गुरुवार, डिसेंबर २५, २०२५

प्रिय भाऊ

 प्रिय भाऊ 

सा..न,वि.वि. 

वाढ दिवसाच्या खूप शुभेच्छा. तुला उत्तम स्वास्थ्य लाभ व्हावा ही प्रार्थना. 

पत्र लेखन हे मला एकेकाळी खूप आवडायचं. मन मोकळं करायला एक चांगला मार्ग होता तो. तो एक काळ बघता बघता काळाच्याच गुहेत गुडूप झाला. नोकरी आणि संसार ह्या व्यस्ततेत लेखणी खणात जाऊन बसली हे जाणवलं नाही. आणि टंक लेखन सुरु झालं आणि आता .... आता तर आपसातील संवाद प्राचीन माणसासारखा संकेत स्वरूपात होई लागला. 'छान लिहिले' हे दोन शब्द १० वेळा टंकित करण्यापेक्षा एकदा टंकून हसरी बाहुली, किंवा वर केलेला अंगठा आपण दाखवू लागलो.  आणि आतातर तर कृत्रिम बुद्धीला, अलेक्साला आज्ञा करून आपण ओतप्रोत पत्र देखील पाठवू शकतो. 

ही लेखणीने पत्र लेखनाची भूक मी काही महिन्यांपूर्वी भागवली. एका मराठी शायर मित्राला पत्र  लिहून त्या पत्राचा फोटो काढून त्याला व्हाट्सऍप केला. पुढल्याच आठवड्यात तो घरी येऊन धडकला. (तू असे काही करावे अशी अपेक्षा नाही, बरं) मनोहर सप्रे या माणसाची दोन पुस्तके वाचनात आली यात त्यांनी अनेकांना लिहिलेल्या पत्रांचा  संग्रहित केले आहेत. त्यामळे समजले कि आपण पत्र नलिहील्याने "उत्कटता" ह्या भावनेला पारखे झालो आहोत. 

अलीकडेच प्राजक्ताच्या दोन फेऱ्या झाल्या . तिच्याशी बोलायला दोघांमध्ये बोलायला कॉमन विषय सापडत नव्हते. पण तिनेच ही समस्या सोडवली. " आजोबा, आपके बचपण के किस्से सुनाओ ना " असे तिने म्हणताच मी सुटलो, अगदी सुंसाट !!

आठवणीचं रिळंच सुटलं ..... 
 
तुझ्यामुळे मला माझ्यातील गुण  उधळायला कसे प्रोत्साहन मिळाले... " दया करा महाराज दया करा .. " असे म्हणत मी नाटकात  एन्ट्री घेतली हे सांगितलं. २०  स्नेहलता गंज, गडकरी काकांच्या घरासमोर बांधलेले स्टेज . आठवतं का? 
 
 मी सातवीत असताना "तात्कालिक भाषणात" भंबेरी उडून देखील मी एमएसएचएस मध्ये तू तयारी करून घेतल्याने कसा शाळेच्या वादविवाद संघात माझी निवड झाली... 

तुझा एमए चा रिझल्ट मी माझ्या पहिल्या मुंबई भेटीला आलेलो असताना लागला होता. नई दुनियातली बातमी घाटकोपरला पोहोचली होती. त्या वर्षी मी दहावीत होतो. १९६६. ३० एप्रिल तू गेला होतास माझा रिझल्ट आणायला. तो किस्सा .. 
कॉलेज मध्ये मी शिकत असताना तू कसा IAS साठी माझ्या मागे लागला होतास आणि मी कसे तुला I AM (AS ) S असे कळवले होते वगैरे .... 

प्राजक्ताने तिने कसे आभाला दोन दिवस एका हॉटेल मध्ये दोन दिवस राहायला नेले होते , हे कौतुकाने सांगितले होते. मोठं भावंडं कसं लहान भावंडाचं कौतुक करतं ना.... आणि धाकट ते करवून घेत राहतात, अगदी आपलं वाढलेलं वय विसरून. त्यामुळे कधी कधी औचित्यभंग होतो हे लक्षातच येत नाही. 

असो ... बऱ्याच आठवणी असतात. सत्तरी झाली कि त्या वर वर येत राहतात.  तू तर ऐंशीचे दार ठोठावत आहेस. 

पुन्हा एकदा शुभेच्छा आणि माझ्याकडून तुला आणि सौ वहिनींकडे क्षमा प्रार्थना कधी काही माझे चुकलंच असेल आणि ते आठवत असेल तर त्या साठी. 

श्रीधर 
ता क : सोबतचा फोटो आज प्रयत्नपूर्वक गुगलून काढला . घातलेले शर्ट तू एका इंदौर भेटीत मला घेऊन दिले होतेस. 
श्री 

प्रशिक्षकाच्या रोजनिशीतुन

प्रशिक्षकाच्या रोजनिशीतुन 

जीवन विकास कार्यशाळेत काही वेळा एक सेशन असते "माझा जीवन प्रवास" . ह्यात सहभागी आपल्या आजवरच्या जीवन प्रवासाचा आढावा घेतात. अनुभवलेले यश-अपयश, उतार -चढाव, ह्यांचे भाव विश्वावर झालेले परिणाम आणि त्या त्या वेळी घेतलेले पुढील प्रवासासाठीचे निर्णय इत्यादी .  

 हे एका चार्ट पेपरवर एक्स  ऍक्सिस वर त्या घटनेवेळचे वय आणि वाय एक्सिस वर त्या यश-अपयशाची तिव्रता नोंदवायला सांगितले जाते. कधी कधी हा प्रवास चित्ररूपात व्यक्त करायला सांगितलं जातं. आणि हे चित्र आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याबरोबर शेअर करून त्या प्रवासाबद्दल त्याला / तिला सांगायचं असतं. अतिशय सेन्सिटिव्ह आणि इंटेन्स असं सेशन असतं हे. आपल्याच  भूतकाळात सहकाऱ्याच्या मदतीने डोकावून पहात, भावनेचा पहिला भर ओसरल्यावर बऱ्याचशा त्रयस्थपणे पहाता येतं, मनात  कुजत पडलेल्या भावनांचा निचरा होतो आणि पुढील प्रवास थोड्या नितळ मनाने करायची मानसिक तयारी होते. ह्या भाव खेळात प्रशिक्षक देखील सहभागी होतात. 

अशाच एका कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून सहभागी होताना मी माझ्या जीवन प्रवासाची चित्रे रेखाटली होती. काही दिवसांपूर्वी तो चार्ट पेपर हाती लागला, आणि जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिले. 

जीवन हे चार खंडात असते असे वाटले. हे खंड प्रत्येकासाठी त्याच क्रमात येतील किंवा त्यांचा अवधी सारखाच असेल असे नाही. प्रत्येक खंडात ह्या चारही खंडाचे कमी अधिक कालाचे  उपखंड असतात. (ज्योतिष शास्त्रात असणाऱ्या दशा आणि अंतर्दशांसारखे ). 

पहिला खंड मनात स्वप्न आणि आशा रुजवणारा आणि वाढीस लावणारा "हिरवळ" खंड. अध्ययनाचा, त्यातून जमल्यास जीवन प्रयोजन शोधून काढण्याचा. त्या दृष्टीने स्वतंत्र होण्याचा. 

दुसरा खंड जीवन प्रयोजनाच्या दिशेने सुरु होणारा "प्रवाही" खंड. ह्या प्रवाहाची दिशा बदलत राहू शकते, मुळात प्रवाह देखील बदलू शकतो. प्रवाहाचा वेग आवेग वाढू शकतो, तो संथ होऊ शकतो. शांत होऊ शकतो.  

तिसरा खंड जीवन प्रयोजनाची यशस्वी शिखरे गवसण्याचा "डोंगरी" खंड. काही छोटी, काही मोठी शिखरें. कधी  सहज,कधी दुर्गम.   

चौथा आणि अंतिम (?) खंड अमर्यादित ... अमर्यादित कारण इथे प्रयोजनाची जाणीव- नेणीव नुरते. आपलं स्वत:च आयुष्य आणि अस्तित्व अतिशय  पारदर्शक होऊन आपल्या समोर उभं राहतं. इतकं पारदर्शक कि त्याला परिचित विशिष्ट आकार नसतो. भासतो तो ते जीवन प्रयोजन पूर्ण झाल्यावर उरलेला आपल्या भावविश्वाचा एक अंधुक आकार. आपल्यालाच फक्त ठाऊक असलेला  आणि तो कशासारखाही असू शकतो  ... साधू, संन्यासी, चांडाळ, विणकर, शिकार, शिकारी, काहीही अगदी विदूषक सुद्धा ..... !! 

रविवार, मार्च ०१, २०२०

प्रश्न नजरेचा होता ..

डोळ्यात कधी धुकं तर कधी कडा पाणावलेल्या. हे असं कविताबिविता वाचतानाच होत नाही, वर्तमानपत्र वाचताना सुद्धा होतं हे हिच्या लक्षात आलं. मी सांगत होतो दृष्टिकोन बदलून बघतो. पण ऐकेना. आताशा ही सुद्धा कातर होते, कात्रीत वगैरे धरत नाही. मग माझ्या कलाने  घेत म्हणाली "अहो, ते मेळाव्यात वगैरे जाता, चेहरे मोहरे नीट नकोत  का दिसायला ?"

मग गेलो डॉक्टर कडे. यंत्राच्या सहाय्याने डोळ्यांत डोळे घालून त्यांनी निदान केलं. "नजर स्वच्छ नाही !"  डॉक्टर बाईमाणूस ! नेमकं निदान केलं.  हे ऐकून हिचा चेहरा कसा झाला हे दिसलं नाही, हे एक बरं.
सारांशात, दोन्ही डोळ्यातली जळमटं काढली गेलीत.

सध्या दोन डोळे कामकाज  वाटून काम करताहेत. एकाने दूरदृष्टी घेतली तर दुसऱ्याने लघुदृष्टी ! ह्या लघु-गुरु दृष्टिकोनामुळे जगाची लगावली समजू उमजू लागेल अशी  आशा करायला  हरकत नाही.

सध्या डोळ्यांत तासातासाने अभिषेक  सुरु आहे, ६५ दिवसांचे व्रत संपले कि जगाकडे स्वच्छ नजरेने पहायला मोकळा ....
       
आता जरा थंडाईचा आस्वाद घेतो


शनिवार, फेब्रुवारी २९, २०२०

आळशीपणा : एक चिंतन

प्रत्येकाला आपण आळशी आहोत असे मनातल्या मनात वाटत असावे, सर्वसाधारण "तुमच्यातले एक वैगुण्य सांगा " असे विचारले तर कुणी " मी स्वार्थी आहे", "मी मत्सरी आहे" "मी धर्मांध  आहे" असे काही न  सांगता " मी आळशी आहे " असे सांगून गर्दीतला एक होऊन मोकळा होतो.
आळस हा तसा निरुपद्रवी अवगुण, तो शांत असतो मात्र अनेक वेळा दुसर्याला अशांत करतो कारण आपल्या आळसापायी दुसऱ्याचे काम अनेकवेळा अडून जाते.

मनात एक विचार आला, आपण आळशी आहोत असे जवळपास सर्वांनाच जाहीर करावेसे कां वाटत असावे? त्याने ते काय साध्य करतात? एक शक्य आहे अशी स्वीकृती दिली कि आपल्या अनेक वैगुण्यांना  समजून घ्यायला  समोरचा मोकळा असे मनात येत असेल. 

तसेही आपण आळशी आहोत असा आपला एक गैरसमज असतो, कारण लहानपणी  हे एक विशेषण आपल्याला त्या दोन ठिकाणी सतत लावले जाते, जिथे आपला दिवसाचा अधिक वेळ जातो - घरात आणि  शाळेत. उशिरा उठलात तर आळशी, हळू काम केलेत तर आळशी, विसावा घेतलात तर आळशी, बसून चिंतन करत असला तर आळशी. आंघोळ नाही केली तर आळशी आणि मग    " मी आळशी आहे" अशी  एक घट्ट स्व-प्रतिमा तयार  होते.

खरे तर कुणीही आळशी नसते. एखादे काम दुसर्या एका कामापेक्षा अधिक महत्वाचे वाटून ते मागे पडले तर त्या मागे पडलेल्या कामापुरते आणि वेळेपुरते आपण 'आळशी' असतो. हे नेमके असेच मांडले तर आपली प्रतिमा आपल्याच नजरेत थोडी उजळून निघते, कसनुसेपण कमी होते, आणि ओशाळलेपण कमी टोचते.

आळसाचे मूळ कारण दिशाहीन किंवा ध्येयहीनता असावे असेही वाटते. अशा स्थितीत उगाच आपण धावपळ करत असल्यासारखे दाखवतो, पण कां ह्याचे नेमके उत्तर आपल्याजवळ नसते. ही अशी दिशाहीन धावपळ मनात अर्थहीनता भरून ठेवेते, मरगळ आणते. कधी कधी ध्येयामध्ये सुस्पष्टता नसते. म्हणजे " मला काही तरी भरीव काम करायचे आहे" असे स्वप्न किंवा महत्वाकांक्षा असते पण भरीव म्हणजे नेमके काय हे सांगता येत नाही. 
  काही वेळा आपण आळस प्लॅन करतो. उद्या करावी लागणारी कामे आजच उरकून टाकतो. सकाळी मंडईत जाऊन आणावी लागणारी भाजी, आजच आणून ठेवतो. पहाटे फिरायला जात असू तर आज संध्याकाळीच फिरून येतो. हा प्लॅन्ड आळस एक वेगळा आनंद देतो. तो छान एन्जॉय करता येतो. 

"अहो, भाजी आणायला जातायना ना?" ह्या प्रश्नाला "कालच आणली" म्हणत फेसबुक मध्ये डोकं घालताना एक वेगळाच आनंद मिळतो. किंवा बिछान्यात अर्धा तास अधिक लोळताना मस्त गर्दभानंद घेता येतो.           

काही वेळा "मी आळशी नाही" असे सिद्ध करायला " मी कामात आहे" अशी जाहिरात करू लागतो. ह्यात उगाच संगणकावर सर्फिंग करणे आले, शिळे वर्तमानपत्र पुन्हा पुन्हा वाचणे आले, कुठलीही दिशा नसलेले "लिखाण" आले, काही तरी नवीन रचना करू असे म्हणत घरातली एक वस्तू दहा वेगवेगळ्या ठिकाणी लावून पाहत पुन्हा मूळ ठिकाणी ठेवणे आले,

पण आपण हे असे करत आहोत याची जाणीव होताक्षणीच ते काम सोडून थोडे चिंतन आवश्यक असते. मी नेमके काय टाळतोय याचा शोध घ्यावा लागतो. आणि तो लागतोच पट्कन. मग त्या टाळण्याचे कारण शोधून ते निवारण करावे लागते. म्हणजे जीवनाला थोडे अधिक सहज करता येते.

बुधवार, ऑक्टोबर ०२, २०१९

*पत्र्याच्या तळाशी सुकलेले सहाव्वे पान *

*पत्र्याच्या तळाशी सुकलेले सहाव्वे पान *

अध:पतनाला फ़्रिक्शनलेस चाकं असली पाहिजेत. म्हणून त्याला टाळणंच  योग्य . एकदा का त्यावर पाऊल पडलं की तोंडघशी पडणं  अटळ. 

स्वत: बद्दलचा आदर, आत्मविश्वास, मनाची दृढता ह्या साऱ्याची  परीक्षा त्या एका पावलावर अवलंबून असते. आदर्शवादाच्या चौकटीत सजून दिसणारे विचार विकारांच्या वावटळीत उध्वस्त होतात. उरते ती तूफान येेऊ  गेल्यानंतरची भीषण विराणता … सारं  संपल्याची जाणीव …

विकारांच्या प्रवाहात वाहून जाणारे विचार पुन्हा किनाऱ्याला लागू शकणं  अशक्य, लागले तरी त्यांना मोडकळलेल्या होडीचच रूप उरतं . 

माणसाच्या मनात खोल दडून बसलेलं नेमकं असतं तरी काय? देवपण, माणूसपण की हैवानपण ? मानव्याची जोपासलेली सारी फुलं विकाराच्या नुसत्या धगीन सुद्धा कोमेजून जातात. कमावलेली शक्ती, वाढवलेली बुद्धि, समजून घेतलेला विवेक, जोपासलेली मूल्य, सारं सारं नाहीस होतं एका क्षणात ….

मग चिरंतन ते काय? जनावारपण ? खरा कोण? सैतान? ….वाचनातून, चिंतनातून, मननातून, 'तयार ' झालेलं मन खरच 'तयार' झालेलं असतं ? की निव्वळ वरवरचा मुलामा म्हणूनच एका जनावरावर सभ्यतेचा माणसाचा दर्प येणारा मुखवटा चढवलेला असतो?

विकारापासून दूर पळणं  हे विकाराच्या आकर्षणाच्या भीतीपायीच स्विकारलेलं  असतं  ना ? कारण मुळातच जर अनाकर्षण असेल तर कुठलाही प्रयत्न न करता माणूस 'कोरडा' राहू शकतो.  उलट पळणं  हे आकर्षणाची सुप्तावस्थेत वाढच करत असतं  आणि म्हणूनच पहिल्या पावलासरशीच जमीनदोस्त व्हायची वेळ येते.
आणि शुद्ध आल्यावर, आपल पळणं  ही सुटका नव्हती हे उमगल्यावर, आपल्या भोवतीचा पिंजरा हा बिनगजाचा होता हे दिसल्यावर जाणवतो तो पराभव ! पराभव स्वत:चा स्वत:कडून … ह्या प्रत दुसरे मरण नाही,  स्वत:च्या उध्वस्तपणास स्वत:च कारणीभूत होणं ह्या सारखी दारूणता नाही !!!

आणि इतकं सारं  होऊनही, आतून तुटून, मोडून, कोलमडून, उध्वस्त होऊनही इतरेजन जेंव्हा तुमच्या तेजोवलयित व्यक्तिमत्वाचा उदोउदो करतात तेंव्हा कोण कुणाची वंचना करतं, कोण फसवतं  आणि कोण फसतं   हा गोंधळच सुटत नाही.

ज्या वलयात, ज्या प्रभेत खोटेपणाला खरेपणा येतो, मृगजळातून तहान शमते, आकाश स्पर्श होते त्या प्रभेसारखा, त्या तेजासारखा दुसरा अंधार नाही आणि त्या  खोटेपणाने, त्या मृगजळाने, त्या आकाशाने अनुभवलेल्या जिवंत मरणासारखे दुसरे मरण नाही !


माझ्या पराभवाचा सत्कार आज आहे,
येणार वेदनेला आकार आज आहे...    

आकाश जिंकल्याचा केला किती बहाणा,
कळले परि मनाला तो व्यर्थ माज आहे...

मृगजळात जल्लोषाच्या वाहून दूर गेलो,
पण मोल आसवांचे कळणार आज आहे...

त्यांना हवे म्हणुनी फाटून ओठ हासे,
ह्या बेगडी जिण्याचा फुटणार ताज आहे... 

मी जाहलो जगाचा, न राहिलो स्वत:चा, 
माझा फिरून मजला कळणार बाज आहे ... 

- श्रीधर जहागिरदार
१९७४

रविवार, सप्टेंबर २२, २०१९

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले सहावे पान*


ह्या जीवनातील नेमकी सत्य गोष्ट कुठली? भूक !!

नाना प्रकारच्या , विविध तऱ्हेच्या ... प्रकर्षानं जाणवणाऱ्या , अजिबात न जाणवणाऱ्या .... जागवणाऱ्या , निजवणाऱ्या ! ... आणि साऱ्या आयुष्याचा आकांत तेवढ्याचसाठी , तृप्तीसाठी . ह्या सत्यापायी माणसं खोट्यातली खोटी गोष्ट करतात , फसवतात, रडवतात, नागवतात ... फक्त तृप्तीसाठी.  साऱ्या भुकांचं मूळ दीड वितीची खळगी, तिचं रितेपण जाणवलं कि शरीरभर आणि मनभर भुकांचं एकछत्री साम्राज्य सुरु होतं.  पोट भरायला अन्न लागतं म्हणून अन्नाची भूक, अन्नासाठी पैसा  लागतो म्हणून पैशाची भूक, पैसा  मिळाला कि प्रतिष्ठा लाभते, प्रतिष्ठेची भूक ... अधिकाराची भूक , लौकिकाची भूक, प्रसिद्धीची भूक, एखाद्या अवलियास जाणवणारी  ज्ञानाची भूक, अहंकार-तुष्टीची  भूक. रात्री शरीर जाळून काढणारी दुसऱ्या शरीराची भूक ! 

एकदा भुकेच्या जाणिवेची ठिणगी मस्तकात पडली कि वणवा पेटल्या शिवाय राहत नाही. एखाद्या भुकेची तृप्ती झाली तरी ती तात्कालिक, क्षणिक, नश्वर ठरते. क्वचित प्रसंगी अपूर्ण ठरते . आणि मग लागते फरफटत नेणारी पूर्णत्वाची भूक. क्षुधापूर्तीच्या साधनांचं अपूर्णत्व उगाचच जाणवतं. पैसा मिळवण्याच्या वाटांचं एकदम दर्शन घडतं. मग प्रत्येक वाटेचा प्रवास. रात्रीच्या सुखात झिंग नव्हती म्हणून झिंगेचा शोध. लाभलेला लौकिक व्यापक नव्हता म्हणून व्यापकतेचा पाठपुरावा. गवसलेल्या ज्ञानाने उमगलेली अज्ञानता , त्यासाठी पूर्ण ज्ञानाचा हव्यास ....    
एकच मस्ती ... तृप्ती! एकच हव्यास....  पूर्णत्व ! एकच उद्देश ... संतुष्टी!

प्रत्येकाचं आयुष्य ह्याच भुकांनी भारलेले  .. तृप्तीच्या प्रेरणेने भारलेले ... पूर्णत्वाच्या सुरांनी नादावलेले ... म्हणूनच जीवनात एकच सत्य ... भूक ! गंमत ही कि ह्या सत्याच्या शोधापायी किंवा बोधापायी माणसाचे सारे आयुष्य खोटे होऊन जाते. फसवे ठरते .. पाखंड होते .. कुणी जगूच शकत नाही स्वत:चे आयुष्य, एक सच्चे आयुष्य . मनातील विचारांना, आवेगांना दडपत जो तो जपत जपत  जगत असतो. 

नांव, लौकिक, पैसे, कीर्ती, अधिकार, सभ्यता, नागरिकता ! संस्कृती नामक शहरातील हे रहिवासी आपल्या शहराचं शुभ्र, स्वच्छ, शुचिता नांव सांगून लगाम घालत असतात नैसर्गिक आवेगांना, प्रक्षोभांना, सहज उमटणाऱ्या विचारांना       



शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१९


इंदौरच्या ज्या घरात संपूर्ण लहानपण गेलं, म्हणजे १९७५ पर्यंतचा काळ, ते विकलं गेलं आणि काही दिवसांपूर्वीच पाडलं गेलं. घराचं वय नक्कीच ८०-८५ असणार.  त्या घराला ताळा लावून आई दादा जवळच असलेल्या फ्लॅट मध्ये रहायला गेले त्या नंतर म्हणजे २००४ नंतर मी त्या घरात पाय ठेवला नव्हता.

घरात वास्तव्य केलेल्या माणसांच्या आठवणी घराच्या भिंतीत जिरलेल्या असतात का? पावसाळ्यात घरात ताडताड पर्जन्य स्तोत्र म्हणत अभिषेक करणारे घराचे पत्रे पडताना विषण्ण झाले असतील ? काही पायऱ्या निखळलेल्या लाकडी जिन्याने सुटकेचा उसासा टाकला असेल का? देवघर असलेल्या खोलीतल्या कोपऱ्याने दोन बोटं चोखणाऱ्या श्रीची आठवण काढली असेल का?  दादांच्या ऑफिसच्या लादीला कोर्ट कज्ज्यांचा फोलपणा उमगला होता का? दाराशीच असलेल्या स्वयंपाक खोलीला शेवटची  साबुदाण्याची खिचडी  खावीशी वाटले असेल का? डॉक्टरच्या भीतीने ज्या फळीवर भाऊ चढून बसला होता त्या फळीने "तब्येत संभाळून रहा" असा निरोप भाऊ साठी ठेवला असेल का? घरातल्या तीन बालकनींनी शुभदाच्या गावगप्पा तिच्या मैत्रिणींसाठी आठवण म्हणून वाऱ्यासोबत धाडून दिल्या असतील का? मुकुंदने काढलेल्या चित्रांनी अनेक वर्ष शोभिवंत झालेल्या खोली खोलीतल्या भिंतींना ओकंबोकं झालं असेल का?
  
माझ्या अभ्यासाच्या खोलीच्या बिजागर सुटलेल्या खिडक्यांनी मी तिथे उभा राहून कुणा कुणाची वाट पहायचो ह्याची कागाळी केली असेल का?  
हे मनात साचत असताना आठवतात त्या  ३०-३५ वर्ष कुठलाही मेकअप न करू शकलेल्या घराच्या भिंती... एखाद्या जोगिणी सारख्या...   
**
इंदौरच्या ज्या घरात संपूर्ण लहानपण गेलं, म्हणजे १९७५ पर्यंतचा काळ, ते विकलं गेलं आणि काही दिवसांपूर्वीच पाडलं गेलं. घराचं वय नक्कीच ८०-८५ वर्षांचं असणार.  त्या घराला ताळा लावून आई दादा जवळच असलेल्या फ्लॅट मध्ये रहायला गेले त्या नंतर म्हणजे २००४ नंतर मी त्या घरात पाय ठेवला नव्हता. 
आम्ही राहायचो त्या दुमजली वाड्यात राहणारे सारेच भाडेकरू. आमच्या सहा खोल्यांचे भाडे महिन्याला रुपये २०. तळमजल्यावर राहणारे एक कुटुंब आपणच वाड्याचे मालक असे वागत असे . त्यांच्या तशा वागण्याचा कधी कधी त्रास होई. खूप राग यायचा.  मला सारखे वाटायचे वडिलांनी हा वाडाच विकत घ्यावा, आणि त्यांची गुर्मी काढावी. पण वडिलांनी तसे काही केले नाही. ते अखेर पर्यंत भाडेकरू म्हणूनच राहिले. वडिलांचे चुकलेच आणि त्यांना व्यवहार समजला नाही असे सारखे वाटत राहिले. ते सुद्धा चांगले वकील असताना ! 

पाचवीत शिष्यवृत्तीची परीक्षा दिली आणि शिष्यवृत्ती मिळाली. पहिल्या वर्षी २ रुपये महिना आणि पुढील दोन वर्ष ३ रुपये महिना ! थोडा अभिमान वाटायचा. नववी पासून पुढे कॉलेज पर्यंत मेरिट - कम - मीन्स शिष्यवृत्ती घेतली. वडिलांच्या सांगण्यावरून. अर्ज भरून प्रिन्सिपॉल कडे दिला कि बहुदा ऐकावं लागे -  जहागीरदार, वडील वकील असताना तुला कशाला हवी शिष्यवृत्ती? 'जहागीरदार वकील'  ह्या दुहेरी भारदस्तपणामुळे शाळेतल्या माझ्या मित्रांना तो वाडा आमच्या मालकीचा असावा असे वाटत असे. ते तसे नाही असे मी ओशाळून सांगत असे.

स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी वडील सरकारी नोकरीत होते. District Supply and Enforcement Officer ह्या पदावर. २००५ साली ते गेल्यावर त्यांचे सरकारी ओळखपत्र सापडले १९५२ सालचे. माझा जन्म १९५१ चा. मला ते आठवतात ते वकील म्हणूनच ... म्हणजेच आम्ही चार मुलं झाल्यावर त्यांनी सरकारी नोकरी सोडून वकिलीचा व्यवसाय सुरु केला. तोही सचोटीने. त्या काळात तसाही समाजाचा बहुतांश हा वंचितांचाच होता. "पुरवून पुरवून खा" असा कानमंत्र बालपणासून मिळालेला. बऱ्याच कुटुंबांनी देशाला जीवन समर्पित केलेले. नोकरी व्यवसाय सोडून स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरलेले. बरेच जण तुरुंगवास भोगून आलेले. आमचे वडील देखील स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते. असं कानावर पडलेलं.
   
   आता जाणवतं, नवख्या वकिलाला मिळत काय असणार ...  त्या पैशात संसार, चार मुलांचं शिक्षण ... कुठे कुठे काटकसर केली असेल त्यांनी !!  कशा ठरवल्या असतील आयुष्यातल्या प्राथमिकता? अर्थातच मुलांचं भविष्य ही आई-वडिलांची प्राथमिकता असतेच. ते बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात, छंद, मौज मजा, रजा, प्रवास ....    

त्यांचं एक वाक्य सारखं आठवतं "वकिली म्हणजे प्रतिष्ठेने उपाशी जगायचा  व्यवसाय" . आणि मी त्यांना व्यवहार कळला नाही म्हणून माझं मत बनवून मोकळा !! 

वर्तमानाच्या भिंगातून भूतकाळ बघताना परिपक्वता लागते, हेच खरं.  नाही तर मनात अढी ठेऊन "आपण तेवढे शहाणे " ह्या गुर्मीत अनेक जण जगताना आढळतात.  

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले पाचवे पान*


*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले पाचवे पान*

संस्कृती ह्या राजमान्य अधिकाऱ्याच्या दराऱ्यात  माणूस दडपून टाकतो आपली सहज,  स्वाभाविक, नैसर्गिक भूक.

खर तर आदि कालात संस्कृती नामक  शब्द योजण्यात आला तो संतुष्टी, तृप्ती , सहज -साध्य, आकारबद्ध प्रवासाने मिळालेली व्हावी म्हणून. संस्कृतीपूर्व काळात, जाणवलेल्या भुका एकमेकांच्या मदतीने भागवल्या जाव्या, त्या पुर्तीला एक रूप असावे, एक गंध असावा, त्या तुष्टीला एक रंग असावा, म्हणून सभ्यता, संस्कृती, आचार, ह्या शब्दांची निर्मिती झाली. आपली प्रत्येक कृती, प्रवासातला हर एक टप्पा माणूस ह्या कसोट्यांवर घासून पाहू लागला. नव्या वाटा, नवे मार्ग आखले गेले. नव्या अनुभवांचा अनुनुभूत आनंद मिळाल्याने संस्कृतीचा सत्कार झाला, आचारांचा आदर झाला. सभ्यतेला मान मिळाला. त्या सर्व भुका, त्या सर्व ओढी ह्या वाटांनी परिपूर्ण झाल्याही असतील. परंतु आज?

जुन्या, बुरसट आणि गंजलेल्या मुल्यांभोवतीच आमचा पिंगा चालू असतो आणि जीवन हे अतर्क्य, निरर्थक आणि गोंधळलेले वाटू लागते. ज्या भूकांभोवती आयुष्याचा प्रवास चालू असतो त्या भूकांवर स्वार  होऊनच जगणं  येतं  आणि म्हणूनच आयुष्यात कांहीच साधू शकलो नाही ह्याची खंत उरते!

मेंदूवर सांचलेली वाळवंट
पसरताहेत हळूहळू मनापर्यंत ...

किती काळ जपशील चार थेंब
भावनांचे, ओसाड रेताडास फुटलाच, तर
फुटेल कोंब निवडुंगाचा अन
तुझ्या आत्म्याची लक्तरं
फडकावतील तुझ्या अपयशाची गाथा ...

पण ह्याची शक्यताही कमीच !
कारण कुठल्याही गाथेचा नायक
होण्याइतका मोठा नाहीस तू ...
ह्या वैराणात तुझी नियती शहामृगाची!

वादळाच्या वासाने खुपसून घे मान
तुलाच गिळणाऱ्या  वाळवंटात,
तुझ्या अस्थिंचेही होऊ देत वाळू कण
अन जा सामावून ह्या वाळवंटात
त्याचाच एक भाग होउन !

- श्रीधर जहागिरदार 

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले चौथे पान*



कधी कधी वाटतं मरून जावं ... अगदी सहजपणे हा विचार येतो . कां?
रात्रीच्या शांततेत छातीवर छत पेलत जेंव्हा विचारांचे घोडे उधळतात तेंव्हा ते आपलेल्या ट्रॅक पासून कितीही दूर गेले तरी रोख ह्या एकाच विचाराकडे जातो . कां? 
एखादं जालीम विष पाण्याबरोबर पोटात ढकलावं असं वाटतं. कां?
त्या महाशिवाचा अजिंक्य त्रिशूळ छातीवर पेलावा असंही वाटतं . कां?  . 
रात्रीचीच गोष्ट कां, भर दिवसा  समोरून धडधडत येणाऱ्या ट्रक समोर सायकल उभी करावी हाही विचार येतो. कां? 
मृत्यूकडे जाण्याची ओढ लागली म्हणून? जीवनापासून निराश झालो म्हणून? करण्यासारखं काहीच नाही ही जाणीव झाली म्हणून? कि सतत आपल्या भोवती आपला वास हुंगत "तो " वावरतोय , फक्त निर्धारित सामानाची वाट पहात, ही जाणीव आहे म्हणून? 
उभं राहण्याआधीच कोसळण्याची ही हौस कां? तुटत चाललोय मी! अवतीभवती गर्दी असूनही एकटा होत चाललोय मी. ... कां ? कसा? 
हंबरडा फोडावा म्हटलं तर श्वास गुदमरतो ... डोळा पाणी आणावं म्हटलं तर डोळे नुसतेच चुरचुरतात. ती नेमकी कुठली वाफ आंत दडून नुसती  होरपळून काढतेय? तो नेमका कशाचा शोध आहे ज्या साठी सारं चैतन्य , सारा उत्साह, सारी उमेद ताटकळतेय उंबरठ्यात?
किती दारं ठोठावली पण हवी असलेली हाक अजून कानी पडत नाहीये. किती वाद्यांच्या तारा छेडल्या पण हवा तो सूर जुळत नाही . कुठल्या दिशेतून येणार आहे  तो भारावून टाकणारा सुगंध? दिशा बदलली तरी आकाश तेच हा दारुण अनुभव नुसता भटक्या बनवून सोडणार ... शिवाय माथ्यावरलं वंचनेचं ओझं वाढतच जाणार ..... 

हुकल्या कितीक वाटा, चुकली जरी दिशाही,
आकाश तेच आहे, तोवर न खंत काही !
हातात कोरलेल्या, आहेत दग्ध ज्वाला,
मी सूर्य रे अनादी, कां बाळगू तमा ही?
घायाळ मोर नादी झाला जरी खुशाल
जो पेटला पिसारा, विझणार ना कधीही!
झोकात झोकले मी जहराळ प्राक्तनाला,
फुटणार कांच प्याला, समजून काय नाही?
चुकतील सूर थोड़े, गळतील पाकळ्याही,
गाण्यात या जिण्याचा शोधून गंध पाही!



बुधवार, सप्टेंबर १८, २०१९

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले तिसरे पान*

*पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेले तिसरे पान*

माणसाच्या हातांत काय असतं ? जन्मतःच मूठ आवळून येणारा हा प्राणी स्वत:च भाग्य लपवत येत असेल असं वाटत नाही. निश्चितच तो झाकत असणार नियतीने हातावर कोरलेल्या जखमा ... आयुष्यपटलावर निरनिराळ्या समयी रंगणारे  रंग .... घटना घडतात त्या नियतीच्या नियमांनी, कुठे तरी दडून बसलेल्या 'सावल्या' अचानक गाफील क्षणी झडप घालतात आणि सारं आकाशच काळवंडून जातं ... दिवसांचे पंख कापले जातात ... भराऱ्या अर्ध्यावरच मोडून पडतात ... आयुष्यात कमावलेलं, जोपासलेल सारं पिंजून निघतं . एका नव्या आयुष्याची सुरुवात होते . पण अखेर पर्यंत 'तो' क्षण सिंदबादच्या पाठीवरील म्हाताऱ्यासारखा खदखदत नाचवत असतो.   

कुठे काय चुकले? काय कमी पडले? कुठल्या पापाची फळं  वेळ साधून जिंकून गेली  ? साऱ्या उभारीची दैना उडवून टाकण्याची बेसावधता कशी आली? प्रश्नांची वटवाघुळं साऱ्या आयुष्याची कातरवेळ करून टाकतात. पण चुकलेले कुठेच नसते. सारे तसेच घडायचे असते. नेमके, बिनचूक! नियतीचा तोलकाटा कधीच ढळत नाही. सावधानता कधी असूच शकत नाही ! बेसावधपणा जन्माबरोबरच पुजलेला असतो; सावली सारखा - प्रकाशात अस्तित्व जाणवून देणारा     

पदरात पडलेल्या कवड्याही प्रसाद म्हणून जतन  करणारेच जास्त. म्हणून त्यांच्या जखमाही खोल... सलही विलक्षण ... पात्रात पडलेले कवड्यांचे दान उधळून लावणारे नेटाने जगतात पण सतत दडपणाखाली.

 भिरकावून लावलेल्या कवड्या सतत खुळखुळत असतात सद्विवेकाच्या सारीपटाशेजारी ....   
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%
भिरकावून देण्यासाठीच असेल हे अस्तित्व वारंवार 
तर कशासाठी जपल्या श्वासांच्या खुणा 
मी एकटाच नव्हतो त्या वळणावर अनिवार 
तूही सामील त्या जल्लोषात पुन्हा पुन्हा ... 

बिन नाळेचाच जन्मलोय मी 
तुझ्यामागे नियमांचे धागे अनंत 
उजाड माळावर सावली हरवून 
भुताड  झालोय ह्याची तुला कशाला 
मलाच खंत ...

सावली सुद्धा निघून जाते संधी साधून
जेव्हा दाटून येते भयाण रात्र काळी,
भर दुपारी, तापत्या उन्हात सावली हरवून
भुताड व्हायच तेवढ मात्र माझ्या भाळी।

१९७२

SANY0105%5B1%5D.JPG (87×99)

मंगळवार, सप्टेंबर १७, २०१९

*पत्र्याच्या पेटीतील तळाशी सुकलेलं दुसरं पान*



धरलेली प्रत्येक वाट अनोळखीच असते. शोधून शोधूनहि ओळखीच्या खुणा कुठे सापडतच नाहीत. प्रत्येक झाड नवं, त्यावरच पान नवं, त्यावरल फूल नवं, त्या फुलाचा गंध  नवा. पण ह्या नवीनतेन भारावून जाण्यापेक्षा गोंधळून जायलाच कां व्हावं ? अज्ञानात अंदाजाने बांधलेले आकार कुठेच दिसू नयेत म्हणून झालेली ही निराशा असते कि अपेक्षाभंगाची वेदना? कि स्वत:च्या अपेक्षांवरच्या वाजवी विश्वासाची कणा ताठ असलेली जाणीव? त्यापोटी दूरात नजर रोवून असलेली आशा? उचललेल्या आपल्या पावलानाच अर्थ नाही कि पायाखालची वाटच आहे अर्थशून्य? वळणा मागून वळण जाताहेत पण अजून "पुढे आलो"   ह्याची जाणीव कां होऊ नये ? प्रत्येक  वळणावर एक नवा दिशा निर्देशक, प्रत्येक  निर्देशकावर एका नव्या गावाचं नाव … साराच प्रवास असा अज्ञाताच्या पाठी आणि अखेर जाणवणार असेल त्या अज्ञाताची अतर्क्यता , नेणिवेच्याही  पलीकडील … अनाकलनीय ….

उध्वस्त क्षितीज आणि सूर्य दिशाहीन!

हे काय घडतंय? किंबहुना काहीच का घडत नाहीये? उतारावर ढकलून दिलेलं पिंप अजून थांबत नाहीये … पसरलेल्या धुक्यात एखादा आकार लपलेला आहे कि नाही? स्वत:ची स्थिती इतकी हास्यास्पद कधीच झाली नव्हती.

नोकरीच्या, कामाच्या ढालीने किती काळ निभाव लागणार?

पहाट किती लांब आहे?
*************************
उध्वस्त क्षितीज आणि सूर्य दिशाहीन
आकाश स्वच्छ नाही पुरतेच ते मलीन

असतात भोवताली चालूच हालचाली
साऱ्यात मात्र आहे मी एकटाच दीन

साम्राज्य सावल्यांचे कळसूत्री बाहुल्यांचे
तुटतील दोर आणि होईल फक्त लीन

श्वासांची फक्त ग्वाही, जगलो कधीच नाही,
हाती कधी फुलेना, कांटेही  दंशहीन!

हातात फक्त लुळे , उरलेत शब्द खुळे,
त्यांना कुठे किनारा, झालेत अर्थहीन ! 

My Photo

रविवार, सप्टेंबर १५, २०१९

पत्र्याच्या पेटीच्या तळाशी सुकलेलं पहिलं पान*


पहिल पान !
कुणासाठी ?
अजून ही प्रश्नांची सोबत संपत नाही. उत्तरं माहित नसलेले हे प्रश्न पावसाळी ढगांसारखे मनभर धावून येतात आणि तसेच लोंबकळत रहातात, बरसत नाहीत, जातही नाहीत. मळभाचे दाट थर मात्र वाढतच रहातात. पावसाळी ढगांसारखे धावून येणारे हे ढग जलद मात्र नसतात; असतात निर्जल, फिकट, पांढुरके ढग. स्वत:चा माझ्या अस्तित्वाशी संबंध दर्शवणारे, लोंबकळत राहणारे, वटवाघूळा सारखे अवस्थाहीन !
वटवाघुळ !!!! भाळावर बहुदा तोच गोन्दवलेला असणार. पण निव्वळ प्रतिक मात्र … कारण खऱ्या वटवाघुळाल उ:शाप असतो निशा - दृष्टीचा, रात्रीच्या अंधारात गवसते त्याला आकाश, जाणवतात भरारी घेऊ शकणारे पंख. मात्र भाळावरच्या माझ्या वटवाघुळांच्या स्वप्नाचे गरुड देखील उडत नाहीत. डोळाभर माखून असते नाकर्तेपणाची निर्लज्ज काळी वेदना …. वेदना, पण ती तरी सच्ची आहे का? भळभळत्या जखमेपोटी निपजणाऱ्या वेदनेला असते आकाश भेदून काढणारी भव्यता आणि इथे टचकन थेंबही येत नाही तेजोहीन नेत्रात … जखमांचा पत्ता नाही कि जखमाच वांझ आहेत म्हणून वेदनेची चव नाही ? ऐलथडी - पैलथडी पण ज्याला ऐल नाही आणि पैल हे नाही अशा प्रवाहात अडकलेला मी …
पण मग आकाश आकाश म्हणून काल ज्याचा जयजयकार झाला तो कोणाचा ? आकाश … एक निरस्तित्व ! पण आक्षितिजतेच्या पुण्याईन पण फसव्या पण देखण्या निळ्या झिलाईन भव्यतेच मानक झालेलं … आणि मी जर आकाश असलो तर चंद्र सूर्याचे डोळे चेहऱ्यावर मढवायला हवे. पण चंद्राची शीतल दाहकता आणि सूर्याची तेजाळ प्रसन्नता सहन होईल मला? नसेल तर हे उधारीच आकाशपण झुगारून द्यायला हवे पण कसे शक्य आहे ते? जे दिसत ते नाकारण्याची अपार्थिव ताकद आहे कुणात! दिशांतापर्यंत पसरलेली मुग्ध निळाई आकाशाची नाही तर कशाची प्रतिक?
प्रतिक ! प्रतिक ! प्रतिक !स्वत:च्या अस्तित्वाभोवती पसरलेलं एक मुखवटेदार धुकं. … धुकं ज्यात सामावलेली असते एक गूढ रम्य सृष्टी. प्रतिक म्हणजे स्वत:च्या माथ्यावर दुसऱ्याच्या गोष्टीच ओझ वाहणारा हमाल. म्हणजे पुन: 'मी' पण हरवलेलं … तेच तर शोधतोय सर्वदूर. गीतातून, सुरातून …. विज्ञानातून , गणितातून … पुस्तकातून, गुलमोहरातून … लिहिण्यातून, वाचण्यातून, बोलण्यातून, …. जखमेतून, वेदनेतून … परंतु सारा शोध असफल! प्रत्येकाच्या शेवटी आढळते ती मन व्यापून टाकणारी फ़ोलता …. पोकळी प्रसवणारी अपयशाची असहायता …. पण तरीही तरंगत असते कुठेशी, कुढणारी का होईना पण आशा … आकांक्षा …. स्वत्व गवसेल, स्वत्व गवसेल म्हणून कानाशी रुंजी घालणारी !
आशा - निराशा, जयपराजय, उमेद - हतबलता, भव्यता- खुजेपण, असहायता - भरारी … द्वंद्व ! द्वंद्व! कधीच जिंकणार नाही का मी या द्वंद्वात? दोनही तीरांवर पाय रोवलेले. निराशेने असहाय होऊन आत्मघाताकडे झुकू पाहणाऱ्या एका मनाला लगेच सुचतो, विवेक, विचार . पण काहीतरी गवसल्यावरही पुढे पसरलेला लांबच लांब रस्ता ' मुक्काम' न आल्याची खंत करायला लावतो. ( मैलांचे दगड जिंकल्याच्या का कधी जाहिराती होतात?) माणूस अल्पसंतुष्ट आणि समाधानी असला कि आकांक्षा विहीन ठरतो आणि क्षितिजाला भिडायच्या प्रयत्नांत अस्तंगत सूर्यासारखा रक्ताच्या थारोळ्यात पडला तर जिद्दी आणि झपाटलेला ठरतो.
समस्त आदर्शांना आणि स्वप्नांना बाटलीबंद करून ठेवून व्यवहाराच्या राज्यात शिरला तर भोगवादी आणि आदर्शांच्या कळाहीन रंगहीन निवडुंग बागेत फिरला तर येडा!
अखेर यशाचं गमक काय? पैसा, कीर्ती, नांवलौकिक, मोटर बंगला, सचोटी आणि नितीमत्तेची जोपासना कि मुत्सेद्दीगिरी?
विचार … विकारांना निमंत्रण देणारे आणि हाकलूनही देणारे मनाचे पहारेदार … मात्र हा भोवरा भयंकर आहे, वेड लावणारा आहे …. एक कधीच न 'जगू' देणारा शाप आहे ! गती आहे पण प्रगती नाही आणि अडकणाऱ्याची अधोगती !!!!!
परीटघडीच्या मनावरती
कातरवेळची काजळी
सांदी कोपरी दडून बसले
आठव जुने वटवाघुळी
हिंदकळणारी, फडफडणारी
अजस्त्रपंखी कर्कशा
लक्तर लक्तर पिंजून निघते
भावनांची दुर्दशा...
रंगीत क्षितिजा पलीकडे
अंधाराचा हाss घसा
इवला इवला होऊन जाई
भेदरलेला शुभ्र ससा ...
आकांताने रोज चुकावी
त्रिशंकूची कातर वाट
नवी क्षितिजे घेऊन येईल
कुणी सांगावे उद्या पहाट !!

गुरुवार, ऑगस्ट २२, २०१९

वाचन एक संस्कार

एकेकाळी माझे बऱ्यापैकी वाचन होते. आसपासची प्रेमळ मंडळी त्याचे "आवड" म्हणून कौतुक करायची. त्या काळात टी व्ही नव्हता, घरातला एकमेव रेडिओ आमच्यापासून चार हात उंचीवर ठेवलेला असायचा. त्यातून तो देवकीनंदन पांडे हिंदी बातम्या आणि सुरजित सेन इंग्रजी बातम्या द्यायचे. मर्दानी खेळात होऊ शकणाऱ्या दुखापतींना मी घाबरायचो. आजच्या सारखे अभ्यासाला जुंपायचे अत्याचार पालक मंडळी मुलांवर करत नसत. ओळखीचे शिक्षक असलेल्या शाळेत एकदा दाखला झाला की पालकांची जबाबदारी संपायची. "जहागिरदार वकिलांचा मुलगा ना तू ?" हे वाक्य महिन्यात एकदा ऐकवून शिक्षक माझ्यावर धाक ठेऊन असायचे. अशा एकंदर वातावरणांत कसे कुणास ठाऊक छापील अक्षरे मला आकर्षित करायची. अक्षर ओळख घरातच झालेली. माझ्याहून सुमारे दोन वर्ष मोठ्या असणाऱ्या भावाची शाळेची पुस्तके मी वाचत असे. माझ्या वाचनात आलेली पहिली कविता "यु यु यु यु पपी पपी, खेळू आपण लपाछीपी"
महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर येथील कार्यकारिणीत वडील सक्रिय होते. ते तिथल्या पुस्तकालयातून आम्हा भावंडांसाठी गोष्टीची पुस्तके वाचायला आणत. सिंदबाद, गलीवर, तीन शिलेदार, गोट्या, हेमा आणि सात बुटके असेच भेटलेले.
मी पाच सहा वर्षांचा असताना वडिलांनी सरकारी नोकरी सोडली आणि वकिली सुरु केली. दोन तीन वर्षातच त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरु केली आणि ऑफिस घरातच ठेवलं. त्यामुळे आपसुकच आम्ही कुठल्याही अधोगतीपासून वाचलो हे नक्की. वय वाढत गेलं आणि मग किशोर, इंद्रजाल कॉमिक्स हे घरी रतीब टाकू लागले. वाचन संस्कृती वाढीला लागली. वय वाढलं आणि मग ना. सी. फडके, भाऊ पाध्ये, दळवी, यांना घरात यायची परवानगी मिळाली. वाचता वाचता वाचा फुटली मग वेगवेगळ्या विषयांवरच गंभीर वाचन सुरु झालं. सत्यकथेत गटांगळ्या खाल्ल्या. पिपांत उंदीर नेमके कशाने मेले ह्याचा सौंदर्यशास्त्रीय शोध घेऊन पाहिला. ओशोंचे 'संभोग से समाधी की ओर ' घरी आणून वाचले आणि वडिलांना वाचायला दिले ! थोडक्यात इतर गोष्टींप्रमाणे वाचनात सुद्धा माझ्यावर वडिलांनी कुठलेही सोवळे ओवळे थोपले नाही.
अशातच इंग्रजी पुस्तके वाचावी असे वाटून गेले. अर्थात माझे इंग्रजी विज्ञानलेले. त्यामुळे ते Thou, Thee, Thy, Thine and Ye मला न पेलवणारे. इंग्रजी अभिनव साहित्य हा विषय मी आजपर्यंत गुगलून देखील काढलेला नाही ! इंग्रजी चित्रपटांमुळे काही पुस्तके वाचाविशी वाटली त्यातले माझी वाचन प्रतिष्ठा वाढवणारे Gone With The Wind हे एकमेव पुस्तक.
अशातच मला पुस्तकांची एक भली मोठी लॉटरी लागली. माझा चित्रकार, मूर्तिकार आणि आर्किटेक्ट भाऊ मुंबईला शिकायला आला. पार्ल्यात कुणीतरी रूमपार्टनर शोधून तो रहात असे. एका पार्टनर जवळ पुस्तकांचं कलेक्शन होतं. तो काही कारणाने ते काढून टाकणार होता.
बंधूंनी ते सुमारे ५० पुस्तकांचं कलेक्शन १०० रुपयात विकत घेऊन पुढील सुट्टीत इंदूरला येताना मला भेट दिलं. त्यातून बाहेर पडले अॅलिस्टर मॅकलीन, इर्विन स्टोन, गुरुनाथ धुरी चे ग्लोरिया , पुशिंची सावित्री, हेरॉल्ड रॉबिन्स, इरविंग वॉल्लेस, इयान फ्लेमिंग, स्पर्शाची पालवी ..... ह्या पुस्तकांनी माझ्यासोबत सुमारे वीस वर्ष उत्तर दक्षिण प्रवास केला. त्यांत भर पडत गेली. बरीचशी पुस्तके खिळखिळी होऊन निसटून गेली, काही वाटून झाली. काही येणार असे सांगून गेली पण वाट चुकली. मला त्याची खंत नाही. ती त्यांचं देणं देऊन गेली.
आज हे सारं आठवायचं कारण १२ ऑक्टोबर. मला वाचायला मदत करणाऱ्या ह्या दोन्ही व्यक्तींच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस. आज बंधूंचा जन्म दिवस आणि आमच्या वडिलांचा स्मृती दिवस.
आम्ही दोघे धाकटे आमच्या थोरल्या बहिणीपेक्षा आणि ज्येष्ठ बंधूंपेक्षा अधिक कोरडे आहोत. आज काही तरी वेगळाच मूड लागला, इतकच !

बुधवार, नोव्हेंबर २८, २०१८

काबुल भेट - दुसरा दिवस


कुठल्याही नवीन घटनेला सामोरे जाताना मनाने त्या बद्दल आपसूकच एक चित्र तयार केलेले असते. ते अर्थातच त्या सारखाच एखादा पूर्वानुभव, किंवा तो नसल्यास ऐकलेल्या, वाचलेल्या माहितीवरून तयार झालेले असते. ही एक पूर्वतयारी असते, नव्या अनुभवाला सामोरे जायची.  ते चित्र कधी वास्तवाशी बरचसं जुळतं, कधी वास्तव एखादा सुखद धक्का देतं तर कधी निराशा. मात्र हा नवा अनुभव घेताना आणि घेतल्यावर चिंतन केलं तर मन अधिक संवेदनशील व्हायला मदत होते.              

अफगाण म्हणजे पठाण आणि पठाण म्हणजे उंचेपुरे, दणकट, देखणे. डोक्यावर अफगाणी फेटा बांधलेले असे इथल्या पुरुषांबद्दल तर स्त्रिया म्हणजे बुरखा घातलेल्या, क्वचितच दृष्टीस पडणारे त्यांचे चेहरे म्हणजे मस्तानीच्या रूपाशी स्पर्धा करणारे असे मला वाटत होते. बँकेत काम करणाऱ्या अशाच पठाणांना प्रशिक्षित करायचे आहे म्हणजे एका वेगळ्याच आव्हानाला सामोरे जायचे आहे असे मुंबईपासून मला वाटत होते. बँकेत शिरल्यावर मात्र वेगळीच माणसं भेटली. होते सारेच अफगाणी, मात्र याह्याच्या उंचीशी स्पर्धा करणारं कुणीच नव्हतं. सारेच साधारण भारतीय उंचीचे. एक दोघे तर माझ्या सारखे शिडशिडीत. एकेकाशी ओळख होत गेली. वागण्यात अतिशय सुसंस्कृत, चांगले इंग्रजी बोलणारे आणि फॉर्मल ड्रेस मध्ये. अर्थात बहुराष्ट्रीय बँकेतल्या स्टाफ कडून ग्रूमिंग ची जी अपेक्षा असते ती  पूर्ण करणारे. सारे २५-३० वर्षाच्या आसपासचे. अपवाद एका जुनिअर ऑफिसरचा. तो गृहस्थ ४०-४५ वर्षांचा असावा.  एक स्थानिक महिला अधिकारी देखील होती. बुरख्यात नसली तरी अंगावरच्या शालीने डोके झाकलेली. शाखेत सारेच 'अधिकारी' वर्गात मोडणारे. क्लार्क कुणीच नाही. एकूण १२ स्टाफ होता. दुसऱ्यांदा २००७ साली गेलो तेंव्हा हे मनुष्य बळ जवळ जवळ दुप्पट झालेलं  होते. त्यात पाच महिला होत्या.    


स्टाफ मधील बहुतेक सारेच घरून आपल्या कारने बँकेत येणारे. आणि त्या गाड्या मोठ्या, SUV सारख्या. म्हणजे तसे सधन.अशीच एक गाडी घेऊन येणाऱ्या एका स्टाफ ची उंची जेमतेम ५ फूट!  काही लोकांचे शिक्षण दुबईत, काहींचे पाकिस्तानात तर एक दोघे थेट इंग्लंड मध्ये शिकलेले. रशिया आणि तालिबान राजवटीत ज्यांना शक्य होते असे काही नागरिक परदेशी पलायन करून गेलेले. तिथे त्यांनी नोकऱ्या मिळवल्या आणि इथे आपल्या घरी पैसे पाठवू शकण्या इतके पैसे कमवू लागले.

३५% बेरोजगारी असलेला हा देश आहे. ज्या मध्यम वयीन ऑफिसर चा मी वर उल्लेख केला, तो आधी अफगाणिस्थानच्या मध्यवर्ती बँकेत जनरल मॅनेजर पदावर होता, हा सात मुलांचा बाप ती नोकरी सोडून  बहुराष्ट्रीय बँकेत ज्युनिअर ऑफिसर म्हणून रुजू झालेला.  सरकारी नोकऱ्यांमध्ये पगार किती कमी असावा ह्याचा अंदाज आला. वर्षानुवर्षे युद्धाच्या खाईत लोटला गेलेल्या देशाची आर्थिक कोंडी कशी होते ह्याच हे दारुण वास्तव. ह्या देशाचं लाईफ एक्सपेक्टन्सी २००५ साली अवघ ४२ वर्षे  होतं. त्याचं कारण देखील युद्धस्थिती आणि दहशतवाद !

तरुण स्टाफ एकमेकांशी अफगाणी भाषेत बोलत, ते कळत नसे. मात्र हे बोलणं खेळीमेळीचं असणार हे जाणवलं. ओमर नांवाचा एक शांत ऑफिसर फॉरेन एक्सचेंज सांभाळायचा. स्वभावानं गंभीर, शिकण्याचा खूप उत्साह असलेला, हुशार माणूस. पुढे तो वर्षभर भारतातल्या शाखेत काम करायला आला, शिकण्याचा एक भाग म्हणून. ह्या साऱ्या स्टाफचा एक म्होरक्या होता, झिया. तो माझ्या दिमतीला दिल्यासारखा वागत होता. मला काय हवं काय नको हे अधून मधून विचारत होता.  कुठल्याही गटाच्या चाणाक्ष म्होरक्याचं वागणं असावं तसच. महिला अधिकाऱ्याच्या वागण्यात संकोच नव्हता. सर्वांच्याच वागण्यात एक प्रामाणिक आदबशीरपणा होता. ह्या सगळ्यांकडून मी त्यांच्या कामाचं स्वरूप समजून घेत होतो. नॉलेज गॅप काय आहे ह्याचा अंदाज घेत होतो.

बँकेचे रोकड व्यवहार 'अफगाणी' आणि अमेरिकन डॉलर ह्या दोन्हीत चालत. मात्र अफगाणीतला  व्यवहार नाममात्र वाटला. बँकेत येणारे अधिकांश ग्राहक हे परदेशी वकिलातीतले किंवा अमेरिकन लष्करातले.  मी माझ्या जवळचे काही डॉलर अफगाणित बदलून घेतले, बाजारात काही खरेदी करायला लागतील म्हणून.  जोसेफ ने माझ्यासाठी लंच मागवला - अफगाणी रोटी आणि छोले. रोटी अफगाणी लोकांसारखीच मृदू ! लंच नंतर थोडा बाहेर पडलो. एका  वकिलातीच्या बाहेर काही शीख मंडळी ताटकळत होती. ती भारतीय वकिलात होती. हे शीख इथले नागरिक, बहुदा व्हिसाच्या कामासाठी आले असावेत.  चार पावलांवर एक छोटी टपरी दिसली. गेलो तिथे. एक सिगरेटच पाकीट घेतलं. पैसे किती विचारले तर त्याने  १ डॉलर सांगितले. मी उडालोच ! मला वाटलं तो अफगाणी चलनात सांगेल. आमचा संवाद हिंदीत झाला. हिंदी सिनेमा आणि गाणी इथे भलतीच लोकप्रिय आहेत ह्याचा प्रत्यय आला. मी माझ्या जवळचे अफगानी त्याच्या पुढे केले, त्याने पन्नास अफगानी काढून घेतले. एक गोष्ट लक्षात आली डॉलरची किंमत भारतीय रुपयात आणि अफगानीत जवळपास सारखीच आणि इथे डॉलरच्या व्यवहारावर कुठलेही बंधन नाही असे दिसले.  तशीही देशाची इकॉनॉमी अमेरिकन मदतीवर भिस्त ठेऊन. अगदी छोटा दुकानदार सुद्धा डॉलर घेऊन वस्तू विकतो, किंबहुना त्याला ते अधिक फायद्याचे असते!

आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने बँकेत काम जास्त होते. आधी ठरल्या प्रमाणे आज दोन तास आणि शुक्रवारी पूर्ण दिवस आणि त्या नंतर रोज संध्याकाळी २ तास अशी प्रशिक्षणाची वेळ ठरली होती. मात्र आज २ तास मिळणे कठीण होते. प्रशिक्षण बँकेचे व्यवहार चालत त्याच हॉल (?) मध्ये होणार होते.  दिवस मावळायच्या आत स्टाफला घरी पोहोचायला हवे होते. जोसेफ ने मला अडचण सांगितली. मी समजून घेतली. त्याने मला तू निघ गाडीने, आम्ही येतो मागून असा सल्ला दिला. मी परतलो. सोबत सावली सारखा याह्या होताच. मला सोडून तो परत गेला.

वेळ असूनसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने मला एकट्याला कुठे फिरायला मनाई होती.  घरी परतलो आणि टीव्ही वर हिंदी सिनेमा पाहत बसलो !
(क्रमश:)

      


बँकेबाहेरील बंकर


बाजार 

                             


                








शनिवार, नोव्हेंबर २४, २०१८

काबूल भेट - आगमन


Everything happens for a reason. हा एक विश्वास आहे, ही एक धारणा आहे. अडथळे पार करत आयुष्याला पुढे नेण्यासाठी तर कधी जीवनाचे नेमकेपणे समजून घेण्यासाठी ही एक प्रेरणा आहे. 
माझ्या आतील प्रेरक बलस्थानं आणि वैशिष्ट्य जाणून घ्यायला मी अनेक वर्षांपूर्वी CliftonStrengths assessment टेस्ट घेतली होती. त्यानुसार connectedness हे  माझं  सर्वात जोरकस बलस्थान आहे. ह्याचा अर्थ " घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक कारण असते कारण ह्या विश्वातल्या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्यात" हा मनातला दृढ विचार. त्यामुळे प्रत्येक स्थिती समजून घेताना नकळत ह्या भिंगाचा उपयोग माझ्याकडून केला जात असतो.


हे सारं मनात यायचं कारण काल अचानक काही फोटो हातात आले, अफगाणिस्तान भेटीचे.   लहानपणी "घर कोंबडा" असलेला मी नोकरी करायला घरच नाही तर गाव सोडले. ह्याचा अर्थ माझ्या मूळगावी इंदौरमध्ये मला नोकरी मिळत नव्हती असा नाही, आलेल्या नोकऱ्या मी काही ना काही कारणाने नाकारल्या होत्या. मात्र नोकरीला लागल्यावर अनेक गावं पालथी घातली आणि काही वेळा परदेशातसुद्धा जाऊन आलो. मी कधी परदेशी जाईन असे स्वप्न बघितले नव्हते. प्रवास घडलेल्या देशातील  एक देश अफ़गाणिस्तान. २००५ ते २००९ ह्या चार वर्षात मी तीन वेळा काबूलला गेलो. 

काय कारण असेल माझ्या ह्या तीन भेटींमागचे? नेमके कारण मला अद्याप उमगलेले नाही. अनेक दशकांपासून युद्धाच्या धगीत होरपळत असलेला हा देश. अनेक शासकांच्या हत्या किंवा त्यांचे देशातून पलायन ह्या देशाने म्हणजेच इथल्या प्रजेने पाहिलेले आहे. आधुनिक काळात जगातील महाशक्तींनी - रशिया आणि अमेरिका - आपल्या सत्ता खेळात वापरून घेतलेला हा देश. एकेकाळी बुद्धाच्या अहिंसा आणि शांतीचा प्रभाव अनुभवलेला हा देश आता तालिबानी दहशतवादाच्या छायेत आता जगतो आहे. रशियन राजवटीतून ह्या देशाला मुक्त करायला अमेरिकेनेच तालिबान्यांना छुपा पाठींबा दिला होता हे सुद्धा लक्षात ठेवायला हवे.        

अगदी लहान असताना बलराज सहानीच्या "काबुलीवाल्याने" ह्या देशाची तोंड ओळख करून दिलेली. मग महाभारतातील हाच तो गांधार देश हे समजले. मग शकुनी मामा आठवला, गांधारी आठवली.  

जगात युद्ध आणि शांती हे सतत आपला प्रभाव टाकत असतात मात्र कुणी एक कायम स्वरूपी नांदत नाही. शांतीच्या पोटात युद्धखोरी आणि युद्धाच्या मस्तकावर शांती असे जगाचे एक चित्र मला सतत दिसत असते. 

माझ्या पहिल्या भेटीच्या काळात (जुलै २००५) तालिबान्यांच्या पाशवी राजवटीतून मुक्त करायला अमेरिकी सेनेने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, तालिबानी काबूलमधून हुसकावले गेले होते. 

२० जुलैला सकाळी एअर इंडिया च्या विमानाने दिल्लीहून निघून काबुल विमानतळावर उतरलो. आता इथे एक आठवडा मुक्काम होता, कारण दिल्ली काबुल दिल्ली ही फ्लाईट आठवड्यातून एक दिवस होती.  विमानतळाच्या इमारतीत पायी पायी चालत पोहोचलो. सामानाची वाट पाहताना लक्षात आले इथे कन्व्हेयर बेल्ट नाही. इमारतीच्या भिंतीला एक मोठे भगदाड होते आणि त्यातून प्रवाशांच्या बॅगा शकुनी मामाने त्वेषाने फासे फेकावे तशा आत फेकल्या जात होत्या. मला न्यायला बँकेचा एक भारतीय अधिकारी, चार्ल्सटन, आलेला होता. तरुण माणूस, मुबंईत बोरिवलीत त्याचे घर. आम्ही बाहेर आलो तर एक उंचा पुरा दणकट पठाण पुढे आला, त्याने माझी बॅग हातात घेतली. चार्ल्सटन ने त्याच्याशी ओळख करून दिली. तो बँकेत ड्राइवर, मोठ्या साहेबांची सुरक्षा सावली वगैरे अनेक कामं करणारा एक विश्वासू कर्मचारी होता, याह्या खान.      तिथून आम्ही चालत पार्किंग पर्यंत आलो आणि मग कार मधून रहाण्याच्या ठिकाणी निघालो. मला वातावरणात एक प्रकारचे भकासपण जाणवत होते. रस्त्यांवर वर्दळ अशी नव्हतीच. धूळ मात्र भरपूर.  दुतर्फा विरळ वस्तीची घरे होती. काही इमारती स्पष्टपणे बॉम्ब हल्ला किंवा मिसाईल हल्ल्यात उध्वस्त झालेल्या होत्या. त्यातल्या बचावलेल्या भागात एखादे कुटुंब तग धरून रहात असावे. 
      
मुक्कामाची जागा म्हणजे एका अतिसुरक्षा भागात एक दुमजली बंगला. चौफेर उंच भिंत, एक सुरक्षा दार, नेहमी बंद असणारे. आत मशिनगन घेतलेले सुरक्षा कर्मी. ते दाराला असलेल्या छोट्या खिडकीतून पाहून मग दार उघडणार. आत आलो आणि बंगल्याचे प्रशस्तपण जाणवले. तळमजल्यावर एक मोठ्ठा दिवाणखाना आणि किचन. मागच्या अंगाला एक प्रशस्त बगीचा. तो मात्र ओकाबोका. कारण विचारता कळले, आता कुठे बर्फ पडायचे दिवस संपलेत आता बाग फुलेल. वरच्या मजल्यावर रहायच्या खोल्या. तिथे बँकेचा मुख्य अधिकारी - जोसेफ सिल्व्हेनस - तोही भारतीय, चार्ल्सटन आणि माझ्या सारखा अधून मधून येणारा पाहुणा अशा तीन माणसांच्या  सोयीसाठी तीन खोल्या. मला "फ्रेश व्हा, जेऊन आराम करा मग संध्याकाळी भेटू बोलू" असे सांगून तो बँकेत गेला. जाण्याआधी किचन सांभाळणाऱ्या अफ़गाणी बाईला जेवण्याच्या सूचना द्यायला आणि मला एकटे कुठे बाहेर जाऊ नका अशी सूचना द्यायला तो विसरला नाही. बाई मोडकं तोडकं इंग्रजी बोलून घेत होती. तालिबान्यांच्या प्रभावातून देश मोकळा होत असल्याचे लक्षात आले.                   

संध्याकाळी सहाच्या सुमाराला बँकेचा सुरक्षा सल्लागार आला. त्याने मला इथल्या मुक्कामात काय करायचे आणि काय नाही ह्याच्या सूचना दिल्या. एकटे फिरू नका, कार मधून फिरताना काचा बंद ठेवा वगैरे वगैरे. सर्व सूचना सांगून झाल्यावर त्याने मला सूचना असलेला कागद दिला आणि सर्व सूचना समजल्या अशा अर्थाच्या डिक्लेरेशन वर माझी सही घेतली.  बँकेच्या गाड्या बुलेट प्रूफ होत्या. जोसेफची  आणि माझी आधीपासून ओळख होती. खरे तर त्यानेच मला बँकेतल्या स्टाफला ट्रेनिंग देण्यासाठी बोलावून घेतले होते.  त्याने मला " श्रीधर, डोन्ट बी स्केअर्ड. धिस इस ए नाईस प्लेस अँड पिपल आर नाईस अल्सो " असा दिलासा दिला. त्याच्या बरोबर याह्या खान आणि एकजण आले होते. स्वयंपाक करणारी बाई चार वाजताच परतली होती.   खरे तर मी घाबरत आलो नव्हतोच. जिथे चार माणसे रहातात तिथे घाबरायला काय कारण? अर्थात सावधपणे राहणे हे तर जगात सर्व दूर करावेच लागते. जेवण झाल्यावर आम्ही मागच्या बागेत खुर्च्या टाकून सिगरेट ओढत बसलो. मिट्ट अंधार होता, आणि निरव शांतता. व्हरांड्यातला एक  बारका दिवा तेवढा लागलेला होता.  अचानक वर आकाशातून जोरात घरघर ऐकू आली. जोसेफने सांगितले ही अमेरिकन लष्कराची हेलिकॉप्टर्स, गस्तीवर आहेत. दुसऱ्या दिवसापासून मला कामाला लागायचे होते. गुरुवारी अर्धा दिवस आणि शुक्रवारी सुटी असल्याने पूर्ण दिवस ट्रेनिंग होते. मी म्हटले " जोसेफ मी तुझ्याबरोबर सकाळीच येईन. स्टाफ शी ओळख होईल आणि इथल्या कामाचे स्वरूप समजेल.  

घर सफाई, कपडे धुणे ही कामे सुद्धा ती अफगाणी स्त्रीच करायची. ती आठ वाजता आली.  नाश्ता तिनेच बनवला होता - आम्लेट सँडविच.सकाळी लौकर तयार होऊन, नाश्ता करून आम्ही निघालो. गाडीतून  बँक साधारण   २ किलोमीटर अंतरावर होती , अति सुरक्षा भागात. त्या भागात परदेशी वकिलाती होत्या. बँकेसमोर बंकर होते. गेटपाशी मशिनगन धरून सुरक्षाकर्मी. आत जाणाऱ्या प्रत्येकाची आणि त्यांच्या बॅगेची तपासणी होई, ह्यातून जोसेफची सुद्धा सुटका नव्हती! 

(क्रमश:)
             

           

रविवार, नोव्हेंबर १८, २०१८

भक्तिभाव



बेगडी भक्तिभावाने साखर झोपेचा खून करून
हिवाळी कोवळ्या उन्हात शांत पहुडलेल्या कर्ण्यांवर
शिटताहेत कबुतरे आणि काही कावळे;
पोपट, चिमण्या बागडताहेत हिरव्या अंगाखांद्यांवर
कुजबुजताहेत रशरशीत जीवन गाणी सुखदायी काकड वेळेपासुन ....
ह्यातले तुझ्यापर्यंत काय पोहचत असते रे?


खूप आकर्षक आहेत यंदाचे दिवाळी अंक. बाजारात केळी घेताना, गाडी मागच्या दुकानांत मांडलेले दिसले. बाजार थैली जड होण्याआधी थोडी #मौज करावी म्हणून गाडी पलीकडे गेलो. सर्व अंकांवरुन नजर फिरवली, किंमतीतलं वैविध्य उठून दिसलं. महिन्याच्या महिन्याला वर्तमान पत्राची रद्दी देत असल्याने प्रत्येक अंकाच्या वजनाचा अंदाज पटकन घेता आला. #सुगंधचा अंक हातात घेतला तर हाताला धूळ लागली. मग लक्षात आलं, धूळ साऱ्याच अंकांचं परिक्षण करत असल्यासारखी पसरली होती. तशीही #दीपावली सरली होती. मी #आवाज न करता पुढे निघालो. घरात भाजी नव्हती. भाजीच्या दुकानासमोर आलो. साऱ्या भाज्यांचा एकच भाव. पाणी मारून फ्रेश ठेवलेल्या. दूधी प्लास्टिक वेष्टनात. दोन दिवसांची भाजी घेऊन घरी परतलो.
हिनं अचानक विचारलं, यंदा तुम्ही दिवाळी अंक नाही घेतलात? नाही घेतला. इंटरनेटवर मिळतं वाचायला... अंक घेतला की आवरुन ठेवायचा मोह होतो, आणि त्यावर धूळ साचत रहाते...


- श्रीधर जहागिरदार 
१८-११-२०१८

गेला बाजार - १



गेला बाजार - १ 


मोबाईलची रिंग वाजली. अनलिस्टेड नंबर. पण कॉल घेतला. कधीतरी मनोरंजन होतं. 

"अरे मी प्र प्र , ओळखलस ना?"
मी पटकन मुखवटा चढवला, आव आणला. " अरे SSS  आज कशी आठवण ?" मी मेंदू झटकायला सुरुवात केली.

" अरे नुकताच ".....आणि काशिनाथ"  बघितला, मुलांबरोबर.  साल्या, तुझी आठवण आली. त्यातून आमच्या मेडिकलच्या बॅचचं गेट टुगेदर होतं, तिथे जाऊन आलो.  तिथे काही कॉमन मित्र भेटले, म्हटलं मुंबईला गेल्या गेल्या तुला फोन लावायचा." 

आता मेंदू स्थिर झाला. ओळख पटली. सत्तरचं दशक आठवलं. बरीच नाटकं आठवली, मंचावरची, विंगेतली, तालमीतली.
खरं तर दोघ इतकी वर्ष मुंबईत आहोत, तो ७४ सालापासून, मी ९१ सालापासून. दरम्यान मुंबईत प्रत्यक्ष भेट एकदाच, १२ वर्षांपूर्वी त्याच्या क्लिनिक मध्ये. मात्र काही मैत्र वेगळ्याच धाग्यात गुंफलेले असतात. 
" मग, कधी भेटतोस ? आज? उद्या? माझ्या घरी की तुझ्या घरी?" गडी भेटायला  चांगलाच उतावीळ झालेला वाटला. 
" अरे यार, त्या तीन महिन्यात तुझा खांदा खूप वापरलाय मी." तो बोलायचं थांबवत नव्हता. त्याने असं बोलल्यावर मलाही त्याचं एक हळवं नाटक आठवून गेलं. 

तो काळ माझ्या बेकारीचा होता, मित्रांना फुकटचे सल्ले द्यायला भरपूर वेळ होता. संध्याकाळी गांधी पुतळा किंवा टिळक पुतळ्यापर्यंत फिरायला मी कुणी तरी मित्र शोधत असे. ( नेहरू पुतळा आणि सरदार पटेल पुतळा बऱ्याच नंतर झालेले, तेही गजबजलेल्या रस्त्यांवर) हाही त्यातलाच एक. गम्मत ही, ह्यातला कुणीही माझा वर्ग मित्र नसायचा. 
        
" खूप वेगळे वेगळे सर्कल होते तुझे. नाटकवाले, कवितावाले, फिलॉसॉफिकल (?)." गडी फुर्सतीत  होता.
मी म्हटलं " नक्की भेटू. पुढच्या आठवड्यात. पण संध्याकाळी चालेल ?" 
"अरे हो, चालेल. मी हल्ली संध्याकाळचं क्लिनिक बंद ठेवतो. "
" नक्की कळवतो." 

फोन बंद केल्यावर आठवलं, हा मुंबईत ७४ साली आला, इथेच लग्न केलं. त्या वर्षी मी TIFR ला माझा एक प्रोजेक्ट करायला २ महिने आलो होतो.  ह्याच्या घरी ह्याला भेटलो होतो. एका रविवारी सकाळी. त्याने आपल्या मिनी बार मधून काढून मला रेड वाईन ऑफर केली होती ... आणि मी घेतली होती !! तो मिनी बार अजून मनात घर करून आहे.  

माणसानं आपल्या नौकेचं वल्ह काढून ठेवलं कि त्याला गेल्या बाजारचं काय काय आठवतं !! आणि ती मोरपिसं तो मोकळ्या मनाने, नि:संगपणे मनभर फिरवून घेतो!     

सोमवार, ऑक्टोबर २२, २०१८

गाठोडे - पुरचुंडी सणवारांची


गाठोडे - पुरचुंडी सणवारांची

आज शरद पौर्णिमा. लक्ष्मी पूजनाचा दिवस. मी असे म्हटले तर काही लोक "मसाला दूधात काय भांग वगैरे टाकली का?" असा प्रश्न विचारू शकतात. एकूणच माणूस आपला तोच अनुभव खरा, आपला तोच विश्वास सत्य, आपण तेव्हढे महाज्ञानी ह्या भूमिकेतून फटकन निर्णय देऊन मोकळे होतात. काही वेगळ्या शक्यता असू शकतात ही लवचिकता क्वचितच बघायला मिळते. आज देशातला एक मोठा भूभाग कोजागिरी पौर्णिमा वर्षा ऋतूची समाप्ती आणि शरद ऋतूचे आगमन म्हणून चांदणीय रात्री मसाला दूधाचा आनंद घेतो. तर बंगाल, ओरिसा आसाम ह्या पूर्व भागात आजच्या रात्री लक्ष्मी पूजन होते. ज्या कार्तिकी अमावस्येला - दिवाळीला आपण लक्ष्मी पूजन करतो त्या दिवशी पूर्व भारतातले निवासी काली पूजन करतात.

अमावस्या हा दिवस बहुतेक लोक अशुभ मानतात, दिवाळी हा अपवाद ! अमावास्येला कुठलंही नवे  काम करू नये  असा एक संकेत पाळला जातो. १९९० साली चंद्रशेखर अचानक भारताचे पंतप्रधान होऊ घातले. मी त्यावेळी चेन्नईला रहात होतो. ते पदाची शपथ कधी घेतील याचा कयास बांधताना नागराजन हा सहकारी म्हणाला  " ऑफकोर्स ऑन न्यू मून डे." चंद्रशेखर हे बिहारी आहेत आणि त्यांच्या दृष्टीने अमावस्या  शुभ असू शकत नाही अशी शंका देखील त्याला आली नाही.              

दिवाळी सणाच्या अनेक कथा प्रचलित आहेत आणि त्यानुसार सण साजरा करायची पद्धत वेगवेगळी असेल वेगवेगळ्या भागात, मात्र तो साजरा संपूर्ण देशात होतो. असे सर्वच सणांचे नाही. राखी आणि होळी हे सण दक्षिणेत साजरे होताना मी बघितले नाहीत. चेन्नईतल्या सावकारपेठेत मात्र हे सण साजरे होत, कारण तिथली मारवाडी वस्ती. ज्या उत्साही वातावरणात महाराष्ट्र, गुजराथ येथे गणेशोत्सव साजरा होतो तसा  इतरत्र होत नाही. उत्तर भारतात तर गणेश चतुर्थीची सुट्टी देखील नसते. कुठल्या प्रदेशात कुठल्या सणाचे महत्व ह्या साठी त्या त्या प्रदेशातील बँक हॉलीडेस ची लिस्ट पहावी.

इंदूर मधील सणांची मजा आणखीन निराळी. होळकरांमुळे ह्या शहरावर महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रभाव बरीच वर्षे टिकला. त्यामुळे गुडीपाडव्याला घराघरांवर  उभारलेल्या गुढ्या मोजायला आम्ही निघत असू. स्नेहलतागंज, रामबाग, नारायणबाग, इमलीबाजार, नंदलालपूरा ह्या मराठी वस्तीतून फिरलो कि २००-३०० गुढ्या सहज मोजता येत. श्रावण मासी हर्ष मानसी येत असे तो सणांची रेलचेल असते म्हणूनच. मला आठवतंय, शाळांमध्ये श्रावणी सोमवार आणि शनिवार अर्धा दिवस सुटी असे , संध्याकाळी उपवास सोडायचा म्हणून. जन्माष्टमी देखील घरोघरी साजरी होई . फुलांची झकास आरास वगैरे करून लंगडा बाळकृष्ण आरामात लाड पुरवून घ्यायचा . आरास करायला फुले, पाने आमच्या मामाच्या "गुलशन नर्सरी'तून  आणायची. तळमजल्यावर राहणारे दद्दाजी (ठाकूर) हा सण जोरात साजरा करत. त्यांचा मोठा मुलगा - लल्लू भैया बाळाच्या रडण्याचा ट्या हा आवाज झकास काढे.                      
श्रावण सुरु होता होता गणेशोत्सवाची तयारी सुरु होई ती म्हणजे उत्सवाचे मंडळ निवडून  नाटक कुठले बसवायचे हे ठरवण्यापासून ...

               

रविवार, ऑक्टोबर १४, २०१८

गाठोडे - पुरचुंडी पहिली

गाठोडे - पुरचुंडी पहिली

एकेकाळी माझे बऱ्यापैकी वाचन होते. आसपासची प्रेमळ मंडळी त्याचे "आवड" म्हणून कौतुक करायची. त्या काळात टी व्ही नव्हता, घरातला एकमेव रेडिओ आमच्यापासून चार हात उंचीवर ठेवलेला असायचा. त्यातून तो देवकीनंदन पांडे हिंदी बातम्या आणि सुरजित सेन इंग्रजी बातम्या द्यायचे. मर्दानी खेळात होऊ शकणाऱ्या दुखापतींना मी घाबरायचो. आजच्या सारखे अभ्यासाला जुंपायचे अत्याचार पालक मंडळी मुलांवर करत नसत. ओळखीचे शिक्षक असलेल्या शाळेत एकदा दाखला झाला की पालकांची जबाबदारी संपायची. "जहागिरदार वकिलांचा मुलगा ना तू ?" हे वाक्य महिन्यात एकदा ऐकवून शिक्षक माझ्यावर धाक ठेऊन असायचे. अशा एकंदर वातावरणांत कसे कुणास ठाऊक छापील अक्षरे मला आकर्षित करायची. अक्षर ओळख घरातच झालेली. माझ्याहून सुमारे दोन वर्ष मोठ्या असणाऱ्या भावाची शाळेची पुस्तके मी वाचत असे. माझ्या वाचनात आलेली पहिली कविता "यु यु यु यु पपी पपी, खेळू आपण लपाछीपी"
महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर येथील कार्यकारिणीत वडील सक्रिय होते. ते तिथल्या पुस्तकालयातून आम्हा भावंडांसाठी गोष्टीची पुस्तके वाचायला आणत. सिंदबाद, गलीवर, तीन शिलेदार, गोट्या, हेमा आणि सात बुटके असेच भेटलेले.
मी पाच सहा वर्षांचा असताना वडिलांनी सरकारी नोकरी सोडली आणि वकिली सुरु केली. दोन तीन वर्षातच त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरु केली आणि ऑफिस घरातच ठेवलं. त्यामुळे आपसुकच आम्ही कुठल्याही अधोगतीपासून वाचलो हे नक्की. वय वाढत गेलं आणि मग किशोर, इंद्रजाल कॉमिक्स हे घरी रतीब टाकू लागले. वाचन संस्कृती वाढीला लागली. वय वाढलं आणि मग ना. सी. फडके, भाऊ पाध्ये, दळवी, यांना घरात यायची परवानगी मिळाली. वाचता वाचता वाचा फुटली मग वेगवेगळ्या विषयांवरच गंभीर वाचन सुरु झालं. सत्यकथेत गटांगळ्या खाल्ल्या. पिपांत उंदीर नेमके कशाने मेले ह्याचा सौंदर्यशास्त्रीय शोध घेऊन पाहिला. ओशोंचे 'संभोग से समाधी की ओर ' घरी आणून वाचले आणि वडिलांना वाचायला दिले ! थोडक्यात इतर गोष्टींप्रमाणे वाचनात सुद्धा माझ्यावर वडिलांनी कुठलेही सोवळे ओवळे थोपले नाही.
अशातच इंग्रजी पुस्तके वाचावी असे वाटून गेले. अर्थात माझे इंग्रजी विज्ञानलेले. त्यामुळे ते Thou, Thee, Thy, Thine and Ye मला न पेलवणारे. इंग्रजी अभिनव साहित्य हा विषय मी आजपर्यंत गुगलून देखील काढलेला नाही ! इंग्रजी चित्रपटांमुळे काही पुस्तके वाचाविशी वाटली त्यातले माझी वाचन प्रतिष्ठा वाढवणारे Gone With The Wind हे एकमेव पुस्तक.
अशातच मला पुस्तकांची एक भली मोठी लॉटरी लागली. माझा चित्रकार, मूर्तिकार आणि आर्किटेक्ट भाऊ मुंबईला शिकायला आला. पार्ल्यात कुणीतरी रूमपार्टनर शोधून तो रहात असे. एका पार्टनर जवळ पुस्तकांचं कलेक्शन होतं. तो काही कारणाने ते काढून टाकणार होता.
बंधूंनी ते सुमारे ५० पुस्तकांचं कलेक्शन १०० रुपयात विकत घेऊन पुढील सुट्टीत इंदूरला येताना मला भेट दिलं. त्यातून बाहेर पडले अॅलिस्टर मॅकलीन, इर्विन स्टोन, गुरुनाथ धुरी चे ग्लोरिया , पुशिंची सावित्री, हेरॉल्ड रॉबिन्स, इरविंग वॉल्लेस, इयान फ्लेमिंग, स्पर्शाची पालवी ..... ह्या पुस्तकांनी माझ्यासोबत सुमारे वीस वर्ष उत्तर दक्षिण प्रवास केला. त्यांत भर पडत गेली. बरीचशी पुस्तके खिळखिळी होऊन निसटून गेली, काही वाटून झाली. काही येणार असे सांगून गेली पण वाट चुकली. मला त्याची खंत नाही. ती त्यांचं देणं देऊन गेली.
आज हे सारं आठवायचं कारण १२ ऑक्टोबर. मला वाचायला मदत करणाऱ्या ह्या दोन्ही व्यक्तींच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस. आज बंधूंचा जन्म दिवस आणि आमच्या वडिलांचा स्मृती दिवस.