकन डॉलर ह्या दोन्हीत चालत. मात्र अफगाणीतला  व्यवहार नाममात्र वाटला. बँकेत येणारे अधिकांश ग्राहक हे परदेशी वकिलातीतले किंवा अमेरिकन लष्करातले.  मी माझ्या जवळचे काही डॉलर अफगाणित बदलून घेतले, बाजारात काही खरेदी करायला लागतील म्हणून.  जोसेफ ने माझ्यासाठी लंच मागवला - अफगाणी रोटी आणि छोले. रोटी अफगाणी लोकांसारखीच मृदू ! लंच नंतर थोडा बाहेर पडलो. एका  वकिलातीच्या बाहेर काही शीख मंडळी ताटकळत होती. ती भारतीय वकिलात होती. हे शीख इथले नागरिक, बहुदा व्हिसाच्या कामासाठी आले असावेत.  चार पावलांवर एक छोटी टपरी दिसली. गेलो तिथे. एक सिगरेटच पाकीट घेतलं. पैसे किती विचारले तर त्याने  १ डॉलर सांगितले. मी उडालोच ! मला वाटलं तो अफगाणी चलनात सांगेल. आमचा संवाद हिंदीत झाला. हिंदी सिनेमा आणि गाणी इथे भलतीच लोकप्रिय आहेत ह्याचा प्रत्यय आला. मी माझ्या जवळचे अफगानी त्याच्या पुढे केले, त्याने पन्नास अफगानी काढून घेतले. एक गोष्ट लक्षात आली डॉलरची किंमत भारतीय रुपयात आणि अफगानीत जवळपास सारखीच आणि इथे डॉलरच्या व्यवहारावर कुठलेही बंधन नाही असे दिसले.  तशीही देशाची इकॉनॉमी अमेरिकन मदतीवर भिस्त ठेऊन. अगदी छोटा दुकानदार सुद्धा डॉलर घेऊन वस्तू विकतो, किंबहुना त्याला ते अधिक फायद्याचे असते!

आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने बँकेत काम जास्त होते. आधी ठरल्या प्रमाणे आज दोन तास आणि शुक्रवारी पूर्ण दिवस आणि त्या नंतर रोज संध्याकाळी २ तास अशी प्रशिक्षणाची वेळ ठरली होती. मात्र आज २ तास मिळणे कठीण होते. प्रशिक्षण बँकेचे व्यवहार चालत त्याच हॉल (?) मध्ये होणार होते.  दिवस मावळायच्या आत स्टाफला घरी पोहोचायला हवे होते. जोसेफ ने मला अडचण सांगितली. मी समजून घेतली. त्याने मला तू निघ गाडीने, आम्ही येतो मागून असा सल्ला दिला. मी परतलो. सोबत सावली सारखा याह्या होताच. मला सोडून तो परत गेला.

वेळ असूनसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने मला एकट्याला कुठे फिरायला मनाई होती.  घरी परतलो आणि टीव्ही वर हिंदी सिनेमा पाहत बसलो !
(क्रमश:)

      


बँकेबाहेरील बंकर


बाजार 

                             


                








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा